सनातन प्रभातचे विचार भविष्यात राष्ट्रउभारणीच्या विविध टप्प्यांवर पुन्हा पुन्हा अभ्यासले जातील !

वर्धापनदिनानिमित्त संतसंदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले

वर्ष १९९९ मध्ये पत्रकारितेचे कुठलेही शिक्षण नसलेल्या सनातनच्या साधकांना घेऊन मी चालू केलेले दैनिक सनातन प्रभातने आज २० वर्षे पूर्ण करणे, ही एक अनुभूती आहे. ईश्‍वराचे कार्य ईश्‍वरच करवून घेतो, ही ती अनुभूती सनातन प्रभातने वारंवार दिली. पुरेशा प्रमाणात न मिळणारी विज्ञापने, पत्रकारितेतील व्यावसायिकतेचा अभाव, अप्रशिक्षित मनुष्यबळ इत्यादी अनेक अडचणी असूनही ईश्‍वरी कृपेने सनातन प्रभात चालू झाला आणि गेली २० वर्षे आणि वर्षातील ३६५ दिवस, म्हणजे सुटी न घेता अहर्निशं सेवामहे या तत्त्वानुसार कार्यरत राहिला.

स्वातंत्र्यकाळातील केसरीप्रमाणे आजच्या काळात वैचारिक क्रांतीचे कार्य दैनिक सनातन प्रभात करत आहे. स्वातंत्र्यकाळात अन्यायी इंग्रजी शासकांविरुद्ध आवाज उठवणार्‍या केसरीचा आवाज दाबवण्यासाठी संपादकांना अटकेपासून शिक्षेपर्यंत अनेक प्रयत्न केले गेले. अगदी आजही त्याचप्रमाणे सनातन प्रभातच्या संपादकांविषयी घडत आहे. सनातन प्रभातचे माजी संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांना ४ वेळा झालेली अटक असो, कि गौरी लंकेश यांच्या कथित हत्येच्या प्रकरणी सनातन प्रभातचे माजी संपादक कै. शशिकांत राणे यांचे नाव गोवण्याचा दुष्ट प्रयत्न असो, चांगले कार्य करणार्‍यांना विरोध होतोच. जेथे रामकृष्णादी अवतारांना विरोध झाला, तेथे सनातन प्रभातसारख्या छोट्याशा वृत्तपत्राला विरोध होणे स्वाभाविक आहे.

भारतात प्रतिदिन लाखोंच्या संख्येने वृत्तपत्रे प्रकाशित होत असतांना प्रस्थापित लोकराज्यातील व्यवस्थांना सनातन प्रभातचे भय वाटते, हेच आश्‍चर्यकारक आहे. सनातन प्रभातच्या विचारांमधील तेजस्विता, हेच यामागील कारण आहे. सनातन प्रभातच्या विचारांमध्ये राष्ट्र-धर्मसंस्थापनेचे शाश्‍वत दृष्टीकोन असतात. त्यामुळे सनातन प्रभातचे विचार भविष्यात राष्ट्रउभारणीच्या विविध टप्प्यांवर पुन्हा पुन्हा केवळ वाचलेच नव्हे, तर अभ्यासले जातील आणि कृतीत आणले जातील ! सनातन प्रभातचे कार्य साधकांच्या त्यागावर आधारित आहे. अध्यात्मात त्याग केल्यानेच उन्नती होते. सनातन प्रभातसाठी कार्यरत सर्व साधकांनी समष्टी हितासाठी त्याग केल्याने निःसंशय त्यांचीही आध्यात्मिक उन्नती होईल !

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक-संपादक, सनातन प्रभात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now