प्रशासन निवडणूक कामात, शहरे मात्र ‘कोमात’ !

 नोंद

सतराव्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. काही भागात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांना प्रारंभही झाला. एप्रिल आणि मे या दोन मासांत देशभरात विविध टप्प्यांत निवडणुका होणार असल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात अडकली आहे. त्यामुळे अनेक कामांचा बोजवारा उडाला असतांना मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आपल्याकडे साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात पावसाला प्रारंभ होतो. त्यामुळे एप्रिल मासापासूनच नालेसफाईची कामे नगरपालिका, महापालिका यांना हाती घ्यावी लागतात. नालेसफाईसाठी निविदा काढल्या जातात आणि त्यानंतर कंत्राटदारांना ती कामे दिली जातात. ही प्रक्रिया तशी वेळकाढू आहे. त्यामुळे या कामासाठी पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे; मात्र ज्या काळात ही प्रक्रिया करणे आवश्यक आहे, त्या काळातच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र झाले आहेत. त्यामुळे ही कामे होणार कधी ?, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

मुंबईसह अनेक आजूबाजूच्या शहरांमध्ये छोटे-मोठे नाले आहेत. या नाल्यांतून रासायनिक आस्थापनांसमवेत नागरी वसाहतीतील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सोडले जाते. तसेच या नाल्यांमध्ये शहरातील इमारतीच्या बांधकामांच्या ‘डेब्रिज’समवेत प्लास्टिक कचराही टाकला जात आहे. महाराष्ट्रात भले जरी प्लास्टिक आणि थर्माकॉल वापराला बंदी असली, तरी आजही छोटे-मोठे दुकानदार कायदा धाब्यावर बसवून प्लास्टिक पिशव्यांमध्ये भाजी, फळे अन् तत्सम वस्तू भरून ग्राहकांना देत आहेत. या प्लास्टिक पिशव्यांमध्ये घरगुती कचरा भरून लोक नाले, कचराकुंडी येथे टाकत असल्याचे चित्र आजही अनेक ठिकाणी पहायला मिळते. या प्लास्टिक पिशव्या नाल्यात अडकल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होतो. याच प्लास्टिक पिशव्यांमुळे वर्ष २००५ च्या २६ जुलैला झालेल्या अतीवृष्टीत मिठी नदीने अवघ्या मुंबईला ‘कवेत’ घेतले होते. लाखो लोक मिठी नदीला आलेल्या महापुरात बेघर झाले होते, अनेकांचा बळीही गेला. त्यामुळे मुंबई महापालिकेला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते; मात्र त्यानंतरही राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर ज्या गांभीर्याने या प्रश्‍नाकडे पहायला हवे, तितके पाहिले जात नाही अन् ‘नेमेची येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे प्रतीवर्षी पावसाळ्यात मुंबईची ‘तुंबई’ होण्याची परिस्थिती पहायला मिळते. जी स्थिती मुंबईची, तीच ठाणे, नवी मुंबई, पनवेल या शहरांचीही आहे. त्यातच यंदा लोकसभा निवडणुका आल्याने प्रशासनाला हात वर करायला चांगलेच कारण मिळाले आहे. त्यामुळे ‘प्रशासन निवडणूक कामात आणि शहरे मात्र ‘कोमात’ असे चित्र पहायला मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now