निवडणुकांपूर्वीचा खेळ !

संपादकीय

भारतासारख्या सर्वांत मोठी लोकशाही म्हणून मिरवणार्‍या देशात निवडणुका जसजशा जवळ येऊ लागतात, तसतसे ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’ हे सूत्र अधिकाधिक ठळक होऊ लागते. या काळात लोकप्रतिनिधींकडून केल्या जाणार्‍या प्रत्येक कृतीलाच जणू ‘निवडणुकीच्या पार्श्‍वभूमी’चा रंग येतो. या वर्षीची निवडणूक आगामी आपत्काळाच्या पूर्वी असणार्‍या संधीकाळातील असल्याने कधी नव्हे एवढी ऐतिहासिक ठरणार आहे. या निवडणुकीच्या काळात पक्ष पालटणे, विकासकामांचा धडाका, टीकाटिप्पण्यांची लयलूट, घोषणापत्रांचा सपाटा, विरोधकांची सर्वतोपरी कोंडी करणे, पैशांसह विविध गोष्टींची आमिषे, सभांची रणधुमाळी हे सारे पुष्कळ आधीपासूनच चालू झाले आहे. आता तर देशातील मतदानाचा पहिला टप्पा पूर्णही झाला असतांना वरील सर्व गोष्टींतील अपप्रकारांनी त्याची कमाल मर्यादा ओलांडली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात लक्षात येणारे हे अपप्रकार पाहून लोकशाही ही राजशकट हाकण्याची पाश्‍चात्त्य पद्धत कशी निरर्थक आहे, हेच पुनःपुन्हा सिद्ध होते. अशा निरर्थक लोकशाहीला राम राम ठोकून खरे ‘राम’राज्य देणारे हिंदु राष्ट्र का हवे आहे, हे लक्षात येण्यासाठी पुढील काही अपप्रकारांचा धांडोळा पहाणे आवश्यक आहे.

अवैध कारवायांमध्ये वाढ !

बिहारमधील हाजीपूर येथे राममंदिराचा प्रश्‍न निवडणुकीत प्रचारासाठी घेऊ नये, असे जनता दल (संयुक्त)ने सांगितल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी जदयूच्या नेत्यांना व्यासपिठावरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. मानखुर्द (मुंबई) येथे गटाचे नाव न पुकारल्याच्या क्षुल्लक कारणावरून शाब्दिक चकमक होऊन वाद वाढला आणि भाजपच्या दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. अमळनेर (जळगाव) येथे महायुतीच्या मेळाव्यात भाजपच्या माजी आमदारांनाच जिल्हाध्यक्षांच्या गटातील कार्यकर्त्यांनी जोरदार मारहाण करणे चालू केले. वर्गातील मुलांप्रमाणे मारामारी करणारे पक्ष कार्यकर्ते समाजातील हिंदूंवरील खरोखरच्या अन्यायाविरुद्ध मात्र कधी लढतांना दिसत नाहीत, हे या लोकशाहीचे दुर्दैव आहे.

उत्तरप्रदेशमधील बुलंदशहर येथे ४०५ अवैध हत्यारे, ७३९ कार्ट्रिज, २ कोटी रुपयांचे मद्य, दीड कोटींची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. महाराष्ट्रातही कोट्यवधी रुपयांसह सोने, मद्य आदींची वाहतूक होतांना पकडली जात आहे. कोल्हापूर येथे शिरोली नाक्यावर ६३ लाख, तर मोहोळ (सोलापूर) येथे २३ लाख ५० सहस्र रुपये जप्त केले. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून आजवर ९७ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. केंद्रीय कर संचालक मंडळाने (सीबीडीटीने) दिलेल्या माहितीनुसार एका संघटित टोळीने व्यावसायिक, नेते आणि नोकरशहा यांच्या माध्यमातून २८१ कोटी रुपये जमवले होते. त्यातील २० कोटी रुपये देहलीच्या तुघलक रस्त्यावरील ज्येष्ठ पक्ष पदाधिकार्‍याच्या घरातून एका मोठ्या पक्षाच्या मुख्यालयात पाठवले. हे सारे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घडले आहे. अशाच अन्य काही कोटींच्या रकमा हालवल्याचे पुरावे मिळाले आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या स्वीय सचिवांच्या निवासस्थानी, तसेच पक्ष कार्यालयांवरील धाडीत ९ कोटी रुपये, तेलंगणात भाजपच्या नेत्याकडून ८ कोटी रुपये जप्त करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेचा उद्देशच फोल ठरवणारी मतांसाठी आमिषे दाखवण्याची ही पद्धत निरर्थक लोकशाहीचेच द्योतक नव्हे का ?

खालावलेला नैतिक स्तर !

निवडणुका जवळ आल्यावर हिंदूंची आठवण सर्वांनाच येते. भाजपच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी ‘हिंदु आतंकवादा’चा आरोप केल्याविषयी काँग्रेसला दुषणे दिली. भाजपच्या नेत्यांप्रमाणे राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा याही मंदिरांत जाऊन दर्शन घेऊ लागल्या. शेवटी अहिंदु प्रियांका वाड्रा यांनी काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात प्रवेश केल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पुरो(अधो)गामी म्हणून शेखी मिरवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांना ‘पादत्राणे घालून मंदिरातील गणेशमूर्तीला हार घालत आहोत’, याचेही भान राहिले नाही. हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या भोंदू ख्रिस्ती धर्मगुरूंकडे जाऊनही त्यांनी आशीर्वाद घेतले. एक वाक्यही धड बोलू न शकणारे पार्थ यांचे वडील त्यांच्यासाठी मतदारांना कळवळून सांगत आहेत, निदान ‘अविवाहितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पार्थ पवार यांना निवडून द्या !’ यापेक्षा लोकशाहीची विदारक स्थिती ती काय असू शकते ?

वंचित बहुजन आघाडीचे समर्थक प्रमोद गायकवाड यांनी भरसभेत ‘नई जिंदगी’ या मुसलमानबहुल परिसराला ‘आपला छोटा पाकिस्तान’ असे संबोधल्याच्या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्या विरोधात आचारसंहितेच्या भंगाचा गुन्हा नोंद केला. काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही ‘हिंदु धर्म सर्वांत हिंसक धर्म आहे’, असे म्हणून अकलेचे तारे तोडल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा नोंद झाला. माकपचे जयदीप कवाडे यांनी केंद्रीयमंत्री स्मृती इराणींविषयी ‘घटना पालटणे नवरा पालटण्याएवढे सोपे नाही’ असे अश्‍लील वक्तव्य केले. या सर्वांवर कहर म्हणजे समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी जयाप्रदांविषयी अत्यंत अश्‍लील द्वैअर्थी टिपणी करून स्वतःचा स्तर किती खालचा आहे, हे दाखवून दिले. राहुल गांधी यांनीही उतावळेपणाने ‘चौकीदार चोर आहे’, असे म्हटल्याने न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे.

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी विचारांच्या पक्षांतील नेते फुटून दुसर्‍या पक्षात गेले. राष्ट्रवादी काँग्रेसने मुसलमानांचे लांगूलचालन करणारे, तर काँग्रेसने चक्क आतंकवाद्यांचेच लांगूलचालन करणारे घोषणापत्र सिद्ध केले आहे. सत्तापिपासू वृत्तीमुळेच त्यांनी अशी कृती केली आहे. हे पहाता लोकशाहीचे भयावह चित्र उभे करणारी ही स्थिती पालटण्यासही धर्मनिष्ठांचे हिंदु राष्ट्र हवे, यावर सुजनांचे तरी एक‘मत’ व्हावे !


Multi Language |Offline reading | PDF