परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रीतीमय छत्रछायेखाली श्री. राजेंद्र सांभारे यांचा झालेला आनंददायी साधनाप्रवास !

त्यागमय जीवन जगणारे आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असणारे मूळचे सातारा येथील आणि सध्या देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. राजेंद्र सांभारे (वय ६१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे आणि ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले. आज आपण श्री. राजेंद्र सांभारे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहवासात शिकायला मिळालेली सूत्रे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने त्यांचा झालेला साधनाप्रवास येथे देत आहोत.

(भाग १)

१. संस्थेशी संपर्क आणि सेवेला आरंभ

श्री. राजेंद्र सांभारे

१ अ. सातार्‍यातील पहिल्या प्रवचनाविषयी वार्ता अन् लेख प्रसिद्ध करण्यासाठी सनातनचे एक साधक ‘दैनिक ऐक्य’च्या कार्यालयात येणे, तेव्हा त्या वृत्तपत्रात नोकरी करत असणे, मालक उपस्थित नसल्याने साधकाकडून विषय समजून घेणे आणि ‘वृत्तपत्रात वार्ता अन् लेख लावण्यासाठी प्रयत्न करतो’, असे सांगणे : ‘वर्ष १९९४ मध्ये सातार्‍यात सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या कार्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टीने पहिले प्रवचनाचे नियोजन झाले. स्थानिक वृत्तपत्रात त्याविषयी वार्ता आणि लेख देण्यासाठी कुरुंदवाड (जिल्हा सांगली) येथील साधक श्री. उमेश लंबे सातार्‍यातील ‘दैनिक ऐक्य’च्या कार्यालयात आले होते. त्या वेळी मी या वृत्तपत्रात नोकरी करत होतो. माझ्या पटलासमोर मालकांची केबिन होती. मालक केबिनमध्ये नसल्याने मी श्री. उमेश लंबे यांना येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा मी त्यांच्याकडून सर्व विषय समजून घेतला. त्यांना वृत्तपत्रात लेख आणि वार्ता द्यायची होती. ती मी स्वीकारली आणि ‘वृत्तपत्रात लावण्यासाठी प्रयत्न करतो’, असे त्यांना सांगितले.

१ आ. संस्थेचे कार्य समजून घेऊन शंकानिरसन करवून घेणे आणि संस्थेच्या पहिल्या प्रवचनास वार्ता प्रसिद्ध केलेला वृत्तपत्राचा अंक घेऊन उपस्थित रहाणे : त्यानंतर मी सनातन भारतीय संस्कृती संस्थेविषयीची माहिती आणि संस्थेचे कार्य समजून घेतले. त्या वेळी जवळजवळ २ घंटे मी देवाविषयी माझी मते सांगितली आणि शंकानिरसन करवून घेतले. मी संस्थेच्या पहिल्या प्रवचनास वार्ता प्रसिद्ध केलेला वृत्तपत्राचा अंक घेऊन उपस्थित राहिलो. प्रवचनानंतर मी संस्थेचे साहित्य माझ्याकडे ठेवून घेतले. अशा रितीने माझ्या सेवेला प्रारंभ झाला.

२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमांना उपस्थित रहाण्याचे मिळालेले महद्भाग्य !

२ अ. अभ्यासवर्ग अन् सत्संग यांना नियमित उपस्थित राहू लागणे, वर्ष १९९४ मध्ये पहिल्या गुरुपौर्णिमेसाठी धुळे येथे जाण्याचे भाग्य लाभणे, तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी पहिली भेट होणे आणि ‘वार्ता अन् लेख वृत्तपत्रात देण्याची सेवा करत जा’, असे त्यांनी सांगणे : प्रतिमास होणारा अभ्यासवर्ग आणि प्रत्येक आठवड्याला होणारा सत्संग यांना मी नियमित उपस्थित राहू लागलो. वर्ष १९९४ मध्ये पहिल्या गुरुपौर्णिमेसाठी माझे धुळे येथे जाण्याचे नियोजन झाले होते. एका टॅ्रक्समधून सांगलीहून साधकांनी जाण्याचे ठरवले आणि मला पहिल्या गुरुपौर्णिमेला उपस्थित रहाण्याचे भाग्य लाभले. आदल्या दिवशी सकाळी ८ वाजता आम्ही धुळ्यात पोहोचलो. त्या वेळी माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी पहिली भेट झाली. मी एका वृत्तपत्रात नोकरी करत असल्याने ‘तुम्ही अशाच वार्ता आणि लेख वृत्तपत्रात देण्याची सेवा करत जा’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सांगितले.

२ आ. प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन झाल्यावर ‘ते पूर्वपरिचित आहेत’, असे वाटणे आणि ‘आपण सर्व जण एकाच कुटुंबातले आहोत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे : त्या दिवशी महाप्रसादानंतर प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनाला प्रारंभ झाला आणि पहाटे ४ वाजेपर्यंत आम्ही सर्व जण आनंदात डुंबत होतो. त्यानंतर दर्शनाला आरंभ झाला. प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) प्रसाद देत आशीर्वाद देत होते. त्या वेळी ‘प.पू. बाबा कुणीतरी चांगले पूर्वपरिचित आहेत’, असे मला वाटू लागले. ही गोष्ट मी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘आपण सर्व जण एकाच कुटुंबातले आहोत.’’ अशा प्रकारे प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या आशीर्वादाने माझा साधनेचा प्रवास चालू झाला.

२ इ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनातील शब्द कळत नसतांनाही त्यांतील चैतन्यामुळे भजनाची गोडी लागणे आणि तेथून भावजागृतीला प्रारंभ होणे : प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन हे माझ्या आयुष्यातील पहिले भजन असल्याने मला त्यांतील शब्द कळत नसतांनाही आनंद अन् चैतन्य यांमुळे मला भजनाची गोडी लागून मी आनंदात रममाण झालो. तेथून माझ्या भावजागृतीला प्रारंभ झाला.

२ ई. संत भक्तराज महाराज यांच्या इंदौर येथे झालेल्या अमृत महोत्सवाची सर्व उभारणी साधकांनी केलेली असल्याने तेथे चैतन्य जाणवणे : वर्ष १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव इंदौर येथे करायचे ठरल्यावर मी तेथे सहकुटुंब जाण्याचे ठरवले. तेथे मोठ्या पटांगणात तंबू ठोकून साधकांच्या निवासाची व्यवस्था केली होती. सर्व उभारणी साधकांनी केल्यामुळे तेथे चैतन्य जाणवत होते. प्रवेशद्वारावर २१ फुटी खंजिरी बनवली होती. ‘हेलीकॉप्टर’मधून पुष्पवृष्टी, शोभायात्रा, रात्री प.पू. बाबांच्या चरित्रावर नाटक’, असे नियोजन होते.

२ उ. प.पू. भक्तराज महाराज यांनी कार्यक्रमाला आलेल्या साधकांपैकी ५०० साधकांना चांदीचे नाणे देणे : प.पू. बाबा साधकांना चांदीचे नाणे भेट देणार होते. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत सेवेला होतो. साधारण ५०० नाणी होती आणि ७०० ते ८०० साधक होते. ती सूची परात्पर गुरु डॉक्टरांनी मला दाखवली. ५ मिनिटांतच परात्पर गुरु डॉक्टरांनी ५०० साधकांची सूची सिद्ध केली. त्या साधकांना भेट म्हणून ती नाणी देण्यात आली.

२ ऊ. चांदीचे नाणे भेट मिळाल्यावर त्याची पूजा करण्याच्या हेतूने ते नाणे देवघरात ठेवणे : मला नाणे भेट मिळाल्यावर ‘त्याची पूजा करावी’, या हेतूने मी ते नाणे देवघरात ठेवले. त्यामुळे आम्हा सर्वांना सतत चैतन्य मिळत होते.

या कार्यक्रमाला मी माझ्या दोन लहान मुलींनाही घेऊन गेलो होतो. दिवसभर सेवेत असल्याने त्यांना अंघोळ घालणे, त्यांचे जेवण इत्यादी सेवा २ – ३ साधिकाच बघत असल्याने आमच्या सेवेत कोणताही अडथळा आला नाही. मुलीही आनंदात होत्या.

२ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम न्यूनतम व्ययात केला जाणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या देखरेखीखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी सर्व जिल्ह्यांतून साधक मुंबईला येऊन तेथून इंदौरला आले होते. त्यांचे आगगाडीने जाण्याचे नियोजन, सर्वांचा डबा, आरक्षण, प्रवासखर्च हे सर्व न्यूनतम व्ययात केले गेले होते.

हा अनमोल सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पहाण्याचा योग आम्हाला मिळाला आणि तेथे सेवा करण्याची अनमोल संधी मिळाली, त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो.

३. संस्थेच्या प्रसाराविषयी लिखाण केलेले ५ आकाशकंदील सातारा केंद्रात लावल्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या चैतन्याने सर्वांची दृष्टी त्यांकडे आकर्षित होणे

वर्ष १९९५ मध्ये कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झालेल्या गुरुपौर्णिमेला मी सहकुटुंब गेलो होतो. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांनी भजने म्हटली होती. याच वर्षी साधकांनी लोखंडी सांगाडे बनवले. साधकांनी पिवळ्या कापडावर संस्थेच्या प्रसाराविषयीचे लिखाण लिहिले. त्या लोखंडी सांगाड्यावर उशीला अभ्रा घालतो, तसे ते कापड घालून त्यात मोठा दिवा सोडला. दिवाळीला असे ५ आकाशकंदील सातारा केंद्रात लावले गेलेे. यातून निर्माण झालेल्या चैतन्याने सर्वांची दृष्टी त्यांकडे आकर्षित होत होती.

‘संस्थेच्या कार्याचा प्रचार-प्रसार करणे’, ही कल्पना आम्हा सर्व सातारकरांना फार भावली. अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टर प्रसारातील साधकांना सेवेत टिकवून ठेवत असत आणि त्यांचा आनंद त्यातून द्विगुणीत करत असत.

४. साधकांकडून वेगवेगळे प्रयोग करवून घेऊन त्यांना सूक्ष्म जगताचा अभ्यास करण्यास शिकवणे

४ अ. साधकांकडून देवतांच्या मूर्तीचा प्रयोग करवून घेऊन ‘कोणतीही मूर्ती कुठूनही आणून पूजणे किती धोक्याचे आहे !’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या लक्षात आणून देणे : परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक ३ – ४ मासांनी कोल्हापूरला जाता-येता सातार्‍यात आम्हाला भेटून प्रोत्साहित करत असत. एकदा तर त्यांनी एका डब्यातून देवाच्या ७ – ८ मूर्ती आणल्या होत्या. त्यांतील एकेक मूर्ती आम्हा साधकांच्या हातात देऊन त्यांनी आम्हाला ‘काय वाटते ?’, असे विचारले. एक मिनिटभर मूर्ती हातात घेतल्यावर गरगरणे, डोके जड होणे, चक्कर येणे इत्यादी त्रास होत असल्याचे साधक सांगू लागले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘अनिष्ट शक्तींचा प्रयोग करून आणि देवघरातील देवतांना पीडित करून घरातील कुटुंबियांना त्रास देण्याचे अघोरी कार्य करणारे लोक घरातील देवतांचा कसा वापर करतात ?’, हे पहा’, असे सांगून आम्हाला प्रयोग करून दाखवले आणि ‘कोणतीही मूर्ती कुठूनही आणून पुजणे किती धोक्याचे आहे !’, हे आमच्या लक्षात आणून दिले.

४ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला संतांचे छायाचित्र आणि देवतांचे चित्र पाकिटात ठेवून त्याद्वारे त्या चित्रांचे ‘रीडिंग’ काढायला शिकवले.

अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सूक्ष्म जगताचाही अभ्यास करण्यास आम्हाला शिकवले.

५. वर्ष १९९७ पासून जिल्हानिहाय गुरुपौर्णिमा साजरी करणे चालू होणे

वर्ष १९९६ ची गुरुपौर्णिमा सांगली येथे झाली. तेथे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून शेकडो साधक आले होते. सर्वांचा प्रवासाचा, जेवणा-खाण्याचा व्यय पहाता वर्ष १९९७ ची गुरुपौर्णिमा वेगवेगळ्या जिल्ह्यांत करायचे ठरले; कारण प्रसार वाढत चालला होता. त्यानुसार जिल्हानिहाय गुरुपौर्णिमा साजरी करणे चालू झाल्या.

६. पत्नीचा साधनेला असलेला विरोध परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मावळणे

६ अ. ‘नामजप आणि प्रसार करणे’, हे पत्नीला पटत नसणे : वर्ष १९९४ पासून माझ्या घरी साधक येत-जात असल्याने मुली आणि पत्नी यांना साधनेची गोडी लागली. प्रथम माझी पत्नी सौ. राजेश्‍वरी हिचा विरोध होता. तिला ‘देवपूजा, तीर्थयात्रा, यज्ञयाग इत्यादी करणे, म्हणजे देवाचे करणे’, असे वाटायचे. ‘नामजप आणि प्रसार करणे’, हे तिला पटत नव्हते.

६ आ. चुकांविषयीच्या सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाच्या पत्नीच्या हातात ध्वनीक्षेपक देणे, तिने तिच्या मनातील सर्व विचार सांगणे आणि ‘या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिच्या मनातील सर्व दूषित विचार काढून तिचा विरोध संपवला’, असे जाणवणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टर सातार्‍यात आल्यावर एका सत्संगाचे नियोजन केले होते. त्या वेळी सेवेतील चुका, शंका, यांविषयीचा सत्संग चालू होता. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सांभारेंच्या पत्नी कुठे आहेत ?’, असे विचारले. तिला पुढे बोलावून परात्पर गुरु डॉक्टरांनी तिच्या हातात ध्वनीक्षेपक दिला. साधारणतः १ घंटा ती तिच्या मनातील सर्व विचार त्यांना सांगत होती. यातून त्यांनी माझ्या पत्नीच्या मनातील सर्व दूषित विचार काढून तिचा विरोध संपवला. तेव्हापासून माझ्या साधनेच्या आड कुणाकडून विरोध / शंका काहीही आले नाही. माझ्यावर ही मोठी गुरुकृपा झाली.

७. साधकसंख्या नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका साधकासाठी सातार्‍यात गुरुपौर्णिमा आयोजित करणे आणि यातून त्यांच्या साधकांवरील प्रीतीची प्रचीती येणे

वर्ष १९९७ मध्ये कराड येथे गुरुपौर्णिमा झाली. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर सातार्‍यात भेटीला आले असतांना मी ‘सातारा येथे गुरुपौर्णिमा करावी’, अशी आग्रही भूमिका मांडली. सातार्‍यात साधकसंख्या अपुरी असूनही इतर ठिकाणाहून साधक बोलावून गुरुपौर्णिमा करण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली.

साधकसंख्या नसतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासारख्या केवळ एका साधकासाठी सातारा केंद्रात गुरुपौर्णिमा आयोजित केली. यातून मला परात्पर गुरु डॉक्टर साधकांवर करत असलेल्या प्रेमाची प्रचीती आली. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. गुरूंप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

८. गोव्याहून ६ साधक प्रसारासाठी सातारा केंद्रात येणे, त्यांची निवासाची व्यवस्था साधकाच्या लहान घरात असणे आणि ‘यापुढे कोणीही आले, तरी त्यांची व्यवस्था चांगली होण्यासाठी माझ्यावर गुरुकृपा होऊ दे’, अशी गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर भाव जागृत होणे

