रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील सनातन प्रभातच्या कार्यालयाचे गुरुदेवांच्या कृपेने आणि संतांच्या मार्गदर्शनानुसार नूतनीकरण झाल्यानंतर तेथील चैतन्यात झालेली आश्‍चर्यकारक वाढ !

एखाद्या नियतकालिकाचे किंवा वृत्तपत्राचे कार्यालय म्हटले की, तेथे संपादक, उपसंपादक, कार्यकारी संपादक, सहसंपादक, पृष्ठ संपादक, पृष्ठांची रचना (फॉर्मेटिंग) करणारे संरचनाकार, वार्ताहर आदी सर्व आलेच, तसेच तेथे अन्य नियतकालिकांचे अंक, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी संच आदी आवश्यक सर्व साधनसामग्री हवीच. येथे समाजप्रबोधन करत असल्याचे सांगत एखादे वृत्तपत्र काढणे; मात्र ते व्यावसायिक हेतूने चालवणे, हाच बहुतांश नियतकालिकांचा उद्देश असतो; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले संस्थापक-संपादक असलेल्या सनातन प्रभात नियतकालिकांचा उद्देशच निराळा आहे.

केवळ बातम्या देणे, हा सनातन प्रभातचा उद्देश नाही, तर योग्य दृष्टीकोनासह बातम्या प्रसिद्ध करणे; वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि साधक यांच्यासह सर्व समाजाला काळानुसार आवश्यक असलेल्या साधनेविषयी मार्गदर्शन करणे; सर्वांना धर्मशिक्षण देऊन राष्ट्र अन् धर्म यांसाठी कृतीशील करणे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित करणे, असे ध्येय ठेवून सनातन प्रभात गेली २० वर्षे कार्य करत आहे. अशा सनातन प्रभातच्या नियतकालिकांची सेवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह सद्गुरु, संत यांचे वास्तव्य असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात गेल्या १२ वर्षांहून अधिक काळ चालू आहे.

या सनातन प्रभातच्या कार्यालयाचे फेब्रुवारी २०१९ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. येथे केवळ नूतनीकरण करण्यात आले नाही, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे या कार्यालयाचे चैतन्यमय अन् पवित्र वास्तूत रूपांतर झाले. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे ध्येय ठेवून निःस्वार्थी वृत्तीने कार्य केल्यास एखाद्या नियतकालिकाचे कार्यालयही कसे सात्त्विक आणि चैतन्यमय बनते, याचे आताच्या काळातील सनातन प्रभात हे एकमेव उदाहरण असेल; म्हणूनच या नियतकालिकाच्या चैतन्यमय वास्तूतील स्थूल आणि सूक्ष्म रूपातील वैशिष्ट्ये जाणून घेणे, हे तितकेच महत्त्वाचे ठरते.

सनातन प्रभातच्या नूतन चैतन्यमय कार्यालयात नियतकालिकांची सेवा करतांना साधक आणि १ स्वतंत्र कक्षात बसवलेला दूरचित्रवाणी संच

१. सनातन प्रभातच्या कार्यालयाचे नूतनीकरण करतांना आधीची रचना पालटून ती अधिक सात्त्विक करण्याविषयी एका संतांनी दिलेली दिशा !

रामनाथी येथील आश्रमातील सनातन प्रभातच्या मुख्य कार्यालयाची नूतनीकरण होण्याआधीची रचना काहीशी वेगळी होती. येथे निवडक संख्येने असलेल्या संपादक मंडळाच्या दैनंदिन कार्यालयीन बैठकीसाठी स्वतंत्र कक्ष नव्हता. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर महत्त्वाच्या घडामोडी पहाण्यासाठी असलेला दूरचित्रवाणी संचही सर्वांनाच दिसेल, अशा रितीने एका विशिष्ट ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. हा दूरचित्रवाणी संच दिवसभर चालू असे. त्यामुळे त्याकडे सातत्याने सर्वांचेच लक्ष वेधले जाऊन ते मूळ सेवेपासून विचलित होत असे; मात्र दूरचित्रवाहिन्यांवरील दिवसभरातील घडामोडी आणि अन्य महत्त्वाची चर्चासत्रे पहाणे, ही संपादकीय विभागातील सर्वांचीच सेवा आहे, अशीच काहीशी विचारप्रक्रिया सर्वांच्या मनात दृढ झाली होती. त्यामुळे ज्यांनी दूरचित्रवाणी पहाणे आवश्यक नाही, अशांकडूनही तो पाहिला जात होता. त्यामुळे सनातन प्रभातच्या माध्यमातून साधना न होता केवळ कार्य होत होते. त्यानंतर काही मासांपूर्वी कार्यालयाच्या वास्तूचे नूतनीकरण करण्याचे ठरले, त्या वेळी कार्यालयाची रचना सात्त्विक करण्याविषयी एक संत आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सुचवल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार बांधकाम सेवेतील साधक अन् सनातन प्रभातची सेवा करणारे साधक यांनी त्याप्रमाणे सेवा करण्याचे नियोजन केले.

२. संतांच्या मार्गदर्शनानुसार बांधकाम सेवेतील साधकांनी तळमळीने आणि भावपूर्ण सेवा केल्यावर वास्तूत वाढत गेलेले चैतन्य !

वास्तूची रचना अधिक सात्त्विक आणि चैतन्यमय होण्यासाठी संतांच्या मार्गदर्शनानुसार कार्यालयाच्या वास्तूच्या आधीच्या रचनेत काही पालट करण्याचे ठरवण्यात आले. त्यात स्वतंत्र बैठककक्ष बनवणे, म्हणजे त्यातून आवाज बाहेर जाणार नाही किंवा बाहेरील आवाजाचाही बैठककक्षात कोणताही त्रास होणार नाही, तसेच दूरचित्रवाणी संचावर बातम्या पहाण्यासाठीही स्वतंत्र कक्ष बनवणे, म्हणजे तेथे केवळ बातम्यांशी संबंधित सेवा करणारे साधकच बसतील, सनातन प्रभातची वैशिष्ट्ये सांगणारा स्वतंत्र प्रदर्शन कक्ष बनवणे, अशाप्रकारे वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्याविषयी, तसेच भिंती, दरवाजा, खिडक्या हे पांढर्‍या रंगाचे करण्याविषयी आणि सेवेसाठीचे सर्व साहित्यही म्हणजे संगणकाचे पटल, कपाटे आदी पांढर्‍या रंगाचे बनवण्याविषयी संतांनी सुचवले. संतांनी सुचवल्याप्रमाणे भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून बांधकामाची अन् सनातन प्रभातची सेवा करणार्‍या संबंधित साधकांना सातत्याने अमूल्य मार्गदर्शन मिळत होते. सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे हेही तेथील रचना सात्त्विक होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना करत होते. या मार्गदर्शनानुसार ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वास्तू विशारद सौ. शौर्या मेहता, बांधकाम सेवेतील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. सुदिश पुथलत, ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. प्रकाश सुतार, श्री. रामदास कोकाटे आणि अन्य साधक यांची सेवा चालू होती. नूतनीकरणाची ही सेवा चालू असतांना संतही वेळोवेळी येऊन रचना सात्त्विक होण्यासाठी मार्गदर्शन करत होते, तसेच वास्तूत वाढत चाललेलेे चैतन्य अनुभवण्याविषयीही साधकांना सांगत होते.

वास्तूत वाढत चाललेल्या चैतन्याविषयी ते संत म्हणाले, साधारणतः एखाद्या वास्तूत साहित्यांची संख्या जसजशी वाढत जाते, तसतसे तेथील चैतन्य न्यून होत जाते; मात्र सनातन प्रभातच्या वास्तूचे नूतनीकरण करतांना जसजशी साहित्याची म्हणजे संगणक पटल, कपाटे, विद्युत जोडणी आदींची संख्या वाढत आहे, तसतसे चैतन्यही आणखी वाढत आहे. या वेळी तेथे सेवा करणार्‍या साधकांनाही हे चैतन्य तेथील भूमीतून प्रक्षेपित होऊन देहात सर्वत्र पसरत असल्याचीही अनुभूती गुरुदेवांच्या कृपेमुळे येत होती.

३. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर वास्तूत ध्यानमंदिराप्रमाणे चैतन्य निर्माण झाल्याचे एका संतांनी सांगणे आणि प्रत्यक्षातही आश्रमातील अनेक संत अन् साधक यांंनाही वास्तूत प्रवेश केल्यावर तशी अनुभूती येणे

४.२.२०१९ या दिवशी सनातन प्रभातच्या कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याची एका संतांनी पाहणी केली आणि त्याच वेळी ते आश्रमातील ध्यानमंदिरातही नमस्कार करण्यासाठी गेले. त्या वेळी त्या संतांना ध्यानमंदिरात जेवढे चैतन्य आहे, तेवढेच चैतन्य सनातन प्रभातच्या वास्तूतही निर्माण झाले आहे, हे लक्षात आले. त्या संतांनी संबंधित सर्व साधकांनाही त्याविषयी सांगून हे चैतन्य अनुभवण्यास सांगितले. खरे म्हणजे वास्तूत असे चैतन्य निर्माण होणे, ही गुरुदेवांचीच कृपा होती. दुसर्‍या दिवशी, म्हणजे ५.२.२०१९ या दिवशी नूतनीकरण झालेल्या वास्तूत दुपारी सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी उदकशांती विधी केला. त्यानंतर तेथे साधकांनी सनातन प्रभातची सेवा करण्यास आरंभ केल्यानंतर अनेक साधकांना चैतन्याच्या स्तरावरील अनुभूती येत होत्या. आश्रमातील, तसेच आश्रमात काही कालावधीसाठी आलेले संत, साधक यांनाही या वास्तूत आल्यावर पुढीलप्रमाणे अनुभूती आल्या.

अ. एका संतांनी सांगितल्यानुसार प्रत्यक्षातही काही साधकांना सनातन प्रभातच्या वास्तूत ध्यानमंदिराप्रमाणे चैतन्य असल्याचे जाणवले.

आ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ज्या वेळी सनातन प्रभातची संपूर्ण वास्तू पाहिली, त्या वेळी त्यांनी या वास्तूत शांतीची अनुभूती येत असल्याचे सांगितले. नूतनीकरण होण्याआधी वास्तूमध्ये जेथे दूरचित्रवाणी संच होता, तेथे नूतनीकरणानंतर श्रीकृष्णाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. श्रीकृष्णाची ही प्रतिमा पाहिल्यानंतर सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू म्हणाल्या, पूर्वी येथून टीव्हीचा आवाज येत होता, आता येथून तुम्हाला सूक्ष्मातून श्रीकृष्णाचा आवाज ऐकू येईल. यातून एकप्रकारे त्यांनी साधकांनी भावपूर्ण सेवा केल्यास त्यांना श्रीकृष्णाच्या सूक्ष्मातील अस्तित्वाची अनुभूती येऊ शकते, हेच सुचवले होते.

इ. मंगळूरू येथील सनातन आश्रमातून आलेले संत पू. विनायक कर्वेमामा हे सनातन प्रभातचे कार्यालय पहात असतांना त्यांचा भाव जागृत झाला. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. काही क्षण ते याच भावावस्थेत होते. वास्तूतील चैतन्यामुळे आणि सात्त्विक रचनेमुळे त्यांचा गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला होता, असे जाणवले.

ई. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय आणि स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्एस्आर्एफ्) यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या देश-विदेशातील साधकांनीही त्यांना सनातन प्रभातच्या वास्तूत आल्यावर चैतन्य मिळत असल्याचे  सांगितले.

– श्री. भूषण केरकर, सहसंपादक, सनातन प्रभात नियतकालिक सूमह. (७.४.२०१९) ॐ


Multi Language |Offline reading | PDF