दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीच्या द्विदशकपूर्ती वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे उद्बोधक विचार आणि वाचकांचे मनोगत

हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी यांच्यावर ‘वैचारिक सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ अखंडपणे चालू ठेवील ! – अरविंद पानसरे

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २० वा वर्धापनदिन सोहळा डिचोली येथील दिनदयाळ भवन येथे १४ एप्रिल या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला. सोहळ्याचे प्रमुख पाहुणे भारत स्वाभिमानचे श्री. कमलेश बांदेकर आणि श्री. रमेश नाईक यांचे मार्गदर्शन १५ एप्रिलच्या दैनिकात आपण पाहिले. आज आपण ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे आणि हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांचे मार्गदर्शन आणि वाचकांचे मनोगत पाहूया !

१. एकही सुट्टी न घेता वर्षातील ३६५ दिवस निघणारे एकमेव ‘सनातन प्रभात’ !

पूर्वी मुद्रित स्वरूपात असणारी पत्रकारिता काही प्रमाणात तरी विश्‍वासार्ह होती, मात्र नंतर आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर (२४ वृत्त घंटे वृत्त दाखवणार्‍या वृत्तवाहिन्यांवर) ‘झटपट’ आणि ‘सबसे तेज’ बातम्या दाखवण्याच्या नावाखाली खात्री न करता सर्रासपणे चुकीची, अर्धवट, अभ्यासहीन, विद्वेषी अन् विपर्यस्त वृत्ते दाखवल्यामुळे पत्रकारितेचा दर्जा पूर्णपणे खालावला. कांची कामकोटी पिठाचे पीठाधीश्‍वर स्वामी जयेंद्र सरस्वती यांच्यावर शंकर रमण याच्या हत्येचा आरोप झाल्यावर या वाहिन्यांनी काही दिवस २४ घंटे मानहानी केली; मात्र त्यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाल्यावर केवळ एक ओळीची तळपट्टी दाखवून वृत्त प्रसारित करण्यात आले. अशा प्रकारे अनेकांचे आयुष्य या वृत्तवाहिन्यांनी उद्ध्वस्त केले आहे. आता तर इंटरनेट मीडिया (सामाजिक संकेतस्थळे) आला आहे. त्यात फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, ब्लॉग, ऑनलाइन पोर्टल यांचा समावेश असून त्यातून सर्वांत लवकर बातमी लोकांपर्यंत पोेचते; मात्र त्यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे आणि कोणीही व्यक्ती त्याचा हवा तसा वापर करत असल्यामुळे आज सामाजिक संकेतस्थळावर येणारी ९० प्रतिशतहून अधिक वृत्ते खोटी, दिशाभूल करणारी आणि संभ्रम निर्माण करणारी असतात.

अशा सध्याच्या ‘पेड न्यूज’ (पैसे देऊन बातम्या छापणे) अन् ‘फेक न्यूज’(खोट्या बातम्या छापणे) काळात ‘सनातन प्रभात’च्या सत्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ पत्रकारितेचे वेगळेपण उठून दिसते. अन्य वर्तमानपत्रे वर्षातून ४-५ तरी सुट्ट्या घेतात; मात्र वर्षातून एकही सुट्टी न घेता ३६५ दिवस राष्ट्र आणि धर्म यांसाठी ‘सनातन प्रभात’ प्रकाशित होत असते. ‘राष्ट्र आणि धर्म यांचे विचार वाचकांपर्यंत पोचावेत, ते जागृत व्हावेत’, हाच त्यामागील उद्देश असतो. त्यात ‘सनातन प्रभात’च्या संपादकांपासून ते वितरकांपर्यंत कोणीही वेतन घेत नाही. त्यागी वृत्ती असलेले साधक ही आमची शक्ती आहे आणि भक्ती हा आम्हा साधकांचा श्‍वास आहे. त्यामुळे अवघ्या १९ वर्षांत ‘सनातन प्रभात’च्या विचारांची नोंद घेतली जाऊ लागली आहे.

‘सनातन प्रभात’साठी कार्य करणारे सर्व जण नि:स्वार्थपणे तन, मन आणि धन अर्पण करून राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी अखंड कार्यरत आहेत; कारण तसे संस्कार ‘सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केले आहेत. स्वातंत्र्यापूर्वीच्या नेत्यांनी समाजाला त्याग आणि समर्पण शिकवले, तर स्वातंत्र्यानंतरच्या नेत्यांनी स्वार्थ आणि भोग शिकवले. त्याग, आत्मसमर्पण, ध्येयनिष्ठा या संकल्पना कालबाह्य होतात कि काय, अशी स्थिती असलेल्या काळात गुरुदेवांनी त्याच गुणांचे बीजारोपण सहस्रो साधकांमध्ये केले. ‘सनातन प्रभात’ची पत्रकारिता आदर्शवत् बनण्यासाठी हेच गुण कारणीभूत ठरले आहेत.

२. ‘सनातन प्रभात’चे दायित्व !

सध्या ‘ब्रेकिंग न्यूज’चे दिवस असतांना ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आयपीएल् क्रिकेट सामन्यांमध्ये कोणता संघ जिंकला’ किंवा ‘कोणत्या अभिनेत्रीने कोणत्या अभिनेत्याशी विवाह केला’ अशा समाजाशी कोणतेही देणेघेणे नसलेल्या बातम्यांना स्थान नाही. त्याऐवजी हिंदूंच्या आणि राष्ट्रप्रेमींच्या दैनंदिन जीवनाशी निगडित समस्या, संरक्षण, आपत्काळात तरून जाण्यासाठी समाजाने करावयाचे उपाय यांच्याशी निगडित बातम्या, तसेच लेख यांना ‘सनातन प्रभात’मध्ये स्थान आहे. पुढेही याच बातम्यांना स्थान राहील !

३. ‘सनातन प्रभात’च्या द्रष्टेपणाची प्रचीती !

३ अ. मंदिर सरकारीकरणाविषयी सर्वोच्च न्यायालयाचे मत ! : प्राचीन काळापासून आपल्या देशात मंदिराला दान देण्याची परंपरा आहे; मात्र देशात निधर्मी शासनव्यवस्था आल्यावर केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांना लुटण्याचा एककलमी कार्यक्रम चालू झाला. ‘सनातन प्रभात’ने सरकारच्या कह्यात असलेल्या सर्व मंदिरांतील भ्रष्टाचार पुराव्यानिशी उघड केला. आज सरकारीकरण झालेल्या मंदिरातील भ्रष्टाचार पहाता सर्वोच्च न्यायालयानेही ‘मंदिरांचे नियंत्रण भक्तांकडेच असावे, ते सरकारचे काम नाही !’, असे वक्तव्य ९ एप्रिल २०१९ या दिवशी केले आहे. त्यामुळे ‘सनातन प्रभात’ने मांडलेल्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे मान्यताच दिली आहे.

३ आ. ‘सनातन प्रभात’च्या द्रष्टेपणाची हिंदूंना प्रचीती ! : ‘सनातन प्रभात’मध्ये सतत व्यवस्था आणि राजकीय पक्ष यांवर टीकाच केली जाते. ‘तुम्हाला चांगले काही दिसतच नाही का ?’ किंवा ‘अमूक एका राजकीय पक्षाला तुम्ही ‘टार्गेट’ (लक्ष्य) का करता ?’ असे प्रश्‍न काही जणांकडून आम्हाला विचारण्यात येतात. मुळात ‘सनातन प्रभात’ कोणी व्यक्ती, पक्ष वा संघटना यांच्यावर वैयक्तिक द्वेषापोटी टीका करत नाही. एका राज्यकर्त्याकडून छोटीशी जरी चूक झाल्यास ती संपूर्ण समाजाला महागात पडते. त्यामुळे तत्त्वनिष्ठपणे राष्ट्र आणि धर्म यांच्या बाजूने उभे राहून आणि न्यायशास्त्री रामशास्त्री प्रभुणे यांच्याप्रमाणे बाणा ठेवून ‘सनातन प्रभात’ भूमिका मांडते. किंबहुना सत्ताधारी आणि राजकारणी यांच्या चुका दाखवणे, हेच वृत्तपत्रांचे कर्तव्य असते. ते ‘सनातन प्रभात’ पार पाडत आहे.

४. सत्यनिष्ठ ‘सनातन प्रभात’ !

४ अ. ‘सनातन प्रभात’च्या संपादकांना लक्ष्यकरणे ! : सत्याच्या, धर्माच्या बाजूने उभे रहाणार्‍यांना अनेक संकटांना आणि विरोधांना सामोरे जावे लागते, हा इतिहास आहे. ‘सनातन प्रभात’ याची प्रचीती वर्ष २००६ पासून घेत आहे. ‘सनातन प्रभात’चे तत्कालीन संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांना काही जात्यंध शक्तींच्या दबावावरून अटक करण्यात आली. त्यांना आतापर्यंत ४ वेळा अटक करण्यात आली आहे.

‘सनातन प्रभात’वर दबाव आणण्यासाठी डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणात ‘सनातन प्रभात’चे माजी संपादक कै. शशिकांत राणे यांच्या मागे पोलिसी ससेमिरा लावण्यात आला; मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. वर्ष २०१९ मध्ये कै. राणे यांच्यावर कर्नाटकातील काँग्रेस शासनाने गौरी लंकेश हत्येसाठी ‘फंडिंग’(अर्थपुरवठा) केल्याचा खोटा आरोप केला आहे. कै. राणे उत्तर द्यायला हयात नसतांना असा आरोप करणे हे अन्यायकारक असून ते नैसर्गिक न्यायाला धरून नाही. ‘धर्मपरायण साधकवृत्तीचे निःस्वार्थी संपादक म्हणून ज्यांनी हयात घालवली, अशा व्यक्तीला मृत्यूनंतर आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍यांचा न्याय भगवंत करील’, हे त्यांनी लक्षात ठेवावे. निधर्मी राज्यव्यवस्थेने आमच्यावर अन्याय केला, आमची मुस्कटदाबी केली, तरी ‘धर्मो रक्षति रक्षित: ।’ या न्यायाने धर्म आमच्यावर अन्याय करणार नाही. भविष्यात आमच्यावरील सर्व दूषणे दूर झालेली असतील आणि परिष्कृत हिंदुत्वाच्या तेजाने ‘सनातन प्रभात’ तळपत असेल, हे निश्‍चित !

४ आ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘विचारांचे फंडिंग’ (वैचारिक बळ)! : ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध’ हे ‘सनातन प्रभात’चे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे ‘सनातन प्रभात’ हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैधानिक मार्ग कार्य करण्यासाठी ‘विचारांचे फंडिंग’ (वैचारिक बळ)’ करते. हेच विरोधकांचे खरे दुखणे आहे; मात्र ‘कर नाही त्याला डर कशाला’ या उक्तीप्रमाणे ‘सनातन प्रभात’ अशा चौकशांना न घाबरता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे वैचारिक फंडींग चालूच ठेवील.

‘सनातन प्रभात’चे आणखीन वैशिष्ट्य म्हणजे लोकांना धर्मशिक्षण देणे ! १९४७ या वर्षी भारत स्वातंत्र झाल्यावर एकाही वृत्तपत्राने लोकांना धर्मशिक्षण दिले नाही. पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय, हे धर्म सांगतो. पाप केले, तर मृत्यूनंतर व्यक्तीला दुर्गती प्राप्त होते. ‘सुखस्य मूलः धर्म:।’ असे शास्त्रांत सांगितले आहे; म्हणजे धर्माचरण केले तरच खरे आणि शाश्‍वत सुख मिळते. हे लोकांना माहिती नसल्यामुळे आयुष्यभर पापकर्मे करत रहातात. उदाहरणार्थ एखादा किरणामालाचा दुकानदार धान्यात भेसळ करून पाप करतो, तर पीडित रुग्णांकडून अधिक पैसे घेणारे डॉक्टरही (आधुनिक वैद्यही) पाप करतात. धर्मशिक्षण न मिळाल्यामुळे जनतेची अशी स्थिती झाली आहे. हे टाळण्यासाठी धर्मशिक्षण देणारे ‘सनातन प्रभात’ हे एकमेव वृत्तपत्र आहे. धर्म जाणून घेण्यासाठी ‘सनातन प्रभात’चे वाचक होणे आवश्यक आहे.

४ इ. समाज धर्माशी जोडला जाणे, हेच ‘सनातन प्रभात’च्या पत्रकारितेचे यश ! : पत्रकारितेच्या क्षेत्रात कोणाला ‘सर्वाधिक खपाचे दैनिक’ बनायचे आहे, तर कोणाला ‘लोकांच्या सर्वाधिक पसंतीची वृत्तवाहिनी’ व्हायचे आहे. ‘सनातन प्रभात’ने हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करतांना ‘धर्मप्रेमाने ओतप्रोत भारलेल्या किती तरुणांची फळी निर्माण झाली’, ‘किती वाचक धर्मकार्याशी जोडले गेले’, ‘किती वाचक धर्मविरोधी कारवायांच्या विरोधात वैध मार्गाने रस्त्यावर उतरले’, ‘किती जणांनी साधनेला आरंभ केला’, हे यशापयशाचे मापदंड ठरवले आहेत. येथे सांगण्यास आनंद होत आहे की, ‘सनातन प्रभात’चे असंख्य वाचक हे धर्मकार्याशी जोडले गेले आहेत आणि साधना करून प्रगती करत आहेत. हे ‘सनातन प्रभात’चे यशच मानावे लागेल.

५. हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेद्वारे हिंदूसंघटन आणि साधनेसाठी मार्गदर्शन, हे ‘सनातन प्रभात’चे भविष्यकालीन कार्य !

सर्व हिंदूंना एका छत्राखाली आणणारा, त्यांच्यात अस्मिता जागृत करणारा, त्यांना ऊर्जा देणारा एकमेव धागा म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होय. ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दातच अशी शक्ती, प्रेरणा आहे, जिच्यात हिंदूंना संघटित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे येत्या काळात हिंदु राष्ट्राचा उद्घोष होतच राहील. येणारा काळ हा राष्ट्रासाठी, तसेच समस्त मानवजातीसाठी अत्यंत कठीण काळ आहे. या घोर आपत्काळातून तरून जायचे असेल, तर साधनेला पर्याय नाही. या आपत्काळातून तरून जाण्यासाठी हिंदूंना अधिकाधिक साधना करण्यावाचून पर्याय नाही. हिंदु समाजामध्ये साधनेचे महत्त्व बिंबवणे आणि त्यांची आपत्काळासाठी सिद्धता करणे, हेही ‘सनातन प्रभात’चे भविष्यकालीन कार्य असेल.

६. वैचारिक क्रांती करणार्‍या ‘सनातन प्रभात’ची इतिहासात नोंद होईल !

विचार पालटले की, कृती आपोआप पालटते; कारण विचारांमध्ये जग पालटण्याची क्षमता असते. कार्ल मार्क्स याने कुठेही धरणे, मोर्चा किंवा आंदोलने केले नाहीत. त्याने ७ देशांमध्ये कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी दैनिके चालू केली आणि त्या देशांमध्ये क्रांती घडवून आणली. त्यांचे विचार चुकीचे असले, तरी विचारांमधील अचाट शक्ती त्याने जाणली. जगभरात जिथे जिथे क्रांती झाली, मग ती रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती असो, तेथे आधी वैचारिक परिवर्तन झाले, मग कृती झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही आधी समाजाचे वैचारिक परिवर्तन केले गेले. हीच गोष्ट जाणून ‘सनातन प्रभात’ने शब्दयज्ञ आरंभला. यातून प्रखर तेजस्वी विचार प्रसारित होेत आहे. त्यामुळे समाजात पालट होत आहे. स्वातंत्रलढ्यात दैनिक ‘केसरी’ने समाजात वैचारिक क्रांती करण्याचे दायित्व पार पडले. हिंदु राष्ट्रासाठी उभारण्यात आलेल्या या स्वातंत्र्यलढ्यात हीच भूमिका बजावण्याचे दायित्व ‘सनातन प्रभात’ पार पाडत आहे.

सध्याचा काळ हा ‘सर्जिकल स्ट्राईक’चा आहे. शत्रूचा निःपात करण्यासाठी असे ‘स्ट्राईक’ वारंवार करावे लागतात. ‘सनातन प्रभात’वर कितीही संकटे आली, तरी हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी यांच्यावर ‘वैचारिक सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ अखंडपणे चालू ठेवील, हे निश्‍चित !

आचारसंहिता केवळ हिंदूंच्या सणालाच लागू आहे का ? – सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती

गोव्यात सध्या निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. या निवडणूक आचारसंहितेमुळे हिंदूंच्या सणांवर गदा आणली जात आहे. आचारसंहितेमुळे गोव्यातील पारंपरिक शिमगोत्सव रात्री १० वाजल्यानंतर बंद करण्यात आले. राज्यातील शासकीय शिमगोत्सव मिरवणुकांची संख्या घटवण्यात आली. वास्को येथे गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदु नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ तेथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पहाटे ५ वाजता आयोजित केलेल्या शोभायात्रेला शासनानेे अनुज्ञप्ती नाकारून ती सकाळी ६ वाजता ठेवण्यास भाग पाडले; मात्र पहाटे ५ वाजता वास्को शहरात मशिदींतून भांग देण्यात आली आणि यावर शासनाने कोणतेही निर्बंध लादले नाही. वरचा बाजार, फोंडा येथील श्री विठोबा मंदिराच्या कार्याक्रमालाही आचारसंहितेमुळे अडथळा निर्माण झाला. मंदिर व्यवस्थापनाने याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवलेली आहे. यामुळे आचारसंहिता केवळ हिंदूंच्या सणालाच लागू आहे का ? असा प्रश्‍न पडतो.

भ्रष्टाचार अन् फसवणूक यांच्या विरोधात लढा !

दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच पेट्रोल-डिझेल हेसुद्धा दैनंदिन जीवनासाठीतील आवश्यक घटक बनला आहे. त्यातच भारतात बहुतांश ठिकाणी पेट्रोल अल्प देणे, तसेच भेसळयुक्त पेट्रोल देणे आदी माध्यमांतून नागरिकांची नित्य फसवणूक होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. सध्या सर्वसामान्य ग्राहकांना प्रतीदिन अनेक छोट्या-छोट्या गोष्टींतही लुटले जात आहे. हिंदु जनजागृती समिती अशा भ्रष्टाचार अन् फसवणूक यांच्या विरोधात लढा देत आहे. यावर ठोस उपाययोजना काढण्यात यावी यासाठी एक महत्त्वाचा उपाय म्हणून ‘पेट्रोलपंपांवर ज्या पाईपमधून हे पेट्रोल किंवा डिझेल वाहनामध्ये भरले जाते, तो पारदर्शक करावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने संबंधित प्रशासनाकडे केली आहे. ग्राहकांची फसवणूक आणि भेसळ करणार्‍या पंपचालकांवर ‘ग्राहक संरक्षण कायद्या’अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

द्विदशकपूर्तीच्या सोहळ्यात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रारंभीपासूनच्या नियमित वाचक सौ. वनिता चिमुलकर यांनी व्यक्त केलेले मनोगत !

दैनिक ‘सनातन प्रभात’ ही आनंदाची खाण !

‘सनातन प्रभात’मुळे मला नामजपाचे महत्त्व कळले. यामुळे मी दत्ताचा जप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करते. गतवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने रामनाथी, फोंडा येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचा मला योग आला. या वेळी सनातनच्या आश्रमातील चैतन्यामुळे मी भारित झाले आणि सनातनच्या कार्याविषयी एक वेगळीच ओढ माझ्यात निर्माण झाली. यानंतर मला गुरुपौर्णिमेची सेवा करण्याची संधी मिळाली आणि यानंतर साधना करण्याची मनाची सिद्धता झाली. साधना करायला लागल्यानंतर ‘सनातन प्रभात’मधून साधनेविषयी मार्गदर्शन मिळू लागले. ‘सनातन प्रभात’चे वाचन केल्याने मला सेवेची ओढ निर्माण झाली. ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र नसून ते माझ्यासाठी ईश्‍वराचे एक रूप आहे. ‘सनातन प्रभात’ हे समाजाला सत्य आणि निर्भीडता शिकवते. यामधून अध्यात्म आणि धार्मिक उत्सव यांविषयी सखोल माहिती मिळते. असे हे दैनिक घरोघरी जाणे, ही काळाची आवश्यकता आहे. ‘सनातन प्रभात’चे महत्त्व मला समजल्यानंतर मी सण किंवा अन्य वेळी प्रसिद्ध होत असलेल्या ‘सनातन प्रभात’ विशेषांकाची मागणी करून त्याचे स्वत: जाऊन समाजात वितरण करते. ‘सनातन प्रभात’मुळे मला यंदा ‘गुढी कशी उभारावी’, याविषयी माहिती मिळाली. ही माहिती वाचून घरी त्याप्रमाणे आम्ही घरी गुढी उभारली. या दिवशी मी ‘सनातन प्रभात’ गुढीपाडवा विशेषांकाच्या २० अंकांची मागणी करून हा विशेषांक समाजात वितरित केला. विशेषांक देतांना मी प्रसाद म्हणून कडुनिंबाचा प्रसादही देऊन सर्वांना हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ही सेवा करतांना मला मिळालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. दैनिक ‘सनातन प्रभात’ ही आनंदाची खाण आहे, याची प्रचीती मला आली.

‘सनातन प्रभात’चे मी नियमित वाचन करतो आणि महत्त्वाच्या कात्रणांचा संग्रह करतो ! – नारायण कुडके, ‘सनातन प्रभात’चे वाचक, डिचोली

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या द्विदशकपूर्ती सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे सौभाग्य मला लाभले. ‘धर्माची ग्लानी दूर करून धर्मसंस्थापना करणे’ हे भगवान श्रीकृष्णाचे ब्रीदवाक्य आहे आणि ‘सनातन प्रभात’तही हेच कार्य करत आहे. सध्याची स्थिती पहाता ‘सनातन प्रभात’ने देवाचा अवतार घेतला आहे, अशी माझी ठाम धारणा झालेली आहे आणि मग अशा ‘सनातन प्रभात’ला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्याऐवजी नमन करणेच योग्य होईल ! ‘सनातन प्रभात’चे मी नियमित वाचन करतो आणि ‘सनातन प्रभात’च्या महत्त्वाच्या कात्रणांचा मी संग्रहही केला आहेे.


Multi Language |Offline reading | PDF