‘खोटे बोलून राजकीय लाभ उठवण्यासाठी वडिलांचे नाव घेण्याचा असंवेदनशील प्रयत्न बंद करा !’

राफेल विमान कराराविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोहर पर्रीकर यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचे प्रत्युत्तर !

पणजी (गोवा), १७ एप्रिल (वार्ता.) – ‘खोटे बोलून राजकीय लाभ उठवण्यासाठी माझ्या वडिलांचे नाव घेण्याचा असंवेदनशील प्रयत्न परत झालेला आहे. ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. अशी विधाने करणे टाळावे’, असे प्रत्युत्तर स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना दिले आहे. शरद पवार यांनी नुकतेच एका ठिकाणी निवडणूक प्रचाराच्या वेळी ‘राफेल सौदा मान्य नसल्यानेच मनोहर पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रीपद सोडले’, असा आरोप केला होता. या आरोपाला अनुसरून उत्पल पर्रीकर यांनी शरद पवार यांना पत्र पाठवले असून या पत्रात ही कानउघाडणी केली आहे.

उत्पल पर्रीकर यांनी शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपले विधान ऐकून आम्हा कुटुंबियांना अत्यंत दु:ख झाले. माझे वडील जिवंत असतांना त्यांची कर्करोगाशी झुंज देत असतांना काही राजकारण्यांनी त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी वडिलांवर खोटे आरोप केले होते. माझ्या वडिलांनी या आरोपांना त्याच वेळी प्रत्युत्तर दिले होते. तुम्ही देशातील एक ज्येष्ठ नेते असून तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. माझे वडील हे प्रामाणिकपणे देशाच्या हितासाठी कार्य करत होते. त्यांनी संरक्षणमंत्रीपदी असतांना अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि यामध्ये राफेल विमानखरेदी करार याचाही समावेश आहे. यानंतर गोमंतकियांच्या आग्रहासाठी त्यांनी गोव्यात येऊन गोमंतकियांची सेवा केली. आपले वक्तव्य हे गोमंतकियांचा अपमान करणारे आहे. आपण संरक्षणमंत्रीपद भूषवलेले असल्याने ‘देशाच्या सैनिकांना काय पाहिजे’, याची आपणास माहिती असेलच. सैनिकांना बळ देण्याऐवजी काही जण चालवत असलेल्या चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमेत आपणही सहभागी आहात, ही एक खेदजनक गोष्ट आहे. माझे वडील आजाराशी झुंज देत असतांना त्यांच्या आरोग्याची चौकशीही न करणारे त्यांचे नाव राजकीय लाभासाठी वापरण्यात पुढे आहेत. आपण असे वर्तन करणे सोडावे.’’


Multi Language |Offline reading | PDF