वर्ष १९९७ मध्ये गोव्याहून ६ साधक प्रसारासाठी सातारा केंद्रात आले. प्रसार झाल्यानंतर ते विश्रांती घेण्यासाठी आणि रात्री निवासासाठी माझ्या घरी होते. त्या वेळी मी भाड्याच्या लहान घरात रहात होतो. त्यामुळे एका खोलीत आम्ही १० जण आडवे-उभे झोपलो. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘हे देवा, साधकांच्या रूपात आपण आला आहात; पण माझी स्थिती आपल्याला दिसते. यापुढे सातार्‍यात कोणीही आले, तरी त्यांची भोजन आणि निवास व्यवस्था चांगली होण्यासाठी माझ्यावर गुरुकृपा होऊ दे.’ त्या वेळी माझा भाव जागृत झाला.

९. नवीन घर बांधल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे तेथे आयोजित केलेला सत्संग सोहळा आणि ‘घर हा आश्रम आहे’, याची घेतलेली अनुभूती !

९ अ. घराला ‘नाम’ असे नाव ठेवणार असल्याचे सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भरभरून कौतुक करणे : त्यानंतर माझ्या मनात घर बांधण्याचे विचार चालू होऊन मी ६ मासांत घर बांधले. मी या घराच्या वास्तूशांतीसाठी येण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना निमंत्रण दिले. त्यांनी मला ‘घराला काय नाव देणार ?’, असे विचारले. तेव्हा मी त्यांना घराला ‘नाम’ असे नाव देणार असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी माझे भरभरून कौतुक केले. त्यांना ‘नाम’ हे नाव पुष्कळ आवडले. मी शीव येथेे परात्पर गुरु डॉक्टरांना निमंत्रणपत्रिका पाठवली. पत्रिकेची पोहोच म्हणून श्री. रमेश शिंदे यांनी आम्हाला कळवले, ‘सत्संग सोहळा ठरवा. परात्पर गुरु डॉक्टर येणार आहेत.’ रमेशदादांनी सांगितले, ‘‘प.पू. बाबांनी जर्मनीच्या ‘इंजे’ नावाच्या शिष्येच्या घराला ‘नाममात्र’ हे नाव दिले होते. त्यानंतर अशा प्रकारचे नाव घराला देणारे तुम्ही दुसरे आहात. त्यामुळे परम पूज्यांना हे फार आवडले आहे.’’

९ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घराला ‘नाम’ हे नाव देण्यामागील विचारप्रक्रियेविषयी विचारल्यावर ‘त्या माध्यमातून नामाचा प्रसार व्हावा’, असा उद्देश असल्याचे सांगणे : घर बांधल्यापासून ‘घर हा आश्रम आहे’, असा माझा भाव आहे. घर बांधल्यानंतर झालेल्या सत्संग सोहळ्याच्या वेळी प्रथमच ‘गुरुमाऊली विष्णुस्वरूप आहेत’, याची मला जाणीव झाली. सत्संग सोहळ्यानंतर प्रत्यक्ष भेटीत परात्पर गुरु डॉक्टरांनी मला घराला ‘नाम’ हे नाव देण्यामागील विचारप्रक्रियेविषयी विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘कुणालाही पत्ता सांगतांना नाम घेण्याची आठवण होईल. पत्ता घेतांना घराचे नाव उच्चारल्यावर साधना आणि कुलदेवतेचे नाम घेण्याची त्यांना बुद्धी होईल.’’

९ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले घरी जेवायला आलेले असतांना एक किलो तांदुळाच्या भातात ३० ते ४० जण जेवल्याची अनुभूती येणे : परात्पर गुरु डॉक्टर घरी जेवायला येणार; म्हणून माझ्या पत्नीने सर्व स्वयंपाक बनवला होता. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आणि सौ. कुंदाताई यांनी तिचे पुष्कळ कौतुक केले होते. त्या दिवशी एक किलो तांदुळाचा भात ३० ते ४० जण जेवल्याची अनुभूती आली.

९ ई. एका कागदावर ‘हे नवीन बांधलेले घर अर्पण करत आहे’, असे लिहून पाकिटात घालून ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर वाहाणे, ‘ही वास्तू अर्पण करत आहे’, असे त्यांना सांगणे आणि पत्नी अन् दोन मुली यांनीही या निर्णयाला अनुमोदन देणे : मी एका कागदावर ‘हे नवीन बांधलेले घर अर्पण करत आहे’, असे लिहून पाकिटात घालून ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर वाहिले आणि त्यांना ‘ही वास्तू अर्पण करत आहे’, असे सांगितले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या पत्नीला ‘इकडे या’, असे म्हणून बोलावून घेतले आणि ‘सांभारे काय करतात, पाहिले का ?’, असे विचारले. त्यावर पत्नीने त्यांना सांगितले, ‘‘आम्ही दोघांनी मिळूनच हा निर्णय घेतला आहे.’’ तेव्हा ते ‘छान आहे’, असे म्हणाले. आम्ही दोघांनी नमस्कार केला. आम्ही ‘हे घर म्हणजे गुरूंचा आश्रम आहे’, या भावाने आनंद घेत राहिलो.

माझ्या दोन्ही मुलींनीही ‘हा आश्रम आहे’, असाच भाव ठेवला. मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही लग्नानंतर काही मागायचे नाही. केवळ तुम्ही या ठिकाणी येऊ शकता.’’ त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘आम्हाला आश्रमात रहायला आवडेल.’’  माझ्या साधनाप्रवासातील ही एक अनमोल अनुभूती माझ्या मनावर कोरली गेली.

१०. प्रसारासाठी सुचलेल्या नवनवीन कल्पना आणि त्यांचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक !

१० अ. बस डेपोतील एस्.टी. रंगवून त्यावर संस्थेविषयीचे लिखाण लिहून विज्ञापन करणे आणि या उपक्रमाचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पुष्कळ कौतुक करणे : त्यानंतर आमचा वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने प्रसार चालू होता. त्या वेळी कोरेगाव येथील साधकांच्या साहाय्याने बस डेपोतील एस्.टी. रंगवून त्यावर संस्थेविषयीचे लिखाण लिहून विज्ञापन केले. परात्पर गुरु डॉक्टरांनी या उपक्रमाचे पुष्कळ कौतुक करून आम्हाला प्रोत्साहित केले. त्यांची ही प्रीती आम्ही सातार्‍याच्या साधकांनी अनुभवली.

१० आ. साधकांनी पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या आश्रमाविषयी दिनदर्शिका बनवण्याचे सुचवणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सनातन पंचांग’ काढून साधकांच्या कल्पनेला मूर्त रूप देणे : पुढे साधकांनी पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या आश्रमाविषयी दिनदर्शिका बनवण्याचे सुचवले. यामुळे ‘एखाद्याच्या घरातील भिंतीवर संस्थेचे लिखाण वर्षभर दृष्टीसमोर राहून नियमितपणे प्रचार-प्रसार कसा होऊ शकतो ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांना एक नमुना दिनदर्शिका बनवून दाखवले. तेव्हा त्यांनी हे सर्व स्वीकारले आणि पुढे ‘सनातन पंचांग’ काढून आमच्या कल्पनेला मूर्त रूप दिले. त्यामुळे आम्हा सर्वांना आनंद झाला. ‘साधकांच्या माध्यमातून भगवंत विविध कल्पना सुचवत होता आणि त्याचे योग्य वेळी प्रदर्शन करून परात्पर गुरु डॉक्टर योग्य पद्धतीने त्याचा संस्थेच्या कार्याच्या प्रसारासाठी उपयोग करून साधकांची साधना करवून घेत होते’, हे आम्ही फार जवळून अनुभवले.’

(क्रमशः)

– श्री. राजेंद्र नारायण सांभारे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जून २०१८)


Multi Language |Offline reading | PDF