नाटकी शांतीदूत !

संपादकीय

अलीकडेच व्हॅटिकनमध्ये एका आध्यात्मिक समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोप यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेले दक्षिण सुदानचे राष्ट्रपती सलवा कीर, माजी उपराष्ट्रपती रीक मचर आणि देशाचे ३ उपराष्ट्रपती यांच्या पायांचे चुंबन घेतले. त्यांच्या या कृतीमुळे या समारोहाला उपस्थित असलेल्या सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. व्हॅटिकनच्या एका परंपरेनुसार ‘होली थर्स्डे’ला (पवित्र गुरुवारी) पोपकडून कैद्यांचे पाय धुण्याची प्रथा आहे; मात्र एका देशाच्या प्रमुखांच्या पायाचे चुंबन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोप हे ८२ वर्षांचे आहेत. जगात सर्वांत अधिक लोकसंख्या असलेल्या ख्रिस्ती समुदायाचे ते सर्वोच्च धर्मगुरु आहेत. असे असतांनाही त्यांनी कुठल्याही मानापमानाचा विचार न करता नेत्यांच्या पायांचे चुंबन घेतले. या घटनेनंतर ‘त्यांच्यात किती अहंशून्यता आहे’, ‘ते किती विनम्र आहेत’, ‘शांतीसाठी त्यांनी नवा पायंडा पाडला आहे’, यांसारखी स्तुतीसुमने भारतीय प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर उधळली. प्रसारमाध्यमांनी पोप यांच्या कौतुकाच्या आडून हिंदूंच्या धर्मगुरूंनाही कोपरखळी मारण्याचा प्रयत्न केला आहे. हे निंदनीय आणि संतापजनक आहे. पोप फ्रान्सिस जगात शांती नांदण्यासाठी एवढे आग्रही असतील, तर प्रथम त्यांनी हिंदूंची क्षमा मागावी. ख्रिस्ती मिशनरी भारतात धुडगूस घालत असल्यामुळे भारतात अशांतता माजली आहे आणि हिंदू अस्वस्थ आहेत. त्यांच्या मनावर फुंकर घालण्यासाठी आणि त्यांना आश्‍वस्त करण्यासाठी पोप फ्रान्सिस भारतात येऊन अशी कृती करतील का ?

पोप यांचे दुखणे !

वर्ष २०११ मध्ये सुदानपासून फारकत घेऊन दक्षिण सुदान देश उदयास आला. सुदान देशातील उत्तरी भागात इस्लामी वर्चस्व होते, तर दक्षिण भागात ख्रिस्त्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे या दोन पंथियांमध्ये वारंवार हिंसाचार होत असे. शेवटी याचे पर्यवसान दक्षिण सुदानच्या निर्मितीमध्ये झाले. वेगळी चूल मांडल्यावर तरी दक्षिण सुदानमधील परिस्थिती पालटेल, अशी आशा होती; मात्र ती फोल ठरली. या देशात अनेक विद्रोही संघटना हिंसाचार माजवत आहेत. त्यातच राष्ट्रपती सलवा कीर हे डिंका समुदायाचे आहेत, तर रीक माचर हे नुएर समुदायाचे आहेत. आतापर्यंत या दोन्ही गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात, तसेच सैनिकी कारवायांमध्ये अंदाजे ४ लाख लोक ठार झाले आहेत, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या ख्रिस्ती धर्माचे लोक या देशात बहुसंख्य आहेत. असे असतांनाही तेथे शांती का नाही, हा प्रश्‍न आहे. ख्रिस्त्यांना इस्लामी समुदायाचा त्रास होत असल्यामुळे ख्रिस्त्यांसाठी वेगळ्या देशाची स्थापना झाली. तरीही हा देश अशांत. हा ख्रिस्त्यांना देण्यात येणार्‍या शिकवणीचा पराभव नव्हे का ? पोप फ्रान्सिस यांचे हेच खरे दुखणे आहे. जगभरात इतरांना शांतीचा संदेश देत फिरणारे पोप हे ख्रिस्तीबहुल देशातील अशांती रोखू शकलेले नाहीत. यामुळे त्यांच्यावर आता तेथील शासनकर्त्यांच्या पायांचे चुंबन घेण्याची वेळ आली आहे.

