तडीपारीची व्याख्या पोलिसांनी जनतेला सांगितली पाहिजे ! – सुनील पवार, अध्यक्ष, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, रायगड

सुनील पवार

कुडाळ – ‘तडीपार कोणाला करता येते’ याची व्याख्या पोलीस प्रशासनाने घोषित करावी, अशी मागणी शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केली आहे.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षेत येणार्‍या वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कुडाळ या तालुक्यातील राजकीय पक्षांच्या १२ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस, तसेच तडीपारीची नोटीस काही दिवसांसाठी बजावली आहे. कोणत्याही प्रकारची खात्री न करता पोलीस यंत्रणेने या नोटीसी बजावल्या आहेत, तसेच रात्रीच्या वेळी संपर्क करून ‘ताबडतोब पोलीस ठाण्यात, या अन्यथा तात्काळ तुम्ही आहात, तेथे येऊन आम्ही नोटीस बजावू’, असा कारवाईचा बडगा दाखवण्यात येतो. लोकशाहीमध्ये अशा बडग्यांमुळे संबंधितांच्या कुटुबियांचे खच्चीकरण होते. त्यामुळे पोलिसांनी ‘तडीपार कोणाला करता येते’, याची माहिती जनतेला देणे आवश्यक आहे, असे पवार यांनी सांगितले.

नोटीस बजावलेल्या काहींनी पोलिसांच्या भूमिकेविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली असून रात्री-अपरात्री संपर्क करून विचारणा केली जात असल्याचा आरोप केला आहे. ‘सकाळच्या वेळेत पोलीस ठाण्यात येतो’, असे सांगूनही पोलीस ऐकत नाही, असे काहींनी सांगितले.

कणकवली उपविभागात ३७ जणांवर तडीपारीची टांगती तलवार

कणकवली – कणकवली उपविभागाच्या अतंर्गत कणकवली, वैभववाडी, देवगड आणि मालवण या ४ तालुक्यांतील राजकीय पक्षांच्या ३७ कार्यकर्त्यांवर तडीपारीची टांगती तलवार आहे.

३७ पैंकी ३० जणांनी १७ एप्रिलला त्यांचे म्हणणे उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यासमोर मांडले, तर उर्वरित ७ जण १८ एप्रिलला त्यांचे म्हणणे मांडणार आहेत. या सर्वांवर २ दिवसांत निर्णय होणार आहे. यात तडीपारीची कारवाई होणार्‍या कार्यकर्त्यांना २१ एप्रिलला रात्री १२ वाजल्यापासून ते २३ एप्रिल सकाळी ७ वाजेपर्यंत मतदारसंघात वास्तव्य करण्यास मनाई असणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF