(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांचा जामीन रहित व्हावा !’ – ओमर अब्दुल्ला

  • साध्वी प्रज्ञासिंह यांचा जामीन रहित करण्याची मागणी करणारे ओमर अब्दुल्ला सध्या घोटाळ्याच्या प्रकरणात जामिनावर असलेल्या सोनिया गांधी, राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा, पी. चिदंबरम्, पत्नीच्या हत्येचा संशय असणारे शशी थरूर आणि शीखविरोधी दंगलीतील आरोपी कमलनाथ या काँग्रेस नेत्यांचा जामीन रहित करण्याची मागणी का करत नाहीत ?
  • न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावूनही महंमद अफझल आणि याकूब मेमन या आतंकवाद्यांच्या सुटकेची मागणी करणारे साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात अशी मागणी करतात, हे लक्षात घ्या !
  • ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, ही म्हण सार्थ ठरवणारेच अशा प्रकारची मागणी करत आहेत !

श्रीनगर – भाजपने याआधी पुलवामा आणि बालाकोट यांचे सूत्र उपस्थित करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ‘हे सूत्र चालत नाही’, असे लक्षात आले, तेव्हा त्याने विकासाचे सूत्र आणले. तेही लोकांनी नाकारल्यावर भाजपकडे काही शिल्लक राहिले नाही, तेव्हा त्याने धर्माचा आधार घेतला. राममंदिरावरून मते मिळत नाहीत; म्हणून त्याने भोपाळ येथे आतंकवादाचा आरोप असणार्‍यांना उमेदवारी दिली आहेे, अशी टीका जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी पुढे असेही म्हटले की, साध्वी प्रज्ञासिंह यांचे आरोग्य चांगले नसल्याने त्यांना जामीन मिळाला आहे. जर त्यांचे आरोग्य चांगले नाही; म्हणून त्या कारागृहात राहू शकत नाहीत, तर निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे आरोग्य कसे चांगले होते ? मला आशा आहे की, ज्या न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे, तेच ते रहित करील.

आरोग्यामुळे जामीन मिळाला नसून, ओमर यांनी त्याविषयी योग्य माहिती घ्यावी ! – साध्वी प्रज्ञासिंह यांचे प्रत्युत्तर

ओमर अब्दुल्ला यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले की, माझे सुदैव आहे की, त्यांनी हे नाही म्हटले की, साध्वीला फासावर लटकवले पाहिजे; कारण त्यांचे षड्यंत्र असेच होते. मला आरोग्यामुळे जामीन मिळालेला नाही. ओमर यांनी योग्य माहिती घेऊन त्यानंतरच तोंड उघडले पाहिजे, तरच तुमची बाल्यावस्था संपेल.

सबळ पुराव्यांच्या अभावामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन

१. मालेगाव स्फोट प्रकरणात सबळ पुराव्यांच्या अभावी उच्च न्यायालयाकडून साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन देण्यात आला आहे; मात्र त्यांना अद्याप निर्दोष घोषित करण्यात आलेले नाही. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने त्यांच्यावरील सर्व आरोप काढून टाकले असले, तरी न्यायालयाने ते स्वीकारलेले नाहीत.

२. सुनील जोशी हत्या प्रकरणात न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासहित ९ जणांना निर्दोष मुक्त केले आहे.

३. वर्ष २००७ च्या अजमेर दर्ग्यातील स्फोटाच्या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह यांना आरोपी करण्यात आले होते; मात्र राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने साध्वी आणि अन्य २ आरोपी यांच्यावरील खटला रहित करण्याचा अहवाल सादर केला होता.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उमेदवारीच्या विरोधात याचिका

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितेचे वडील नासिर बिलाल यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाकडून जामीन मिळवतांना साध्वी प्रज्ञासिंह यांनी प्रकृतीचे कारण दिले होते. त्यामुळे साध्वी यांना निवडणूक लढवण्याची अनुमती देऊ नये, अशी मागणी बिलाल यांनी केली आहे.

माझ्यासमवेत जे झाले, ते तुमच्यासमवेतही होऊ शकते ! – साध्वी प्रज्ञासिंह

भोपाळ – आम्ही धर्मयुद्धासाठी निघालो आहोत. काँग्रेसने मला दिलेली ‘भगवा आतंकवाद्या’ची संज्ञा, हेच निवडणुकीचे मुख्य सूत्र असेल. माझ्यावर आतंकवादाचा आरेाप करून माझा अमानुष छळ करण्यात आला. माझ्यासमवेत जे झाले, ते तुमच्यासमवेत होणार नाही, याची काय शाश्‍वती ?, असा प्रश्‍न साध्वी प्रज्ञासिंह यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्वीट करतांना म्हटले, ‘भगवा आतंकवाद’ या शब्दाचे निर्माते असणारे दिग्विजय सिंह यांच्या विरोधात प्रज्ञासिंह यांना आम्ही निवडणुकीत उतरवले आहे.’


Multi Language |Offline reading | PDF