ध्येय दृष्टीपथात !

विशेष संपादकीय

सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा आज द्विदशकी वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. एका अर्थाने आतापर्यंतच्या वाटचालीचा मागोवा घेण्याचा हा दिवस आहे. आमचे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९८ मध्ये भारतावर निधर्मी, साम्यवादी विचारांचा पगडा असतांना ईश्‍वरी राज्याची स्थापना हे ध्येय ठेवून सनातन प्रभात नियतकालिके आरंभली. सनातन प्रभातची आध्यात्मिक पत्रकारिता म्हणजे तेव्हाच्या प्रस्थापित पत्रकारितेच्या विरुद्ध दिशेने पोहणेच होते. त्या वेळी समाजात अनेक कटू-गोड प्रतिक्रिया उमटल्या. त्यातीलच एक म्हणजे चळवळीचे दैनिक फार काळ चालत नसते ! थोडे दिवस चालेल आणि कालांतराने बंद होईल, अशी काहीशी धारणा या मंडळींनी करून घेतली होती. बोलणार्‍यांची चूक म्हणता येणार नाही. गेल्या काही दशकांत काही संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यामुळे हिंदुत्व हा तात्कालिक लाभ करून घेऊन सोडून देण्याचा विषय आहे, असाच समज समाजात पसरला होता. सनातन प्रभात आणि सनातन परिवारातील अन्य संघटना यांनी गेल्या दोन दशकांत निर्धारपूर्वक तो समज मोडून काढला. ईश्‍वरी राज्याची स्थापना अथवा नंतरच्या काळात हिंदु राष्ट्राची स्थापना ही हिंदुत्वाची चळवळ आहे, असे म्हणावे, इतके हे कार्य मर्यादित नाही, हे कालौघात समाजाला कळले. आरंभी सनातन प्रभातच्या विचारांची त्रयस्थपणे चाचपणी करणारे नंतर या कार्यात सहभागी होऊ लागले. सनातन प्रभातचे राष्ट्र, धर्म आणि हिंदुत्व यांच्या रक्षणाचे कार्य जसजसे वाढत गेले, तसतसे त्याचे समाजात सकारात्मक परिणाम दिसू लागले आणि आमच्या कार्यातील अडथळेही वाढले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात माध्यमांची मुस्कटदाबी केली. अनेक निर्बंध लादले.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील सत्ताधारी शासनकर्त्यांनी त्याहून कठीण काळ सनातन परिवाराला भोगायला लावला. सनातन प्रभातचा दुसर्‍या दिवशीचा अंक प्रसिद्ध होईल कि नाही, अशीही स्थिती निर्माण झाली. केवळ शासनकर्तेच नाही, तर जात्यंध, धर्मांध, पुरो(अधो)गामी, अशा अनेक गटांनी सनातन प्रभातचे हिंदुत्व झाकोळण्याचा प्रयत्न केला. असे असूनही तेवढ्याच प्रखरपणे हिंदूजागृतीचे कार्य चालू ठेवण्याचे बळ आम्हाला भगवंताने पुरवले. ईश्‍वराच्याच कृपेने यापुढेही सनातन प्रभातचे मार्गक्रमण चालूच राहील.

आपत्काळ आणि सनातन प्रभात !

हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्दिष्ट साध्य करणे, हे केवळ भगवा रंग घेऊन हिंदुत्वाचा शाब्दिक पुरस्कार करण्याइतके सोपे नाही. हिंदु राष्ट्र संकल्पनेत राष्ट्राचे सर्व स्तरांवर उत्थापन अपेक्षित आहे. त्यात अर्थात पत्रकारिताही येतेच ! सध्याचा काळ सामाजिक संघर्षाचा आणि अस्थिरतेचा आहे. जागतिक स्तरावरील घडामोडी पहाता कधीही तिसर्‍या महायुद्धाला तोंड फुटेल, अशी स्थिती आहे. राष्ट्रात एखादी मोठी घटना घडते अथवा युद्धाला तोंड फुटते, तेव्हा प्रसिद्धीमाध्यमांनी वार्तांकन किती दायित्वाच्या जाणिवेने करायला हवे, याचे काही निकष आहेत. जागतिक स्तरावरील अनेक माध्यमे त्याचे पालन करत असतात. विदेशांत जेव्हा नैसर्गिक आपत्ती अथवा बॉम्बस्फोट, अपघात यांसारख्या मानवनिर्मित आपत्ती ओढवतात, तेव्हा त्याची अतिरंजित वृत्ते प्रसारित होत नाहीत. जनता किती पीडित आहे, हे दाखवून शासकीय अपयशाची कुणी जागतिक स्तरावर वाच्यता करत नाही. युद्धासारख्या प्रसंगातही सनसनाटी बातम्यांच्या नावाखाली देशाची सुरक्षा धोक्यात आणण्याचा आततायीपणा आजही विदेशांत केला जात नाही. भारतीय पत्रकारितेने मात्र ही सारी नीतीमूल्ये खुंटीला टांगली आहेत. असे असले, तरी सनातन प्रभात कोणत्याही सनसनाटीच्या मागे धावत नाही. आमचे प्राधान्य केवळ सुरक्षा हेच नाही, तर काळाची पावले ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे, हेही आहे. त्या दृष्टीने सनातन प्रभातमध्ये वेळोवेळी संतांचे मार्गदर्शन, दृष्टीकोन आणि विविध लेखकांचे लेखही प्रसारित होत असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे काळाची पावले ओळखणारे द्रष्टे संत संस्थापक असलेल्या सनातन प्रभातने प्रथमपासूनच केवळ बातम्या प्रसिद्ध करण्याची नाही, तर राष्ट्रीय उत्थापनाची भूमिका घेतलेली आहे. आम्ही आपत्काळातून तरून जाण्यासाठीच्या उपाययोजना वारंवार प्रसिद्ध करत आहोत. न मे भक्तः प्रणश्यति (अर्थ : माझ्या भक्ताचा नाश होत नाही.) या भगवान श्रीकृष्णाच्या वचनाचे स्मरण ठेवून सनातन प्रभातमध्ये समाजाला साधनेविषयी मार्गदर्शनही करण्यात येत आहे. आतापर्यंत हिंदूंवरील अत्याचार, धर्मांधांच्या कारवाया, सामाजिक भ्रष्टाचार, शासनकर्त्यांचा पक्षपातीपणा यांसारख्या अनेक विषयांवर सनातन प्रभातने जागृती केली आहे. या सर्वांसमवेतच येत्या काळात आपत्काळाविषयी वाचकांना सतर्क करणे, आपत्काळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी उपाययोजना सांगणे आणि अधिकाधिक जणांचे जीवितरक्षण करणे, हीच सनातन प्रभातच्या कार्याची आगामी दिशा रहाणार आहे. तिसरे महायुद्ध, उंबरठ्यावर आलेला आपत्काळ यांच्या कालावधीत समाजरक्षणाच्या कार्यात मोठी भूमिका सनातन प्रभात समूह पार पाडील. अशा घटनांकडे टी.आर्.पी. वाढवण्याच्या उथळ दृष्टीकोनातून न पहाता प्रगल्भ आणि कृतीशील पत्रकारितेचे दर्शन आम्ही सार्‍या विश्‍वाला घडवू !

झुंजत रहा !

दोन युगांच्या या संधीकाळात आपत्काळानंतर कलियुगांतर्गत ईश्‍वरी राज्याची मंगलमय पहाट अनुभवायला मिळेल, असे संतांनी यापूर्वीच सांगितले आहे. समाजही आता पूर्वीप्रमाणे निधर्मी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी, वैचारिक बुद्धीभेदी यांच्या (कु)प्रचाराला बळी न पडता योग्य-अयोग्यची पारख करायला शिकला आहे. प्रसंगी अधर्मींचा प्रतिकारही हिंदूंकडून उत्स्फूर्तपणे केला जात आहे. सनातन प्रभातचा हिंदु राष्ट्राचा (ईश्‍वरी राज्याचा) विचार समाजाने स्वीकारला आहे, हेच यातून दिसून येते. गत काही वर्षांत हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी उघड चर्चा होत आहे. अन्य प्रसारमाध्यमे, राजकारणी आणि विरोधक यांनाही हिंदु राष्ट्राविषयी उत्तरे देण्यास ठिकठिकाणचे धर्मप्रेमी भाग पाडत आहेत, हेच सनातन प्रभातचे यश आहे. संतांची वाणी आणि वेगाने पालटत जाणारी ही सामाजिक स्थिती पहाता हिंदु राष्ट्र, म्हणजेच ईश्‍वरी राज्य दृष्टीपथात आले आहे. ईश्‍वराने गोवर्धन उचलला आहे. सनातन प्रभातचे वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक, वितरक अशा सर्वांनी त्याला काठ्या लावलेल्याच आहेत. त्यामुळे साहजिकच हा बुद्धीभेद्यांशी असलेला संघर्षही अधिक कडवा झाला आहे. असे असले, तरी भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य घेऊन भारतवर्षात ती मंगलमय पहाट उजाडेपर्यंत झुंजत रहाण्यासाठी हा सनातन प्रभात समूह कटीबद्ध आहे !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now