सत्यान्वेषी, निर्भीड, वस्तूनिष्ठ पत्रकारितेचा आदर्श असलेल्या आणि साधनेविषयी मार्गदर्शन करून व्यक्तीत अंतर्बाह्य पालट घडवणार्‍या ‘सनातन प्रभात’विषयी वाचकांचे कौतुकोद्गार !

‘वाचकवृद्धी मोहिमे’च्या निमित्ताने…

‘पत्रकारितेचा पुढील आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ‘सनातन प्रभात’ कार्यरत आहे,

‘कीं घेतले व्रत न हें अम्हिं अंधतेने ।
बुद्ध्याचि वाण धरिले करिं हे सतीचे ॥’

– स्वातंत्र्यवीर सावरकर

‘सनातन प्रभात’ म्हणजे वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या विषयांवर अचूक मार्गदर्शन करणारा दीपस्तंभच ! २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी जनकल्याणाची अनेक उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राची निर्मिती केली. दिशाहीन समाजाला दिशा मिळावी, राजकारणी व्यक्तींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, जनतेच्या मनात राष्ट्र आणि स्वधर्म यांच्याप्रती प्रेम निर्माण व्हावे, तसेच साधकांना साधनेविषयी प्रतिदिन मार्गदर्शन मिळावे आदी हेतूंनी आर्थिक हानी सोसूनही हे वृत्तपत्र चालू केले. परात्पर गुरु डॉक्टरांनी ज्या उदात्त हेतूंनी ‘सनातन प्रभात’ चालू केले, त्यांतील बहुतांश उद्देश आज सफल होतांना दिसत आहेत. आज ‘सनातन प्रभात’चा विशिष्ट वाचक वर्ग निर्माण झाला आहे. ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने त्यांचे विचार आणि कृती यांत आमूलाग्र पालट होत आहेत अन् हेच सनातनचे यश आहे.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ   

ठिकठिकाणच्या वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी काढलेलेे कौतुकोद्गार पुढे दिले आहेत. त्यावरून ‘सनातन प्रभात’चे महत्त्व आणि वाचकांची नियतकालिकावरील विश्‍वासार्हता लक्षात येते.

दिनांक १४ एप्रिलच्या अंकात आपण ‘सनातन प्रभात’ची महती व्यक्त करणारे वाचकांचे विचार पाहिले आज आपण त्यापुढील भाग पहाणार आहोत.

माझ्या धर्मावर आलेल्या संकटांची मला जाणीव झाली आहे. आता मीही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वतोपरी कृती करणार आहे !

२. सत्यान्वेषी ‘सनातन प्रभात’विषयी वाचकांची विश्‍वासार्हता !

२ अ. ‘सत्य काय आहे ?’, हे केवळ ‘सनातन प्रभात’मुळे समजते ! – सुधीर फडणवीस, पिंपरी, पुणे

‘सनातन प्रभात’ हे परखडपणे विचार मांडणारे एकमेव दैनिक असून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध आहे. हिंदु राष्ट्र येणारच असून ‘सत्य काय आहे ?’, हे केवळ ‘सनातन प्रभात’मुळेच समजते. मी सनातनच्या देवद आश्रमाला भेट दिली आहे. तेथील व्यवस्थापन आणि निःस्वार्थीपणे कार्य करणारे साधक पाहून माझे मन थक्क झाले.’ (नोव्हेंबर २०१७)

२ आ. ‘सनातन प्रभात’मध्ये सत्य आणि परखड वृत्ते प्रसिद्ध होत असल्यानेे ‘हेच दैनिक वाचावे’, असे वाटते ! – सौ. सोनाली भारंबे, कल्याण, ठाणे

 ‘सनातन प्रभात’मधून नामजप, साधना आणि काळानुसार उपाय यांविषयी अमूल्य मार्गदर्शन मिळते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार आणि संतांचे साधनेविषयीचे मार्गदर्शन लाभते. साधकांच्या दैवी गुणांविषयी आणि त्यांची आध्यात्मिक पातळी वाढल्याची वृत्ते वाचून आनंद होतो. साधकांचे अनुभव आणि त्यांनी केलेल्या कविता वाचल्यावर भावजागृती होते. यामध्ये सत्य आणि परखड वृत्ते प्रसिद्ध होतात. त्यामुळे हा अंक वाचल्यावर ‘अन्य वृत्तपत्रे वाचावीत’, असे वाटत नाही. ‘दैनिकरूपी चैतन्य घराघरांत पोेचावे’, अशी मी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करते !’ (२४.३.२०१९)

२ इ. ‘सनातन प्रभात’ म्हणजे हिंदूंना जागृत करणारी ‘संजीवनी’ असून प्रत्येक हिंदूच्या घरी हा अंक गेल्यास हिंदु राष्ट्र येईल ! – प्रभाकर भोसले, अध्यक्ष, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी, मुंबई

‘सनातन प्रभात’च्या वाचनामुळे हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावरील आघातांची तीव्रता माझ्या लक्षात आली. ‘सनातन प्रभात’मधून गुरूंप्रमाणे मार्गदर्शन केले जाते. त्यामुळेच मला धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे. हे केवळ वृत्तपत्र नसून हिंदूंना जागृत करणारी संजीवनी आहे. ‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूच्या घरी जाईल, तेव्हा हिंदु राष्ट्र येईल ! जो ‘सनातन प्रभात’ वाचेल, त्याच्यात राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती निर्माण होईल. ज्याप्रमाणे जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले, त्याप्रमाणे हिंदूंना घडवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे.’ (२४.३.२०१९)

३. अंकवाचनामुळे वाचकांना व्यक्तीगत स्तरावर झालेले लाभ आणि त्यांच्यात झालेले शारीरिक अन् मानसिक स्तरांवरील पालट

३ अ. ‘सनातन प्रभात’मुळे मी सर्व कठीण प्रसंगांमधून वाटचाल करू शकले. माझ्या यजमानांना अनेक वर्षांपासून असलेले व्यसन सुटण्यास ‘सनातन प्रभात’चे मोलाचे साहाय्य झाले.’ – सौ. सुनिता कडूकर, कोल्हापूर (नोव्हेंबर २०१७)

३ आ. ‘सनातन प्रभात’मुळे माझा रागीटपणा न्यून झाला !  –  सुभाष इदगे, पिंपरी, पुणे

‘सनातन प्रभात’मुळे स्वतःमध्ये पालट झाल्याचे मी अनुभवले. पूर्वी मला पुष्कळ राग येत असे; पण आता रागीटपणा न्यून झाल्याचे जाणवते. आता काही प्रसंगांत मी शांत राहू शकतो.’ (नोव्हेंबर २०१७)

३ इ. ‘सनातन प्रभात’मुळे मला जीवनातील अडचणींवर मात करता आली ! – गजू तांबट, जळगाव

‘मी या नियतकालिकामधील महत्त्वाचे लेख आणि सूचना यांची कात्रणे कापून ठेवतो, जेणेकरून ती पुनःपुन्हा वाचता येतात. यामुळे माझ्या जीवनातील बर्‍याच अडचणींवर मात करता आली.’ (फेब्रुवारी २०१८)

३ ई. स्वतःत झालेल्या सकारात्मक पालटांचे श्रेय मी ‘सनातन प्रभात’ला देतो ! – सचिन घाग, भांडुप, मुंबई

‘भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. त्याप्रमाणे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले संपूर्ण मानवजातीला भगवद्गीताच सांगत आहेत. ‘भगवद्गीता प्रत्यक्ष कृतीत कशी आणायची ?’, हेही साधकांच्या अनुभूतीतून शिकायला मिळत आहे.

आरंभी माझा एक मित्र मला या दैनिकाविषयी पुष्कळ काही सांगायचा; मात्र मी त्याचे बोलणे गांभीर्याने ऐकायचो नाही. नंतर मी प्रथमच दैनिक वाचले आणि माझ्या मनातील अनेक शंकांचे निरसन झाले. केवळ ‘सनातन प्रभात’ वाचायला मिळावा, यासाठी मी कामावरून लवकर यायचो आणि मित्राच्या घरी जाऊन दैनिक वाचायचो. अशा प्रकारे दैनिकाचे वाचन करता करता मी वाचक झालो. आज माझ्यामध्ये जो काही सकारात्मक पालट दिसत आहे, त्याचे श्रेय मी ‘सनातन प्रभात’ला देतो. मी या दैनिकाचा वाचक आहे, याविषयी मी स्वतःला पुष्कळ भाग्यवान समजतो.’ (फेब्रुवारी २०१८)

३ उ. अंकवाचनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते ! – ललित पन्हाळे, नवीन पनवेल

‘या दैनिकामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना आध्यात्मिक लाभ होत आहे. यामुळे आम्हाला धर्म आणि धर्मकार्य यांविषयी समजले. अंकवाचनामुळे सतत सकारात्मक ऊर्जा मिळते. ‘अशीच ऊर्जा माझ्या कुटुंबाला सतत मिळू दे आणि सर्व जगाचे कल्याण करू दे’, अशी मी परमेश्‍वराकडे याचना करतो.’ (फेब्रुवारी २०१८)

३ ऊ. ‘सनातन प्रभात’मुळे अध्यात्माविषयी आवड निर्माण झाली ! – सौ. पूनम सैंदाणे, नवीन पनवेल

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना उपयुक्त अशी आध्यात्मिक माहिती मिळते. साधनेविषयी सतत माहिती मिळत असल्यामुळे माझ्यात अध्यात्माची विशेष आवड निर्माण झाली आहे.’ (फेब्रुवारी २०१८)

३ ए. ‘सनातन प्रभात’चे वाचन आणि नामजप यांमुळे आजार न्यून झाले ! – माधुरी कुलकर्णी, कोल्हापूर

‘मला उच्च रक्तदाब, श्‍वास घेण्यास त्रास होणे, पोटदुखी, डोळे लाल होणे इत्यादी त्रास होते; पण ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन आणि नामजप यांमुळे हे आजार उणावले. माझे मन एकाग्र होऊन मला भीती वाटण्याचे प्रमाणही न्यून झाले आहे.’

३ ऐ. पाठ दुखत असतांना गादीखाली दैनिक ठेवल्याने पाठदुखी उणावली ! – सौ. वैशाली सावरकर, चिंचवड, पुणे

 ‘एकदा माझी पाठ पुष्कळ दुखत होती. तेव्हा मी प्रार्थना करून दैनिक ‘सनातन प्रभात’ गादीखाली ठेवले. सकाळी उठल्यावर माझी पाठदुखी आपोआप बंद झाली आणि मला चांगले वाटले. या उपायामुळे माझी पाठदुखी थांबली. अन्यथा मला रुग्णालयात जावे लागले असते.’ (सप्टेंबर २०१८)

संकलक : (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०१९)                                                                                (क्रमश:)


Multi Language |Offline reading | PDF