हीच का पक्षीय शिस्त ?

नोंद

‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ १० एप्रिल या दिवशी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे भाजप-शिवसेना महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला आरंभ होताच व्यासपिठावर जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार डॉ. बी.एस्. पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये भाजपचे काही कार्यकर्तेही सहभागी झाले. या विषयीचा ‘व्हिडिओ’ सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे देशभर प्रसारित (व्हायरल) झाला. डॉ. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी वाघ यांच्या पत्नी सौ. स्मिता वाघ यांच्याविषयी जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे ही मारहाण झाल्याचे समजते; मात्र राग व्यक्त करण्याचे हे ना स्थळ होते ना पद्धत ! वाघ हे स्वतः जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांनी डॉ. पाटील यांच्याविषयी पक्षश्रेष्ठींकडे किंवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करायला हवी होती. अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन व्यासपिठावर जाहीर मारहाण केल्याने समाजात कोणता संदेश जातो, याचा विचार केला आहे का ? यातून मेळाव्याला उपस्थित कार्यकर्त्यांसमोर पक्ष कोणता आदर्श निर्माण करत आहे ?

दुसरीकडे माजी आमदार जिल्हाध्यक्षांच्या पत्नीविषयी जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य करतात, हे त्यांना शोभते का ? आमदारपदावर राहिलेल्या व्यक्तीला काही सामाजिक नीतीमत्ता आहे कि नाही ?, असा प्रश्‍न पडतो. व्यक्तीगत पातळीवरील टीका नेहमीच आक्षेपार्ह असते. जेव्हा बोलण्यास काही सूत्रे नसतात आणि वैयक्तिक शत्रूत्व जोपासण्याची वेळ येते, तेव्हा वैयक्तिक स्तरावर विधाने केली जातात, असे म्हणतात. ज्या पक्षात असे पदाधिकारी आहेत, त्यांच्यावर राज्याची भिस्त राहील का ? अशा विधानांमुळे वारंवार वादालाच तोंड फुटणार.

विशेष म्हणजे या मेळाव्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह शिवसेना आणि मित्रपक्ष यांचे आजी-माजी आमदार उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी संतप्त कार्यकर्त्यांना थोपवल्याने अनर्थ टळला. जळगाव जिल्हा हा भाजपचा ‘बालेकिल्ला’ समजला जातो. त्या जिल्ह्यातच पदाधिकारी अन् कार्यकर्ते ‘विचारांचा प्रतिवाद विचारांनी’ करण्यास अल्प पडले, हे या घटनेवरून सिद्ध झाले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘शिस्तीचा पक्ष’ म्हणवणार्‍या भाजपवर कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे देण्याची वेळ आली आहे. थेट कायदा हातात घेणार्‍या अशा पदाधिकार्‍यांना पक्ष घरचा रस्ता दाखवणार कि नाही ? घडलेली घटना पाहून प्रत्येकाला एक प्रश्‍न पडल्याविना रहात नाही तो म्हणजे, ‘हीच का भाजपची शिस्त ?’

– श्री. नीलेश पाटील, जळगाव


Multi Language |Offline reading | PDF