आशादायी निवडणूक !

संपादकीय

सध्या देशात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. नवनवे उमेदवार समोर येत आहेत. कोणाचे पारडे जण होणार, याच्या जोडीला विजय-पराजय यांचीही चर्चा रंगली आहे. यातच भोपाळ येथील भाजपच्या एका नव्या उमेदवाराचे, म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे नाव समोर आल्यावर ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द वापरण्याची खुमखुमी असणार्‍यांनी आणि आतापर्यंत कोणत्या तरी बिळात लपून बसलेल्यांनी लगेचच या प्रकरणात नाक खुपसायला प्रारंभ केला. का तर म्हणे ‘साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत, त्यांच्यावर आतंकवादाचा आरोप आहे, त्या खुनी आहेत’, अशी एक ना अनेक विधाने त्यांच्या विरोधात करण्यात येऊ लागली. त्यांचा जामीन रहित करून त्यांना पुन्हा कारागृहात टाकण्याच्या मागणीपर्यंतही ओमर अब्दुल्लासारख्यांची मजल गेली. अब्दुल्ला महाशयांना आधीच ‘हिंदु’, ‘हिंदुत्व’ या शब्दांची ‘अ‍ॅलर्जी’ आहेच. त्यामुळे अशा देशविरोधकांना साध्वींची उमेदवारी खुपणारच ! साध्वींना होणार्‍या विरोधाच्या लाटेत देशद्रोह्यांचा कैवार घेणार्‍या मेहबूबा मुफ्ती यांनीही उडी घेतलीच ! प्रत्येक वेळी हिंदुद्वेषाच्या चष्म्यातून पहायचे, हिंदूंवर आरोप करायचे आणि त्यातूनच मग ‘हिंदु आतंकवाद’ अशी संकल्पना पुढे पुढे आणायची, ही खेळी आजवर खेळली गेली आहे. ‘हिंदु आतंकवादा’चे लेबल चिकटवले की, राष्ट्रविरोधकांची टोळी तार सप्तकात ओरडायला मोकळी ! आतापर्यंत अनेक हिंदूंना विविध कारणांमध्ये अटक झाली आहे; मात्र एकाही हिंदूला अद्याप आतंकवादी म्हणून न्यायालयाने शिक्षापात्र ठरवलेले नाही. असे असतांनाही आरोपांची आतषबाजी करून ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द लोकांच्या गळी मारला जात आहे. हे संतापजनक आहे.

खरे आतंकवादी कोण ?

एखाद्या गुन्ह्यात आरोपीवर दोष सिद्ध झाल्यासच तो निवडणूक लढू शकत नाही, असे प्रावधान आहे; पण तो केवळ आरोपी असेल, तर त्याच्या उमेदवारीला कोणीही विरोध करू शकत नाही. यंदाच्या निवडणुकीतही अनेक उमेदवारांवर गुन्हे नोंद आहेत, काही उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. काँग्रेसचेही अनेक नेते जामिनावर मुक्त आहेत; पण ते निवडणूक लढवत आहेत. वर्ष १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल घडवून अनेक निष्पाप शिखांची हत्या करणार्‍या काँग्रेसचे उमेदवारही आज निवडणूक लढवतच आहेत. काही घोटाळेबहाद्दरही जामिनावर सुटून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ही सूची संपणारच नाही. साध्वींच्या उमेदवारीला विरोध करणार्‍यांना अशांची उमेदवारी कशी काय बरे चालते ? साध्वी आतंकवादी आहेत कि नाहीत, ते काळ ठरवेलच; पण आतापर्यंत देशाच्या सुरक्षिततेशी नेहरू-गांधी घराण्याने केलेल्या खेळाचे काय ? त्याचे अनेक गंभीर परिणाम देशाला भोगावे लागले आहेत. त्यामुळे खरे आतंकवादी कोण आहेत, ते समाज ओळखून आहे. ‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्येला मणीहार’ ही म्हण काँग्रेसला अगदी सार्थ ठरते. अर्थात काँग्रेस हे मान्यच करणार नाही; कारण काँग्रेसवाले जर खरे बोलू लागले, तर ते राजकारण तरी कशाच्या आधारे  खेळणार ना ? साध्वींना पर्यायाने हिंदुत्वाला विरोध करण्यापेक्षा देशद्रोह्यांशी सलगी करणार्‍यांनाच प्रश्‍न विचारून सळो की पळो करून सोडायला हवे.

अत्याचारांची परिसीमा

‘आतंकवादी’ म्हणून साध्वींना विरोध करणार्‍यांनी साध्वी यांना कारागृहात काय काय सोसावे लागले, याचा कधीतरी विचार केला आहे का ? नव्हे त्याविषयी जाणून घेण्याचे सौजन्य तरी दाखवले आहे का ? अटकेच्या आधी १३ दिवस त्यांना डांबून ठेवण्यात आले, त्यांच्या पावित्र्याविषयी अर्वाच्च्य भाषा वापरण्यात आली. त्यांना आतंकवादविरोधी पथकाने कंबरपट्ट्याने बेशुद्ध पडेपर्यंत झोडपले. त्या बेशुद्ध असतांना काही कागदांवर त्यांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. अशी व्यक्ती ‘आतंकवादी’ कशी काय ठरू शकते ? याउलट त्यांचा अतोनात छळ करणारे आतंकवादविरोधी पथकच ‘आतंकवादी’ आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ? निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर साध्वींना हिंदुत्वाच्या कारणामुळे विरोध करणारे त्यांच्यावर अत्याचार होत असतांना मात्र मूग गिळून गप्प का होते, याविषयी त्यांना खडसवायलाच हवे. साध्वींच्या उमेदवारीच्या विरोधात काही वाहिन्यांवर चर्चासत्रेही आयोजित केली गेली; मात्र साध्वी जेव्हा पोलिसांच्या काठ्या झेलत होत्या, त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात होते, तेव्हा वाहिन्यांनी चर्चासत्रे घेण्याचे सौजन्य कधीच दाखवले नाही. हा वाहिन्यांचा हिंदुद्वेष कायम लक्षात ठेवायला हवा.

धर्मच न्याय देईल !

साध्वी यांनी आतापर्यंत सोसलेला त्रास, सहन केलेला छळ म्हणजे राष्ट्र-धर्मासाठी एकप्रकारे केलेला त्यागच आहे. त्यांना मिळालेली उमेदवारी म्हणजे त्यांनी केलेल्या या त्यागाची खरी परीक्षाच ठरणार आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी सांगितलेे, ‘‘मी धर्मयुद्धासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. काँग्रेसने ज्या भगव्याला आतंकवादी ठरवले, तोच माझा प्रमुख विषय आहे. मला या लोकांनी त्रास दिला, मारहाण केली. काँग्रेसींनी स्त्रीच्या शरिराला स्त्री समजले नाही. उद्या हे लोक ‘स्त्री आतंकवादी’ असेही म्हणू शकतात.’’ धर्मयुद्धासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह या आतापर्यंत एकमेवच असतील. हिंदु धर्मासाठी, हिंदुत्वासाठी आणि हिंदूंसाठी साध्वींची उमेदवारी निश्‍चितच आशादायी आहे. साध्वी निवडणुकीत विजयी झाल्या, तर भगव्या आतंकवादाचा फुगाच फुटेल, हिंदुत्वाच्या वाटचालीला विरोध करणार्‍यांसाठी ते प्रत्युत्तरच ठरेल आणि ‘भगवा आतंकवाद’ या संकल्पनेचे समर्थन करणार्‍यांना चपराक बसेल. धर्मासाठी निवडणूक लढवणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह यांना राजकारणातील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वच हिंदूंकडून शुभेच्छा !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now