पोप यांचा दिखाऊपणा !

पोप फ्रान्सिस काय किंवा त्यांच्या आधी या पदावर आरूढ असलेले पोप बेनिडिक्ट काय, या दोघांनी जगभर फिरून पाद्य्रांनी मुलांवर, नन्सवर केलेल्या लैंगिक अत्याचारांविषयी क्षमा मागितली. बर्‍याच ठिकाणी व्हॅटिकन चर्चला हानीभरपाई म्हणून या मुलांच्या कुटुंबियांना कोट्यवधी रुपये द्यावे लागले. पोप यांनी मागितलेली क्षमा किती बेगडी होती, हे अनेक उदाहरणांतून स्पष्ट झाले. बहुतांश वेळा पोप यांना वेगवेगळ्या देशांतील चर्चमध्ये चालणार्‍या लैंगिक अत्याचारांविषयी पूर्वकल्पना देण्यात आली होती; मात्र त्यांनी या तक्रारींकडे कानाडोळा केला. पाद्य्रांकडून झालेल्या लैंगिक अत्याचारांविषयी पोप खरेच संवेदनशील असते, तर एव्हाना वासनांध पाद्री गजाआड असते; मात्र तसे काहीच झालेले नाही. उलट बर्‍याच प्रकरणात व्हॅटिकन चर्चने अशा वासनांध पाद्य्रांना पाठीशी घातले. यावरून पोप यांचा दिखाऊपणा दिसून येतो. स्वतःची ‘मानवतावादी’ अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी पोप असा दिखाऊपणा करत आहेत, हेच खरे.

म्हणे शांतीदूत !

काही वर्षांपूर्वी पोप जॉन पॉल भारतात आले होते. या दौर्‍याच्या वेळी त्यांनी ‘भारत ख्रिस्तमय करू’ अशी दर्पोक्ती केली होती. त्या वेळी त्यांचे हे वक्तव्य ना राज्यकर्त्यांना खटकले, ना भारतीय प्रसारमाध्यमांना ! त्यामुळे कोणीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली नाही. उलट ‘प्रेमळ शांतीदूत’ म्हणून त्यांची व्यक्तीरेखा रंगवली. ख्रिस्त्यांमधील धर्मांधतेची भारतातील हिंदूंनी वारंवार प्रचीती घेतली आहे. ख्रिस्ती समाज जेथे अल्पसंख्य असतो, तेथे तो हिंदु समाजाशी मिळून मिसळून रहात असल्याचे दाखवतो; मात्र अंतर्गत हिंदूंची संख्या अल्प होऊन ख्रिस्त्यांची संख्या कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी ख्रिस्त्यांकडून मानवतेचा बुरखा घालून शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये चालवली जातात. तेथे जाणार्‍या हिंदूंचा बुद्धीभेद करून त्यांचे वैचारिक धर्मांतर केले जाते. या धर्मांतराला विरोध करणार्‍या हिंदूंना प्राणही गमवावे लागतात. याचे उदाहरण म्हणजे ओडिशा येथील धर्मांतराच्या विरोधात कार्य करणारे स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती होय. स्वामींच्या हत्येच्या मागे ख्रिस्ती नक्षलवाद्यांचा हात होता. त्यांच्या हत्येनंतर हिंदूंना ज्या यातना झाल्या, त्याविषयी पोप काहीच बोलत नाहीत. भारतात धर्मांतराच्या विरोधात कृती करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा मिशनर्‍यांच्या खोट्या तक्रारींमुळे छळ होतो. पोप फ्रान्सिस यांना जगात शांती नांदण्याविषयी खरंच कळवळा असेल, तर त्यांनी भारतात यावे. येथील हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवाया बंद कराव्यात. देशाच्या प्रमुखांच्या प्रमाणे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी केलेल्या पापाचे प्रायश्‍चित्त म्हणून हिंदुत्वनिष्ठांचे पाय धुवून त्यांचे चुंबन ते कधी घेतील का ?


Multi Language |Offline reading | PDF