हिंदुद्वेषी डावे !

संपादकीय

हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य लाथाडणारी घटना केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या सभेमध्ये घडली. कट्टाकडा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सभास्थानाच्या जवळ असलेल्या एका देवीच्या देवळामध्ये उत्सव चालू होता. या उत्सवाच्या अंतर्गत देवळामध्ये ध्वनीक्षेपकावर नामजप करण्यात येत होता. भाषण करण्यास उभे राहिलेले पिनराई विजयन् यांना मात्र तो नामजप असह्य झाला. नामजप कानावर पडत असल्याने अस्वस्थ झालेले विजयन् यांनी मग व्यासपिठावर उपस्थित कार्यकर्त्यांकडे ‘हे काय चालले आहे ?’ असा त्रागा करत संकेतात्मक विचारणा केली. प्रश्‍नार्थक शब्दांच्या आडून सोडलेला फतवा शिरसावंद्य मानणार्‍या मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी मग लगेचच व्यासपिठावरून उतरून मंदिराकडे धाव घेतली आणि मंदिरातील ध्वनीवर्धकाचा वीजपुरवठा खंडित करून टाकला. मंदिर परिसरात होत असलेला नामजप अरेरावीने बंद पाडणे, ही लोकशाहीची गळचेपी नाही का ? हा हिंदूंवर झालेला अन्याय नव्हे का ? ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांची गुंडगिरी नव्हे का ? हे लोक म्हणजे ऋषिमुनींच्या यज्ञात विघ्ने आणणार्‍या पूर्वीच्या असुरांचीच कलियुगातील रूपे नव्हेत का ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे होकारार्थी आहेत; पण ती देण्याचे अथवा तसे प्रश्‍न विचारण्याचे धाडस लोकशाहीची टिमकी वाजवणार्‍यांमध्ये नाही. हिंदूंचे उघडउघड दमन होऊनही कोणीही या विरोधात चकार शब्द काढायला सिद्ध नाही. ‘लोकशाही आणि घटना संकटात आहे’, अशी आरोळी देणार्‍या ६०० कलावंतांची टोळीही या प्रकरणी चिडीचूप आहे. या घटनेचे वार्तांकन करणार्‍या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला साम्यवादी गुंडांनी धमकावूनही या प्रकरणी प्रसारमाध्यमे विस्तृत बातमी द्यायला सिद्ध नाहीत. ना कुठे चर्चा होत आहे, ना निषेधाचे सूर उमटत आहेत ! उलट डाव्या लोकशाही आघाडीनेच या प्रकरणी मंदिरातील ध्वनीवर्धक ‘ऑपरेटर’ आणि पोलीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या उन्मादामागे राजकीय व्यत्ययाच्या भावनेपेक्षाही ‘हिंदुद्वेष’ हेच कारण आहे, हे उघड आहे. मंदिरातील नामजप बंद पाडणारे लोक मशिदींवरील भोंग्यांना हात लावण्याचा अथवा चर्चमध्ये चालणारी प्रार्थनावजा गाणी थांबवण्याचा विचारही करू शकत नाहीत, हे नमूद करण्यासारखे सूत्र !

हिंदुविरोधी साम्यवाद !

हा प्रश्‍न केवळ ध्वनीवर्धकापुरता मर्यादित नाही, तर येथे हिंदूंचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. केरळमध्ये हिंदूंच्या होणार्‍या दडपशाहीची ही काही पहिली घटना नाही. याआधीही अनेक वेळा तेथे हिंदूंना दुटप्पी वागणूक देण्यात आली आहे. राष्ट्रप्रेमी हिंदूंच्या हत्याकांडामध्ये सहभाग, अन्वेषणामध्ये कुचराई, शबरीमला येथील अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात घुसून हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा मोडणार्‍या नास्तिकतावादी महिलांना दिलेले संरक्षण अन् अय्यप्पा स्वामींचा नामजप करत आंदोलन करणार्‍या निःशस्त्र आंदोलकांवर केलेला लाठीमार, ननवर बलात्कार करणारा बिशप फ्रँको मुलक्कल याच्यावर गुन्हे नोंदवण्यात केलेली दिरंगाई अशी कितीतरी पापे केरळचे साम्यवादी सरकार अन् पोलीस-प्रशासन यांच्या माथी आहेत. कर्मफल सिद्धांतानुसार भगवंत या कुकर्मांची फळे जी असतील, ती संबंधितांना देईल; पण हिंदूंनी किमान निवडणुकीच्या निमित्ताने का होईना संघटितपणाचा आविष्कार दाखवत हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचा द्वेष भिनलेल्या राजकारण्यांना सत्ताच्युत करणे आणि अन्यायाच्या विरोधात वैध लढा देणे अपेक्षित आहे.

साम्यवादी माणसे ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, या (कु)विचारावर अंधश्रद्धा ठेवून चालतात. सनातन धर्माचा द्वेष हा या विचाराचा परिपाक आहे. वास्तविक साम्यवादाची विचारसरणीच निसर्गविरोधी आहे. निसर्गातील कोणत्याही दोन व्यक्ती एकसारख्या नसतांना साम्यवादाची भाषा करणे हास्यास्पद आहे. गमतीशीर विरोधाभास म्हणजे समानता, साम्यवाद यांचा जप करणारी ही मंडळी हिंदु धर्माकडे मात्र समभावाने पहायला सिद्ध नाहीत. त्यांना हिंदु धर्माला पाण्यातच पहायचे आहे. म्हणून ही अनैसर्गिक विचारधाराच भारतातून उखडून टाकण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जणांनी मुसलमानांची अजान (प्रार्थना) चालू झाल्यावर त्यांची राजकीय भाषणे अजान संपेपर्यंत थांबवल्याचे प्रसंग आहेत. मुसलमान संघटित असल्याने त्यांच्या अजानला सन्मान मिळतो; मात्र हिंदू असंघटित असल्याने हिंदूंच्या प्रार्थना बंद पाडल्या जातात. हिंदूंनो, किती काळ हा अन्याय सहन करणार आहात ? धर्म ही अफूची गोळी नाही, तर ‘तेजस्वी गोळा’ आहे, याचा प्रत्यय देण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्या.

हिंदु धर्माविषयी तुच्छभाव !

निवडणूक काळातील प्रचाराच्या वेळी हिंदूंच्या हेटाळणीची पुष्कळ उदाहरणे आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी ‘हिंदु धर्म हिंसक आहे’, असे वक्तव्य केले होते. काही वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाणत्या (!) नेत्यांची ‘हिंदु आतंकवादा’चा बागुलबुवा निर्माण करण्यापर्यंत मजल गेली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा हिंदु धर्मावर टीका करणे, हा तर आवडता धंदा ! दुर्दैव म्हणजे हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या पक्षांकडूनही हिंदुत्वाला प्राधान्य न देता एक प्रकारे सनातन धर्माची अप्रतिष्ठा केली जात आहे. येन केन प्रकारेण हिंदु धर्माचा दुःस्वास करणारे हे राजकीय नेते भाषणांमधून मात्र ‘सर्वधर्मसमभावा’च्या बाता मारत असतात, हे विशेष ! पण आता जनता जागृत होत आहे. सर्वधर्मसमभावाच्या मागे दडलेला ‘हिंदु धर्माविषयीचा तुच्छभाव’ जनतेलाही दिसून येत आहे. ही जागृत झालेली जनता संघटित होईल आणि यातूनच एक दिवस सनातन धर्मावर आलेली काजळी दूर होऊन धर्माचे तेज सर्वत्र पसरेल, हे निश्‍चित !


Multi Language |Offline reading | PDF