लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका लढवणार्‍या अनेक उमेदवारांचा संपत्ती लपवण्यावर भर ! – एडीआरचा अहवाल

पणजी, १७ एप्रिल (वार्ता.) – राज्यातील लोकसभेच्या २ मतदारसंघांची निवडणूक लढवणार्‍या, तसेच विधानसभेच्या ३ मतदारसंघांच्या पोटनिवडणुका लढवणार्‍या उमेदवारांपैकी अनेक उमेदवारांनी त्यांची सत्य माहिती न देता संपत्ती लपवण्यावर भर दिल्याचे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या अशासकीय संस्थेने दिलेल्या अहवालातील माहितीवरून स्पष्ट होत आहे. एडीआर ही संस्था देशातील निवडणुकांवर लक्ष ठेवून निवडणूक प्रक्रियेत सुधारणा व्हावी, यासाठी काम करते. (निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती देऊन प्रशासन आणि जनता यांची फसवणूक करणारे उमेदवार निवडून आल्यावर आदर्श कारभार करतील अशी अपेक्षा कशी बाळगायची ? – संपादक)

या संस्थेने गोव्यातील उमेदवारांविषयी घोषित केलेल्या तपशीलानुसार नुसार…..

१. अनेक उमेदवारांनी गेल्या ५ वर्षांतील आयकर भरणा केल्याविषयी प्रतिज्ञापत्रात माहिती दिली नाही. अनेक उमेदवारांनी खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेची त्या वेळची किमंत आता दाखवली आहे. या मालमत्तेचे सध्याचे दर काय आहेत? याविषयी सुस्पष्टता दिलेली नाही.

२. अनेक उमेदवारांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेचा तपशील योग्य पद्धतीने सादर केलेला नाही, तसेच एका उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रात स्थावर मालमत्ता आणि कर्ज याविषयीची माहिती दिलेली नाही.

३. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या मालमत्तेत वर्ष २०१४ पेक्षा आता ७५ टक्के वाढ झालेली आहे, तर गिरीश चोडणकर यांनी ३ वर्षांचा प्राप्तीकराचा तपशील सादर केलेला नाही. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अमित कोरगावकर यांनी आयकर भरणा दाखवलेला नाही. अपक्ष उमेदवार ऐश्‍वर्या साळगावकर यांच्या विरोधात पर्वरी आणि म्हापसा येथील न्यायालयांत अनेक फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत; मात्र या सर्वच प्रकरणांची नोंद केलेली नाही.

४. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील फ्रान्सिस सार्दिन यांनी त्यांच्या दोनापावला येथील बंगाल्याची किंमत वर्ष २०१९ मध्ये ४३ लक्ष रुपये दाखवली आहे, तर या बंगल्याची किंमत त्यांनी वर्ष २००७ मध्ये ३८ लक्ष रुपये दाखवली होती. एल्विस गोम्स यांच्या नावावर एकही स्थावर मालमत्ता नाही, तर त्यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे एक प्रकरण नोंद झालेले आहे. राखी प्रभुदेसाई नाईक यांच्या विरोधात धनादेश न वटल्याचा गुन्हा नोंद झालेला आहे. डॉ. कालीदास वायंगणकर यांनी ५ वर्षांचा प्राप्तीकर भरल्याची माहिती दिलेली नाही.

विधानसभा पोटनिवडणूक

१. मांद्रे मतदारसंघातील बाबी बागकर यांनी ५ वर्षांचा प्राप्तीकर भरल्याची माहिती दिलेली नाही. दयानंद सोपटे यांच्या विरोधात पेडणे पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यांनी स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचा दिनांक नोंद केलेला नाही. स्वरूप उपाख्य जयदेव नाईक यांनी पाच वर्षांचा प्राप्तीकर भरलेल्याची माहिती दिलेली नाही. जीत आरोलकर यांनी वर्ष २०१३ मध्ये ५ सहस्र चौ.मी. भूमी केवळ ९० सहस्र रुपयांत खरेदी केली, तसेच अन्य एक ६०० चौ.मी. भूमी ५ लक्ष रुपयांमध्ये खरेदी केल्याचे म्हटले आहे.

२. म्हापसा मतदारसंघातील जाशुआ डिसोझा १ कोटीहून अधिक रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सुधीर कांदोळकर यांनी वर्ष २०१२ ते वर्ष २०१६ या कालावधीत खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेची किंमत आजही तितकीच दाखवली आहे. संजय बर्डे यांच्यावर धनादेश न वटल्याचा गुन्हा आहे. शेखर नाईक यांच्या विरोधातही गुन्हा नोंद आहे. सुदेश हसोटीकर यांनी मागील ५ वर्षांच्या आयकर भरणाविषयी माहिती दिलेली नाही.

३. शिरोडा मतदारसंघातील सुभाष शिरोडकर यांनी वर्ष २००७ मध्ये पदवीधर असल्याचे, तर इतर ३ निवडणुकांच्या वेळी त्यांनी १२ वीपर्यंत शिक्षण झाल्याचे म्हटले आहे. वर्ष २००७ मध्ये त्यांनी निरंकाल आणि शिरोडा येथे स्थावर मालमत्ता असल्याचे म्हटले आहे, तर वर्ष २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे कोणतीही कृषीविषयक आणि व्यावसायिक स्वरूपाची भूमी नसल्याचे म्हटले आहे. दीपक ढवळीकर यांनी १२ कोटी रुपये कर्ज असल्याचे म्हटले आहे. तसेच वर्ष २०१७-१८ मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात प्राप्तीकर भरला आहे. महादेव नाईक यांनी काही माहिती अपूर्ण दिलेली आहे. योगेश खांडेपारकर यांच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now