कूटयुद्ध (वृकयुद्ध) म्हणजेच गनिमी कावा !

आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी ! त्या निमित्ताने…

१. वृकयुद्ध किंवा कूटयुद्ध

‘शिवदिग्विजयकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धपद्धतीस ‘वृकयुद्ध’, असे म्हटले आहे. मराठ्यांचा सुप्रसिद्ध ‘गनिमी कावा’ (अरबी शब्द) तो हाच ! या युद्धप्रकाराला भारतातील प्राचीन नीतीशास्त्रज्ञ ‘कूटयुद्ध’ असे म्हणत असत.

२. असे असते कूटयुद्ध !

सैन्याच्या चार-पाच टोळ्या कराव्या. शत्रूस समजू न देता संकेतांनी चालावे. एका टोळीने शत्रूसैन्यावर आक्रमण  करावे. आक्रमणाच्या विरोधात प्रतिआक्रमण चालू झाले की, त्या टोळीने पळ काढावा. शत्रूसैन्य या टोळीचा पाठलाग करण्यामागे मोडले की, पाठी लागणार्‍यास इतर टोळ्यांनी चहूकडून घेरावे. अशाप्रकारे अल्प सैन्यात मोठे सैन्य मारले जाते. शत्रूसैन्याला किती फौज आहे, याची गणतीही न होऊन ते हतवीर्य होतात.

३. कूटयुद्धनीतीत निपुण असणारे छत्रपती शिवराय !

कूटयुद्धाला अत्यंत अनुकूल असा भूप्रदेश शिवाजी महाराजांच्या कह्यात असल्याने त्यांनी याच पद्धतीचा आश्रय घेऊन अनेक शत्रूंना तेथेच गारद केले. नम्र बोलून आणि घाबरल्याचे दाखवून छत्रपतींनी अफझलखानाचा विश्‍वास संपादन केला अन् हव्या त्या ठिकाणी आणून त्याचा वध केला. शास्ताखानाचा (शाहिस्तेखानाचा) सरदार उंबर खिंडीतून कोकणात उतरत असतांना मराठ्यांनी त्याची अशीच लांडगेतोड केली. प्रथम हेराकरवी त्याची सर्व माहिती छत्रपतींनी आणवली. मग त्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडीत लष्कर लपवून ठेवले आणि तो अडचणीच्या ठिकाणी येताच त्याच्यावर अचानक आक्रमण केले आणि त्याचे सर्व सामान आणि तोफखाना लुटून त्याला हाकलून दिले. शास्ताखानावरील आक्रमण हा कूटयुद्धाचाच प्रकार !’

– कै. पु.ग. सहस्रबुद्धे. (‘सांस्कृतिक वार्तापत्र’, २६.१.२०१२)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now