दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २० वा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन प्रभातचे कार्य म्हणजे एक दैवी चमत्कार ! – कमलेश बांदेकर, भारत स्वाभिमान

दैनिक सनातन प्रभातच्या द्विदशकीय द्वितीय विशेषांकाचे प्रकाशन करताना डावीकडून श्री रमेश नाईक, श्री कमलेश बांदेकर, श्री अरविंद पानसरे, श्री सत्यविजय नाईक
दीपप्रज्वलन करताना डावीकडून पू. सदाशिव (भाऊ) परब आणि बाजूला श्री रमेश नाईक

डिचोली, १४ एप्रिल (वार्ता.) – सनातन प्रभातने आजपर्यंत कठोरपणे आणि यशस्वीपणे लढा दिला आहे. खरे तर समुहाला प्रेरित करणे हे फार कठीण काम असते, तरीही सनातन प्रभातने हे काम यशस्वीपणे पार पाडलेले आहे. हे कार्य म्हणजे एक दैवी चमत्कार आहे, असे प्रतिपादन भारत स्वाभिमानचे श्री. कमलेश बांदेकर यांनी केले.

हिंदूंवरील अत्याचार, धर्मांधांच्या कारवाया, सामाजिक भ्रष्टाचार, शासनकर्त्यांचा पक्षपातीपणा यांसारख्या अनेक विषयांवर जागृती करणारा, ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून प्रखरपणे हिंदूजागृतीचे कार्य करणारा, न डगमगता अगदी सडेतोड विचार मांडणारा आणि अनेक संतांचा आशीर्वाद लाभलेला अशी सनातन प्रभातची ख्याती आहे. आगामी आपत्काळाविषयी वाचकांना सतर्क करणे, आपत्काळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी उपाययोजना सांगणे आणि अधिकाधिक जणांचे जीवितरक्षण करणे, हीच दैनिक सनातन प्रभातच्या आगामी कार्याची दिशा आहे. अशा दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २० वा वर्धापनदिन सोहळा डिचोली येथील दिनदयाळ भवन येथे १४ एप्रिल या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.

या सोहळ्यात शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक, तसेच सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे आणि हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांचेही मार्गदर्शन झाले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील पत्रकारितेची द्विदशकी वाटचाल करणार्‍या सनातन प्रभातच्या या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा आयोजकांशी संपर्क साधून अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

सोहळ्याला शंखनाद करून, तसेच सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब आणि व्यासपिठावरील अन्य मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. यानंतर व्यासपिठावरील वक्ते यांचा सत्कार आणि उपस्थित संत यांचा  सन्मान करण्यात आला. सनातन प्रभातचे डिचोली येथील साधक श्री. बाबाजी कानोळकर यांनी श्री. कमलेश बांदेकर यांचा, साखळी येथील हिंदु धर्माभिमानी श्री. दयानंद गावकर यांनी श्री. रमेश नाईक यांचा, श्री. रामचंद्र डांगी यांनी श्री. अरविंद पानसरे यांचा आणि मये येथील हिंदु धर्माभिमानी श्री. रामा गावकर यांनी श्री. सत्यविजय नाईक यांचा सत्कार केला.

सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. राहुल वझे यांनी केले.

सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. सनातनचे शिरसई येथील साधक श्री. अरुण हळदणकर यांनी सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा सन्मान केला.

२. सनातन प्रभातचे वितरक श्री. रामचंद्र डांगी यांचा सत्कार श्री. रमेश नाईक यांनी केला.

३. या वेळी दैनिक सनातन प्रभात च्या प्रारंभापासूनच्या नियमितपणे वाचन करणार्‍या वाचक सौ. वनिता चिमुलकर यांनी सनातन प्रभातविषयी मनोगत व्यक्त केले.

४. दैनिक सनातन प्रभातच्या द्विदशकपूर्ती विशेषांकाचे प्रमुख पाहुणे श्री. कमलेश बांदेकर आणि व्यासपिठावरील अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

५. वर्धापनदिनानिमित्त सनातन प्रभातचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातनच्या साधिका सौ. साधना लक्ष्मण जोशी यांनी केले.

६. सोहळ्यात वितरक कु. गीता गोसावी यांचा श्री. कमलेश बांदेकर यांनी सत्कार केला.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमाला उपस्थित असलेले गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित यांचा शिरसई येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. सत्यवान म्हामल यांनी सत्कार केला.

२. वर्धापनदिन सोहळ्याचे फेसबूकवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले.

३. सोहळ्याला भाजपचे मये येथील आमदार श्री. प्रवीण झांट्ये उपस्थित होते.

४. सोहळ्यात पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करण्यासंदर्भात या विषयाचे निवेदन ठेवण्यात आले होते. यावर भाजपचे आमदार श्री. प्रवीण झांट्ये, तसेच उपस्थित जिज्ञासू आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी स्वाक्षरी केली.

सोहळ्याला उपस्थित मान्यवर

सोहळ्याला भाजपचे मये येथील आमदार श्री. प्रवीण झांट्ये; वायंगिणी, मये पंचायतीचे पंचसदस्य श्री. प्रेमेद्र शेट; डिचोली पालिकेचे नगरसेवक श्री. विजय नाटेकर; माजी नगरसेवक श्री. नारायण बेतकेकर; गोेप्रेमी श्री. कमलाकर तारी आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.

सनातन प्रभात हा हिंदूंसाठी केवळ एक दैनिकच नव्हे, तर एक सैनिक म्हणून उभा आहे ! – रमेश नाईक

ब्रिटिशांना डोके ठिकाणावर आहे का ?, असा प्रश्‍न विचारणार्‍या लोकमान्य टिळकांच्या केसरीची तुलना दैनिक सनातन प्रभातशी करू शकतो. सनातन प्रभात हा हिंदूंसाठी आधारस्तंभ असलेला केवळ एक दैनिकच नव्हे, तर एक सैनिक म्हणून उभा आहे. सनातन प्रभात आजपर्यंत कोणाच्याही दडपणाला बळी पडलेला नाही. सनातन प्रभात सकाळी वाचल्याशिवाय मला चैन पडत नाही. हा दैनिक प्रत्येकाच्या घरी गेला पाहिजे. सनातन प्रभात हे रोखठोकपणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही नेहमी हिंदूंवरील आघातांना वाचा फोडत आहे. सनातन प्रभातमुळे खर्‍या अर्थाने हिंदूंची इत्यंभूत माहिती हिंदूंना कळते. सनातन प्रभात हिंदूंच्या हिताचे काम करणार्‍यांना प्रोत्साहन देतो आणि कोणी चुकत असेल, तर कठोरपणे त्याविरोधात लिहितो. सनातन प्रभात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसार करत आहे. ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे.   ते पुढे म्हणाले, पूर्वी हिंदूंवरील अत्याचारांच्या बातम्या वाचायला मिळत नव्हत्या. दैनिक सनातन प्रभातने हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडली. सनातन प्रभात हे हिंदूंचे हित पहाणारे एक दैनिक आहे. सनातन प्रभात हिंदु संतांविषयी सत्य माहिती मांडत असते. सनातन प्रभात वाचकांना धर्मनिरपेक्षता नव्हे, तर प्रत्येक घटनेकडे हिंदुहिताच्या दृष्टीने पहाण्यास शिकवते. सनातन प्रभातने परंपरेने चालत आलेल्या चालीरिती परत समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक सनातन प्रभात, मराठी साप्ताहिक, इंग्रजी पाक्षिक आणि सनातन पुरोहित पाठशाळा यांचा सामूहिकरित्या वर्धापनदिन सोहळा

दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २१ व्या वर्षात पदार्पण करणे याबरोबरच साप्ताहिक सनातन प्रभातने २२ व्या वर्षात, तर इंग्रजी पाक्षिक सनातन प्रभातने १४ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. तसेच सनातन प्रभातच्या पुरोहित पाठशाळेने ११व्या वर्षांत पदार्पण केले आहे. यामुळे दैनिक सनातन प्रभात, मराठी साप्ताहिक, इंग्रजी पाक्षिक आणि सनातन पुरोहित पाठशाळा यांचा सामूहिकरित्या वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आला.

सनातन प्रभातच्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपमध्ये इंग्रजी पाक्षिकाचा समावेश

सनातन प्रभात अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपमधील इंग्रजी पाक्षिक विभागाचे अनावरण करतांना श्री. रमेश नाईक

सनातन प्रभात अँड्राइड अ‍ॅपची मार्गिका

bit.ly/2Y3b1nl (टीप : या मार्गिकेतील काही अक्षरे कॅपिटल असल्याची वाचकांनी नोंद घ्यावी.)


Multi Language |Offline reading | PDF