साधकाने दैनिक सनातन प्रभातसाठी प्रथमच लिहिलेली भारतमातेच्या दुःस्थितीवरील कविता वाचून त्यावर अत्यंत आश्‍वासक आणि प्रेरणादायी टिपणी देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

प्रेरणादायी दृष्टीकोन देऊन साधकांना आश्‍वस्त करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री. दत्तात्रय पटवर्धन

दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीसाठी मी पहिलीच कविता पाठवली होती. त्या कवितेचे शीर्षक होते, ‘शल्य खरोखर हेची मनाला !’ त्या कवितेचा आशय होता, ‘आध्यात्मिक पार्श्‍वभूमी असलेल्या आपल्या भारत देशाचे एवढे अधःपतन कसे झाले ?’, हेच माझ्या मनाचे शल्य आहे.’ त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले दैनिक सनातन प्रभातचे संपादक होते. माझ्या पहिल्याच कवितेवर त्यांनी स्वतःच टिपणी लिहिली होती. ती अशी होती, ‘शल्य वाटून घेऊ नका. तुमच्या कवितेचा उत्तरार्ध आपण पूर्ण करणार आहोत.’ त्या वेळी ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी दैनिक सनातन प्रभात’, असे दैनिक सनातन प्रभातचे घोषवाक्य होते. ‘हे ईश्‍वरी राज्य’ हाच आपल्या कवितेचा उत्तरार्ध !’, असे मला तेव्हा विशेषत्वाने आणि तीव्रतेने वाटले.

माझ्यासारख्या एका अत्यंत सामान्य माणसाचे कवितारूपी विचार वाचून त्याला अत्यंत आत्मविश्‍वासाने आणि प्रेरणा मिळेल, अशा स्पष्ट शब्दांत परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्‍वस्त केले होते. हे खरोखरच केवळ आणि केवळ परात्पर गुरु डॉक्टरांसारखे एकमेवाद्वितीय थोर पुरुषच करू शकतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली आत्मविश्‍वासपूर्ण टिपणी वाचल्यावर मला अवर्णनीय, म्हणजे शब्दातीत आनंद झाला होता.

त्या वेळी मला मिळालेल्या प्रेरणेतूनच, म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच मी पुढील सर्व कविता लिहू शकत आलो आहे. त्या त्यांनीच माझ्याकडून लिहून घेतल्या आहेत. कृतज्ञता !’

– श्री. दत्तात्रय र. पटवर्धन, माणगाव, जिल्हा सिंधुदुर्ग.


Multi Language |Offline reading | PDF