अली कि बजरंग बली ?

संपादकीय

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मेरठ येथील एका प्रचारसभेत बोलतांना ‘जर काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष अलीवर विश्‍वास ठेवतात, तर आमचाही बजरंग बलीवर विश्‍वास आहे.’ यानंतर योगी आदित्यनाथ यांनी ‘असे कसे म्हटले?’ यावरून वादंग उठला आहे. उत्तरप्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी ‘आम्हाला ‘बजरंग अली’ हवा आहे’, असे सांगितले. मायावती यांनी ‘अली आणि बजरंग बली यांच्या नावावर विवाद आणि संघर्ष निर्माण करणार्‍यांपासून दूर रहा’ असे आवाहन केले आहे. पुरो(अधो)गाम्यांनी हा ‘भारत देश आहे. येथे अली आणि बजरंग बली हातात हात घालून रहात असतांना तुम्ही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहात ?’ असा प्रश्‍न विचारला आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या विधानावरून त्यांना काय अपेक्षित आहे, हे कोणाही सूज्ञ व्यक्तीला लक्षात आले असेल. उत्तरप्रदेशसारख्या देशातील सर्वांत मोठ्या राज्याचा विचार केला, तर तेथील बहुजन समाज पक्ष काय किंवा समाजवादी पक्ष काय, या दोन्ही पक्षांनी  नेहमी अल्पसंख्य समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करूनच राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची मदार नेहमीच अल्पसंख्यांकावर राहिली आहे. मायावती यांनी जातीचे राजकारण केले, तर समाजवादी पक्षाने मुसलमानांना जवळ केले. समाजवादी पक्ष सत्तेवर असतांना त्याने मुसलमानांवर सवलती आणि सुविधा यांची एवढी खैरात केली होती की, उत्तरप्रदेशचे नाव ‘मुसलमान प्रदेश’ असे पालटणे शेष राहिले होते. या लोकसभा निवडणुकीत मायावती यांनी जाहीरपणे मुसलमानांनी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या युतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला योगींनी ‘बजरंग बली’चे नाव घेऊन उत्तर दिले आहे.

भाजपलाही निवडणुकीच्या वेळी रामानंतर आता हनुमानाची आठवण आली आहे, हे जनता ओळखून आहे. निवडणुकीच्या वेळी हनुमानभक्त हिंदूंच्या मतांवर अवलंबून असणार्‍या भाजपने, ‘हिंदूंनी त्याच्यावर पूर्वी जो विश्‍वास ठेवला होता, त्यास तो पात्र झाला आहे का’, याचा विचार केला आहे का ? ३ राज्यांच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालांवरून जनतेने भाजपला नाकारले होते. त्याचे चिंतन भाजपने अजूनही केलेले दिसत नसून ते हिंदूंना गृहीत धरत आहेत, असेच लक्षात येते. भाजपचे मुसलमान प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले, ‘गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने जे दिले, त्यापेक्षा मोदी सरकारने मुसलमान समाजाला दिले आहे’ यातूनच भाजपने कोणासाठी काय केले, हे स्पष्ट होतेच. भाजपकडून सोयीस्करपणे हिंदूंचा आणि त्यांच्या देवतांचा वापर केला जातो; मात्र रामजन्मभूमीचा प्रश्‍न येतो, तेव्हा न्यायालयाकडे बोट दाखवले जाते. हे राजकारण आता कुठेतरी थांबवून हिंदूंसाठी खरोखरीच योगदान देणे भाजपकडून अपेक्षित आहे.

हे चालते का ?

गोव्यातील एका ख्रिस्ती पाद्य्राने चर्चमधील लोकांना उद्देशून ‘काही जण भाजपच्या मागे धावत आहेत; मात्र तुमच्या मुलांचा विचार करा. भाजपच्या लोकांनी मुलांवर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळले आहे’, असे विखारी विधान केले, तर ‘मनोहर पर्रीकर यांचे पापाचे घडे भरले होते. त्यामुळे त्यांना देवाने कर्करोगाच्या रूपाने शिक्षा केली. पर्रीकर यांनी फ्रान्सिस झेविअर यांच्याविषयी असलेल्या सुटीच्या दिवशी कायदा पालटला. त्यामुळे त्यांचा वेदनेत मृत्यू झाला’, असेही दुसरे विधान केले आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्च संस्थांकडून भाजपविरोधी अथवा हिंदुत्वविरोधी विधाने करणे, ख्रिस्ती समाजाला कोणाला मत द्यावे आणि देऊ नये, यासाठी आवाहन करणे असे नेहमी चालू असते.

या प्रकरणात ख्रिस्ती पाद्य्रांवर टीका झाली, प्रसारमाध्यमांमध्ये चर्चासत्रे आयोजित केली असे प्रकार कधी घडत नाहीत. जणू ‘काही झालेच नाही’ अथवा ‘चर्चमधील अंतर्गत प्रश्‍न आहे’, या दृष्टीने त्याकडे पाहिले जाते आणि त्यांच्यावर कारवाईही होत नाही. एखाद्या हिंदु संतांनी अशी विधाने केली असती, तर त्यास त्वरित ‘हिंदु आतंकवाद’ असे संबोधले गेले असते, तसेच प्रसारमाध्यमांनी चर्चासत्रे झोडली असती. जगभरात पाद्य्रांनी सहस्रो लहान मुले, नन्स यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना आता उघडकीस येऊनही भारतातील पाद्री मात्र गप्प आहेत आणि आता ‘भाजपपासून मुलांना धोका आहे’, असा आव आणत आहेत. आता निवडणूक आयोग या प्रकरणी काय भूमिका घेतो, हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. धर्माच्या नावावर मते देण्यास सांगणार्‍या किंवा तसे सुचवणार्‍या चर्च संस्था अथवा पाद्री यांच्यावर कारवाई का होत नाही ? भारतात हिंदूंना एक न्याय आणि अल्पसंख्यांकांना वेगळा न्याय असे का ? हाच भारतातील निधर्मीवाद आहे का ? एरव्ही प्रेम आणि शांतता यांचा फुकाचा सल्ला देणारे पाद्री आणि चर्च यांची धर्मांधता अशा आवाहनांमुळे समोर येते. चर्चला हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी मुक्त वातावरण हवे आहे. मागील ५ वर्षांत भाजप सरकारने थेट ख्रिस्ती मिशनर्‍यांवर काही कारवाया केल्या नसल्या, तर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोध मात्र या कालावधीत वाढला आहे. भाजप सत्तेवर असेपर्यंत भारताला ख्रिस्तमय करण्याचे चर्चचे स्वप्न पूर्ण होणार नाही. चर्चकडून भाजप पुन्हा सत्तेवर येऊ नये; म्हणून खटपटी चालू झाल्या आहेत. त्यामुळे असहिष्णुता आदी ठेवणीतले शब्द वापरून असले आवाहन केले जात आहे. हे लक्षात घेऊन आता हिंदूंचे दायित्व वाढले आहे. उघडउघड हिंदूविरोधी कारवाया करणार्‍या चर्चच्या धर्मांतराच्या कारवाया रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. वास्तविक भाजप सरकारनेही याविषयी चिंतन करायला हवे. सरकारने अल्पसंख्यांकांचे कितीही लांगूलचालन केले, तरी मुसलमान किंवा ख्रिस्ती पक्षाला मत देणार नाहीत. हिंदूंनी भरघोस मते दिली; म्हणून वर्ष २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आला. आताही हिंदूंच्याच मतांवर भाजपचे यशापयश अवलंबून आहे !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now