कुर्ला येथे अपायकारक लिंबूपाणी तयार करणार्‍याला ५ लक्ष रुपयांचा दंड

मुंबई – अपायकारक लिंबूपाणी तयार करणार्‍या कुर्ला रेल्वे स्थानकातील दुकानदाराला ५ लक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. (आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या पदार्थांकडे दुर्लक्ष करणार्‍या अन्न आणि औषध प्रशासन विभागातील संबंधित अधिकार्‍यांवरही कडक कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

अयोग्य प्रकारे लिंबू सरबत बनवतांनाचे चित्रीकरण सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाले होते. त्यानंतर प्रशासनाने संबंधित दुकान सील (कह्यात घेतले) केले होते. मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या फलाटांवर लिंबू सरबत, काला खट्टा यांच्या विक्रीवरील बंदी कायम असणार आहे.

मुंबई विभागातील २४४ दुकानांतील खाद्यपदार्थ आणि पेयजलांचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. ते अपायकारक असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक आणि अनुज्ञप्ति रहित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले. (अपप्रकार उघडकीस आल्यावर नव्हे, तर अपप्रकार होऊ नयेत, यासाठी सतर्क असणारे प्रशासन मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF