‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या मार्च २०१९ मधील संशोधन कार्याचा आढावा !

सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी केरळ राज्यातील थिरुवनंतपुरम्, आरनमुळा आणि कोल्लम् येथे केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

श्री. शॉन क्लार्क
कु. प्रियांका लोटलीकर

‘आजकाल अनेक लोकांचा संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्‍वास असतो. त्यामुळे वर्ष २०१४ पासून ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातूनही संशोधन करण्यात येत आहे. ‘हिंदु धर्मातील आचार, धार्मिक कृती, सामाजिक कृती (उदा. दीपप्रज्वलन, उद्घाटन इत्यादी), यज्ञ, अनुष्ठान, मंत्रपठण इत्यादी विषयांचे आध्यात्मिक महत्त्व आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत समाजाला समजावून सांगणे’, हा या संशोधनाचा उद्देश आहे. यासाठी ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग’, ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.टी.एस्.)’, ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पिप)’, ‘थर्मल इमेजिंग’, ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’ इत्यादी आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि प्रणाली यांचे साहाय्य घेण्यात येत आहे. या संशोधन कार्याला पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्ञानाची, म्हणजे सूक्ष्म परीक्षणाची जोड देऊन विश्‍लेषण करण्यात येत आहे. या संशोधन कार्याचा मार्च २०१९ या मासातील आढावा येथे देत आहोत. ७ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या या लेखाच्या प्रथम भागात आपण मार्च २०१९ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.टी.एस्.)’ या यंत्राच्या साहाय्याने करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संशोधन प्रयोगांविषयी जाणून घेतले. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

६. समाजात जाऊन संशोधन करणे

६ अ. उद्देश : देशातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी विविध धार्मिक स्थळे (मंदिरे, संतांची समाधीस्थाने, संतांचे आश्रम वा मठ आदी), विशेष धार्मिक उपक्रम (यज्ञ-याग, धार्मिक उत्सव आदी), तसेच वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटना यांविषयी आध्यात्मिक संशोधन करण्याच्या उद्देशाने समाजात जाऊन संशोधन केले जाते. हे संशोधन ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले जाते. तसेच त्या संदर्भात केलेल्या चित्रीकरणाची ध्वनीचित्र-तबकडी (सी.डी.) बनवून ती संबंधितांना भेट दिली जाते. या संशोधनातून देशातील विविध स्थानांची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तसेच तेथील संस्कृतीचे जतन आणि संवर्धन यांसाठीचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न यांची माहिती समाजाला मिळते. तेथे केलेल्या संशोधनातून अध्यात्मशास्त्र सांगितल्याने अध्यात्मप्रसार होतो, तसेच सनातन धर्म आणि हिंदु संस्कृती यांचे महत्त्व लोकांवर बिंबते.

६ आ. केरळ राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळांना दिलेल्या भेटी आणि केलेले संशोधन

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चा संशोधन गट कु. प्रियांका लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली केरळ राज्यात संशोधनासाठी गेला आहे. या संशोधन गटाने मार्च मासात केरळ राज्यातील थिरुवनंतपुरम् येथील कवडियार राजवाडा, आरनमुळा येथील ‘वास्तूविद्या गुरुकुलम् – आर्ट गॅलरी’, कोल्लम् येथील ‘आत्मरक्षा तंत्र कलरी विद्या केंद्रम्’ इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. या गटाने तेथे केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संशोधनाविषयी थोडक्यात माहिती पुढे दिली आहे.

डावीकडून केरळच्या राजकन्या श्रीमती अश्‍वति तिरुनाल गौरी लक्ष्मीबाई या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कु. प्रियांका लोटलीकर यांना राजचिन्ह भेट देतांना

६ आ १. थिरुवनंतपुरम् येथील कवडियार राजवाड्याला दिलेली भेट : संशोधन गटाने थिरुवनंतपुरम् येथील कवडियार राजवाड्यात राजकन्या श्रीमती अश्‍वति तिरुनाल गौरी लक्ष्मीबाई (वय ७० वर्षे) यांची भेट घेतली. त्यांनी केरळच्या कूडियाट्टम् नाट्यकलेच्या संदर्भात माहिती दिली. ‘कूडियाट्टम् ही एक संस्कृत नाटिका असून ती प्रतिदिन काही घंटे अशाप्रकारे साधारण ४१ दिवस चालत असे. तसेच कूडियाट्टमसह केरळमधील चाक्कियारकूत्त, नाङ्यारकूत्त या प्राचीन नाट्य प्रकारांचीही जगाने दखल घेतली आहे’, असे त्यांनी सांगितले. त्यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला राजचिन्ह आणि केरळच्या संस्कृतीवर आधारित त्यांनी लिहिलेला ग्रंथ भेट म्हणून दिला.

सनातनच्या कु. प्रणिता सुखटणकर यांना ‘अ‍ॅनामॉर्फिक’ चित्र दाखवतांना त्रिशूर येथील चित्रकार श्री. विन्सेंट पल्लसरी

६ आ २. ‘अ‍ॅनामॉर्फिक’ चित्रे काढणारे त्रिशूर येथील श्री. विन्सेंट पल्लसरी यांची घेतलेली भेट : ‘अ‍ॅनामॉर्फिक’ चित्रकलेत (Anamorphic Painting) गणित, चित्रकला, भौतिकशास्त्र आणि दृष्टीभ्रम यांचा उपयोग केेला जातो. १४ व्या शतकात इटली येथील लिओनार्डो-डा-विन्ची यांनी या चित्रशैलीचा आरंभ केला. पूर्वीच्या काळी ‘अ‍ॅनामॉर्फिक’ चित्रे गुप्त संदेश पाठवण्यासाठी उपयोगात आणली जात असत. या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे चित्र बनवणारा आणि ज्या व्यक्तीला चित्राच्या माध्यमातून संदेश पाठवायचा असेल तिला त्या चित्रावर कोणत्या आकाराचा चमकदार घटक, उदा. नळकांडे, चौकोन, शंकू इत्यादी ठेवल्यावर चित्र व्यवस्थित दिसेल ते ठाऊक असायचे.

६ आ ३. ‘वास्तूविद्या गुरुकुलम् – आर्ट गॅलरी’ येथे ‘म्युरल’ (भिंतीवर थेट रंगवलेली चित्रे) चित्रकलेविषयी केलेले संशोधन : भिंतीवर रंगवलेल्या मोठ्या चित्रांना ‘म्युरल’ चित्रे (Mural Painting) म्हणतात. आरनमुळा (केरळ) येथील ‘वास्तूविद्या गुरुकुलम् – आर्ट गॅलरी’चे म्युरल चित्रकार श्री. सुरेशकुमार यांनी म्युरल चित्रकलेविषयी माहिती सांगितली. त्यांनी काढलेल्या काही म्युरल चित्रांचे, तसेच नैसर्गिक रंगांचे ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. तेव्हा त्या चित्रांमध्ये, तसेच नैसर्गिक रंगांमध्ये सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले.

प्रात्यक्षिके सादर करतांना ‘आत्मरक्षा तंत्र कलरी विद्या केंद्रम्’चे डॉ. प्रकाशन गुरुक्कल (डावीकडे)

६ आ ४. ‘आत्मरक्षा तंत्र कलरी विद्या केंद्रम्’ येथे केलेले संशोधन : कोल्लम् (केरळ) येथील ‘आत्मरक्षा तंत्र कलरी विद्या केंद्रम्’चे डॉ. प्रकाशन् गुरुक्कल (वय ७७ वर्षे) कलरी युद्धकलेतील तज्ञ आहेत. ते विद्यार्थ्यांना ‘कलरीपायटू’ या प्राचीन युद्धकलेचे प्रशिक्षण देतात. डॉ. प्रकाशन् त्यांच्या मातोश्रींकडून ‘शिवयोग’ शिकले. या वैशिष्ट्यपूर्ण युद्धकलेमध्ये आक्रमण करायला येणार्‍या शत्रूवर केवळ स्थिर दृष्टीने पाहून त्याच्यावर प्रति-आक्रमण करता येते अथवा त्याला आहे त्या स्थितीत स्थिर (स्तंभित) करता येते. या वैशिष्ट्यपूर्ण युद्धकलेचे ते एकमेव तज्ञ आहेत. त्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचे ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. त्या वेळी डॉ. प्रकाशन् यांच्यामध्ये प्रात्यक्षिके सादर करण्यापूर्वीही सकारात्मक ऊर्जा आढळली. तिची प्रभावळ ५.४० मीटर होती. त्यांनी प्रात्यक्षिके सादर केल्यानंतर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होऊन ती ७.२३ मीटर झाली. त्यानंतर त्यांनी केवळ २ मिनिटे ध्यान लावले. त्या वेळी त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत विलक्षण वाढ होऊन ती २८ मीटर झाली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. डॉ. प्रकाशन् गुरुक्कल हे मर्म-चिकित्सातज्ञ असून ते ‘मर्माश्रम’ उपचार केंद्र चालवतात.

७. मार्च २०१९ मध्ये २ वैज्ञानिक परिषदांमध्ये सहभाग

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने करण्यात आलेल्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित शोधप्रबंध पुढील परिषदांमध्ये मांडण्यात आले.


७ अ. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने नवी देहली येथे सादर करण्यात आलेल्या शोधप्रबंधाचे वृत्त ‘दैनिक अटल सवेरा’ या गुजराती नियतकालिकात आणि ‘मिस्टिक पावर’ या हिंदी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले.

७ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित शोधप्रबंध ‘पाण्याच्या भौतिक शुद्धतेच्या जोडीला ते आध्यात्मिकदृष्ट्याही शुद्ध असणे आवश्यक !’, ‘जागतिक जल दिना’निमित्त ‘दैनिक गोवन वार्ता’ या मराठी नियतकालिकाने प्रसिद्ध केला.

८. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने आध्यात्मिक संशोधनावर पाठवण्यात आलेल्या ६ प्रबंधांचा पुढे होणार्‍या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांकडून स्वीकार

– कु. प्रियांका लोटलीकर आणि श्री. शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (५.४.२०१९)

ई-मेल : [email protected]

‘गाढवाला गुळाची चव काय ?’, ही म्हण सार्थ करणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने जुलै २०१६ पासून ३१.३.२०१९ पर्यंत ४५ राष्ट्रीय (११) आणि आंतरराष्ट्रीय (३४) परिषदांत शोधप्रबंध सादर करण्यात आले. नुकतेच अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’, तसेच पुरी, ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘खरे नेतृत्व उच्च आध्यात्मिक स्तर असलेली व्यक्तीच करू शकते !’ या शोधप्रबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधप्रबंध’, म्हणून घोषित करण्यात आले. सर्व शोधप्रबंधांचे संशोधनकर्ते आणि लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. त्यांच्या हिंदु धर्म, संस्कृती इत्यादी विषयांवरील संशोधनकार्याच्या एक लक्षांश तरी कार्य तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केले आहे का ? ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, अशा वृत्तीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना परात्पर गुरु  डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये काय कळणार !’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF