कितीही धर्मविरोधक उभे राहिले तरी अंतिम विजय हा सत्याचाच (धर्माचाच) होतो ! – स्वामी शास्त्री विज्ञानस्वरूप, स्वामी नारायण ट्रस्ट

डावीकडून श्री. संजय ढवळीकर, श्री. आलोक कुमार, स्वामी शास्त्री विज्ञानस्वरूप यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना १. डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि श्री. विनायकराव देशपांडे

ठाणे, १५ एप्रिल (वार्ता.) – आज हिंदु धर्माचे कार्य करणार्‍यांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागत आहे. कितीही धर्मविरोधक उभे राहिले, तरी अंतिम विजय हा सत्याचाच (धर्माचाच) होतो, हे आपण लक्षात ठेवायला हवे. धर्माची बाजू ठामपणे मांडण्यासाठी आणि धर्मकार्यासाठी संघर्ष हा करावा लागतो. त्या संघर्षातूनच फळ मिळते अन् त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे मार्गदर्शन स्वामी नारायण ट्रस्टचे स्वामी शास्त्री विज्ञानस्वरूप यांनी केले. ‘श्रद्धेय अशोकजी सिंघल राष्ट्रीय प्रतिष्ठान’चा शुभारंभ श्री. आलोक कुमार यांच्या हस्ते श्रीरामनवमीच्या (१३ एप्रिलच्या) दुपारी ४.३० वाजता झाला, त्या वेळी ते बोलत होते.

‘राष्ट्रीय ऐक्य, व्यापक संघटन, कणखर नेतृत्व आणि हिंदुहितासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष यांसाठी अशोक सिंघल यांनी पुढाकार घेतला’, असे विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. आलोक कुमार या वेळी म्हणाले.

हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास समाजमनावर बिंबवण्याची आज आवश्यकता ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक आणि व्याख्याते

हिंदु धर्माविषयी भ्रामक कल्पना जाणीवपूर्वक पेरल्या गेल्या, आपल्याला फक्त पराभवाचा इतिहास शिकवला गेला. हिंदूंचा पराक्रम, हिंदु अस्मिता उद्ध्वस्त करण्याचे काम कथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केले. ढोंगी विचारवंतांनी हिंदु धर्माला त्याज्य आणि मागास म्हणून चित्रित केले, हे खोटे चित्र आता गळून पडत असून भारत नव्या ताकदीने उभा रहात आहे. हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास समाजमनावर बिंबवण्याची आज आवश्यकता आहे, असे सांगत आणि हिंदु विचार, संस्कृती, परंपरा यांच्यावर टीका करणार्‍या प्रवृत्तींचा कठोर शब्दांत समाचार घेत, हिंदु विचारविश्‍वाची अपकीर्ती करणार्‍यांवर डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी घणाघाती टीका केली. ‘हिंदु समाजातील स्फुलिंंग जागवण्यासाठी आयुष्य वेचलेल्या श्रद्धेय सिंघल यांच्या नावाचा प्रथम पुरस्कार मिळत असल्याचा आनंद मला होत आहे’, असे डॉ. शेवडे म्हणाले.

हिंदु समाजाची पुनर्बांधणी आणि सर्वांगीण सबलीकरण या अशोक सिंघल यांच्या कार्याचे कृतीरूप स्मरण हेच प्रतिष्ठानचे उद्दिष्ट ! – संजय ढवळीकर, प्रवर्तक संयोजक, श्रद्धेय अशोकजी सिंघल राष्ट्रीय प्रतिष्ठान

समरस हिंदु समाजाची पुनर्बांधणी आणि सर्वांगीण सबलीकरण या अशोक सिंघल यांच्या कार्याचे कृतीरूप स्मरण हे प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे. अशोक सिंघल यांनी हिंदुहिताचा मांडलेला विचार पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित करण्याचे कार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यापक हिंदुहितासाठी कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना प्रतिवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

डॉ. सच्चिदानंद शेवडे ठरले ‘श्रद्धेय अशोकजी सिंघल स्मृती पुरस्कारा’चे पहिले मानकरी !

‘श्रद्धेय अशोकजी सिंघल राष्ट्रीय प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणार्‍या श्रद्धेय अशोकजी सिंघल स्मृती पुरस्काराचे ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे हे पहिले मानकरी ठरले. स्वामी शास्त्री विज्ञानस्वरूप यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि पंचवीस सहस्र रुपये, असा पुरस्कार डॉ. शेवडे यांना प्रदान करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF