शाई पुसणे कशासाठी ?

मतदानाला देशभरात पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला. मतदानासमवेत मतदानाच्या दिवशी हिंसाचारासह हाणामारी आणि अनेक गैरप्रकारांनाही वेगाने उधाण आले. विदर्भामध्ये गोंधळ, काही ठिकाणी इव्हीएम् यंत्रामध्ये बिघाड, शाई नीट न लागण्यावरून गोंधळ, काहींची नावेच मतदानसूचीतून गायब, गडचिरोलीत तर कर्मचार्‍यांवर नक्षलवाद्यांचे आक्रमण, तोडफोड, हाणामारी इत्यादी इत्यादी… या सर्वांमध्ये या वर्षी सर्वांत महत्त्वाची घडलेली घटना म्हणजे ‘मतदानानंतर बोटावर लावण्यात आलेली शाई काढायची कशी ?’ याविषयीची माहिती ‘गूगल’वर ‘सर्च’ करण्याचे प्रमाण वाढले होते, अशी माहिती ‘गूगल ट्रेंड’ने दिली. हा प्रकार ९ एप्रिलपासूनच चालू झाला आहे. मतदानाच्या दिवशीसुद्धा सकाळी १० ते १२ या दोन घंट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या संदर्भात ‘गूगल सर्च’ झाले. दुपारनंतरही यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

शाई पुसण्यासाठी ‘गूगल सर्च’ करावेसे वाटणे, यातच मतदानातील बोगसपणा विषयीचे सर्व काही आले. खरेतर शाई हे एकच माध्यम असे आहेे की, ज्यामुळे एक व्यक्ती दोन वेळा मतदान करू शकणार नाही. ‘शाई नीट न लागणे’ किंवा ‘शाई पुसता येणे’, असे झाले, तर जे मतदान होणार ते बोगस असणार, हे लहान मूलही सांगेल.

यामध्ये महत्त्वाचे सूत्र म्हणजे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना हे सर्व का करावेसे वाटत आहे ? सत्ता हातात होती, तेव्हा आपण ‘मतदारराजा’साठी काय केले आहे आणि मतदानाच्या दिवशी मतदारराजा काय निर्णय घेणार आहे ?, हे राज्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक आहे, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे संबंधितांना हा निर्णय स्वीकारणे कठीण जाणार असल्यामुळे त्यामध्ये पालट करण्यासाठी ही सर्व उठाठेव चालू आहे, हे सांगणे न लगे.

येथे हे सर्व करून कोणीतरी जिंकून येईल आणि कोणीतरी हरेल; परंतु या सर्व माध्यमातून जे काही अयोग्य कर्म झालेले आहे, त्या कर्माचे फळ काय असणार आहे, याचा विचार कोणी करतांना दिसत नाही. पृथ्वीवरील सत्तेपेक्षा ईश्‍वराची सत्ता श्रेष्ठ आणि मोठी आहे. त्याच्याकडे सर्वांच्या सर्व कामांची नोंद असते. त्यानुसार तो प्रत्येकाला त्या त्या कर्माची फळे देतो. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी स्वतः धर्मशिक्षण घेतले असते आणि सर्वांना दिले असते, तर याचे ज्ञान सर्वांना झाले असते. त्यामुळे कोणी ‘गैरप्रकार करून निवडून येण्याऐवजी सर्वांत चांगले काम करून निवडून येऊया’, असा विचार केला असता. असे विचार करणारी जनता भारतात असती, तर आज रामराज्य असते, हे वेगळे सांगायला नको. आता तरी राज्यकर्ते नैतिक मूल्ये जोपासणारा समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न करेल कि केवळ विकासालाच प्राधान्य देईल ?

– वैद्या (कु.) माया पाटील, देवद, पनवेल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now