५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा (गोवा) येथील चि. गायत्री विनय गर्गे (वय ५ वर्षे) हिचा भाव !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील  चि. गायत्री विनय गर्गे एक आहे !

चि. गायत्री गर्गे

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

फोंडा, गोवा येथील चि. गायत्री गर्गे हिचे आई-वडील आणि आजी यांना तिच्यामध्ये ईश्‍वराप्रती जाणवलेल्या भावासंबंधीची, तसेच अन्य सूत्रे पुढे दिली आहेत.  

१. ‘प.पू. आबांनी आणि श्रीकृष्णबाप्पाने मला गायत्री दिली आहे’, असे आईने सांगितल्यावर कृतज्ञताभाव जागृत होणे आणि तेव्हापासून तिला साहाय्य करणे

‘प.पू. आबांनी आणि श्रीकृष्णबाप्पाने मला गायत्री दिली आहे’, असे मी गायत्रीला सांगितले. तेव्हा तिचा कृतज्ञताभाव जागृत झाला होता. तेव्हापासून मला कधी काही अडचण आल्यास ती मला साहाय्य करते आणि सांगते, ‘‘देवबाप्पाने मला तुला साहाय्य करायलाच पाठवले आहे.’’ कधी कधी ती म्हणते, ‘‘तुझ्यासाठीच मी देवाघरून आले आहे.’’ – सौ. वेदिका गर्गे

२. विविध भावप्रयोग करणे

‘विविध प्रसंगांत ‘आता आपण काय भाव ठेवूया ?’, असे विचारून तीच आम्हाला वेगवेगळे भावप्रयोग सांगते. कधी कधी ती आम्हाला ‘घरातील ही खोली म्हणजे प.पू. आबांची खोली आहे’, असा भाव ठेवायला सांगते.’ – श्री. विनय आणि सौ. वेदिका गर्गे

३. श्रीकृष्णाशी संबंधित खेळ खेळणे

गायत्री खेळ खेळतांना ध्यानमंदिर सिद्ध करते. त्यामध्ये श्रीकृष्णाचे चित्र ठेवते. त्याच्यासाठी आसन सिद्ध करून छानसे पांघरूणही ठेवते. नंतर आम्हाला बोलावून ‘चला, आता आपण ध्यानमंदिरात नामजप करूया’, असे सांगते. ती बर्‍याच वेळा श्रीकृष्णाशी संबंधित खेळ खेळते.

४. संतांविषयीचा भाव

अ. ‘तिला प.पू. दास महाराज, सद्गुरु सिरियाक वाले, पू. हजारेकाका आणि सर्वच संत यांच्याविषयी पुष्कळ आदरभाव आहे.

आ. तिला पू. सौरभदादांकडे जायला, त्यांच्याशी बोलायला आणि त्यांना भजने म्हणून दाखवायला पुष्कळ आवडते. ती त्यांच्याशी पुष्कळ मोकळेपणाने बोलते आणि त्यांनी सांगितलेले ऐकते.

५. गायत्री खेळ खेळतांनाही सहज भजने गुणगुणत असते. विविध भजने आणि श्रीकृष्णाशी संबंधित गाणी तिला मुखोद्गत आहेत.’

– सौ. वेदिका गर्गे

६. खोलीतील श्रीकृष्णाचे चित्र, तसेच परात्पर गुरुदेव आणि संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांची पूजा करणे

‘खोलीतील पटलावर (टीपॉयवर) श्रीकृष्णाचे चित्र, तसेच परात्पर गुरुदेव अन् प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे आहेत. गायत्री ती छायाचित्रे व्यवस्थित पुसते आणि फूल वाहून प्रज्वलित न केलेल्या उदबत्तीने त्यांना ओवाळते.

७. प्रार्थना करणे

अ. रामनाथी आश्रमात जातांना आम्ही थोडे अंतर चालत जातो. तेव्हा ती सूर्यनारायण देवाला ‘मला आणि आजीला तुझे चैतन्य मिळू दे’, अशी प्रार्थना करते.

आ. ती जेवतांना अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करते आणि श्‍लोक म्हणते.

८. गोपाळकृष्णाची षोडशोपचार पूजा करतांना विविध सूचना देणे आणि त्या ऐकून भावजागृती होणे

एकदा मी आणि गायत्री भावजागृतीचा प्रयोग करत होतो. तेव्हा ‘गोपालकृष्णाला तेल लावत आहे. त्याला पंचामृताने स्नान घालत आहे. त्याला सप्तनद्यांची नावे घेऊन स्नान घालत आहे. त्या पाण्याला आधी हात लावून ‘पाणी फार गरम नाही ना किंवा गार नाही ना !’, याची निश्‍चिती झाल्यावरच बाळकृष्णाच्या अंगावर पाणी घालत आहे’, अशा प्रकारे श्रीकृष्णाची मानसपूजा करत असतांना तिने मला सूचना दिली, ‘‘अगं आजी, बाळकृष्णाच्या डोळ्यांत पाणी जायला नको; म्हणून त्याच्या डोळ्यांवर हात धर. त्याच्या नाकात आणि तोंडात पाणी जाऊ देऊ नकोस.’’ त्यानंतर बाळकृष्णाची अंघोळ झाल्यावर ‘मऊ कापडाने त्याचे अंग पुसणे, पावडर लावणे, तीट लावणे, छानपैकी मऊ रेशमी झबले-टोपडे घालणे’, असे करून झाले. त्याला खाऊ देऊन पाळण्यात ठेवले. मी झोका द्यायला लागल्यावर ती म्हणाली, ‘‘थांब, ‘हा बाळ टिळक माझा…’ अन् ‘कुलभूषणा दशरथनंदना…’, हे पाळणे म्हणून मग श्रीकृष्णाला झोपवूया.’’ एवढ्याशा छोट्या मुलीने असे सांगितल्यावर माझा भाव जागृत झाला.’

– श्रीमती अनुराधा गर्गे

९. गायत्रीच्या सांगण्यानुसार कृती केल्यास लाभ झाल्याचे लक्षात येणे

‘बर्‍याच वेळा गायत्री मला काही गोष्टी सुचवते आणि तिच्या सांगण्यानुसार कृती केल्यास मला त्याचा लाभ होतो, उदा. एकदा आम्ही गायत्रीच्या आजीसाठी आधुनिक वैद्यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी ते व्यस्त होते. मला वाटले, ‘आपल्या वेळेत त्यांची भेट होणार नाही. पुष्कळ वेळ थांबावे लागेल.’ मी गायत्रीला ‘आपण निघूया का ?’, असे विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘पाच मिनिटे आपण खेळूया’’; म्हणून मी थांबले, तर खरोखरंच ५ मिनिटांनी त्या आधुनिक वैद्यांना भेटायला मिळाले आणि ज्या कामासाठी त्यांना भेटायला गेलो होतो, ते कामही पूर्ण झाले.

१०. जाणवलेला पालट

आम्ही रामनाथी आश्रमात आल्यावर आरंभीच्या काही दिवसांत गायत्री बर्‍याच वेळा चिडून ओरडत असे; परंतु आता हे प्रमाण बरेच अल्प झाले आहे.’

– सौ. वेदिका गर्गे

– श्रीमती अनुराधा गर्गे (८.१.२०१९)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF