आजन्म हिंदु धर्मप्रसार आणि धर्मरक्षण करणारे ‘दैनिक सनातन प्रभात’ ! – पू. पद्माकर होनप

पू. पद्माकर होनप

१. दैनिक सनातन प्रभात म्हणजे प्रतिदिनचा सत्संग !

दैनिक सनातन प्रभात हे साधकांच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. साधकांच्या सकाळचा प्रारंभ दैनिक सनातन प्रभातने होतो. साधकांना दैनिकातील लिखाण माझ्यासाठी आवश्यक आहे, या विचाराने दैनिक सनातन प्रभातमध्ये काय आले आहे ?, याची उत्कंठा लागलेली असते. दैनिक सनातन प्रभात म्हणजे प्रतिदिनचा सत्संग आहे. या सत्संगात मला काय शिकायला मिळाले ?, याचा अभ्यास होतो. दैनिकात सांगितल्याप्रमाणे कृती मी आचरणात आणू शकतो. दैनिक सनातन प्रभातचे वाचन, मनन आणि चिंतन कसे करावे ?, यासाठी परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु पांडे महाराज दैनिकाचे वाचन कसे करायचे ?, ते दिले आहे.

२. मनात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन आणि व्यष्टी अन् समष्टी साधनेविषयी मार्गदर्शन करून आध्यात्मिक उन्नतीस साहाय्य करणारे दैनिक सनातन प्रभात !

दैनिक सनातन प्रभातचे वाचन करतांना लेखणी आणि कागद समवेत घेऊन वाचले पाहिजे. वहीत टिपण काढले पाहिजे. याचा आपल्याला केव्हाही लाभ होऊ शकतो. दैनिक सनातन प्रभातमध्ये आलेले विचार लिहू शकतो. प्रतिदिन न्यूनतम एक तरी सूत्र लिहिले आणि कृतीत आणले, तर १ मासात ३० चांगल्या कृती आपल्याकडून होतील. मनात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दुसर्‍या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेली असतात. व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी दैनिक सनातन प्रभातचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जे साधक आणि हिंदु धर्माभिमानी यांना काही कारणाने प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत नाही, ते दैनिक सनातन प्रभातमधील व्यष्टी साधनेची सूत्रे शिकून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवत आहेत अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठत आहेत किंवा संतपदी विराजमानही होत आहेत.

३. व्यष्टी साधनेच्या दृष्टीने ईश्‍वरप्राप्ती आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने हिंदु राष्ट्राची स्थापना या ध्येयांचे सतत स्मरण करून देणारे सनातन प्रभात !

साधना करतांना ती कशासाठी करत आहोत, याचा आपल्याला विसर पडतो. याचे उत्तर म्हणजे आपण व्यष्टी साधना ईश्‍वरप्राप्तीसाठी आणि समष्टी साधना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करत आहोत. या ध्येयाचा विसर पडू नये; म्हणून दैनिक सनातन प्रभातमधून हेच तुमचे ध्येय आहे, याची सतत जाणीव करून देण्यात येत आहे. धर्मप्रसार करणे म्हणजे समाजात सात्त्विकता निर्माण करणे होय. सात्त्विकता निर्माण झाली की, लोक धर्माचरणी बनल्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती मिळेल; म्हणूनच परात्पर गुरु डॉक्टर म्हणतात, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १०० संतांची आवश्यकता आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी साधना होण्यासाठी प्रयत्न करूया. ती कशी करायची, याचे सतत मार्गदर्शन सनातन प्रभातमधून मिळत असते. त्याचा लाभ घेऊन ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करूया. देव हाकेला धावून येतो, याची आपण अनुभूती घेत आहोत. साधक मी सेवा करत नसून ईश्‍वर सेवा करतो, याची अनुभूती घेत आहेत, याचे उदाहरण म्हणजे, श्रीखंड्याच्या रूपात विठ्ठल संत एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरतो इत्यादी. या अनुभूतींतून देव भावाचा भुकेला आहे आणि तो भक्ताच्या हाकेला धावून येतो, याची प्रचीती येते.

४. साधकाला आवश्यक आहे, ते दैनिक सनातन प्रभातमधून मिळते !

आज्ञापालन या एका गुणामुळे गुरु शिष्याला गुरु बनवतात. गुरूंना शिष्याची प्रगती व्हावी, असे वाटते. तेव्हा ते स्वतः शिष्याची प्रगती करून घेतात. यापेक्षा आणखी काय पाहिजे ? ज्याला जे आवश्यक आहे, ते दैनिक सनातन प्रभातमधून मिळते. त्याप्रमाणे आपण परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन केले, तर आपल्याकडून त्यांना अपेक्षित कृती होऊन आपली आपोआप आध्यात्मिक उन्नती होईल.

५. दैनिकाच्या माध्यमातून घरबसल्या कुंभदर्शन झाले !

दैनिक सनातन प्रभातकडून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. कुंभमेळ्याच्या काळात कुंभदर्शन म्हणून सदर चालू करण्यात आले. त्यात कुंभमेळ्याचे महत्त्व, कुंभस्नान केल्याने होणारे पापक्षालन इत्यादी माहिती देण्यात आली. कुंभमेळ्याच्या प्रत्येक दिवशी साधू-संतांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनांना भेट देऊन आपल्याला दिलेले आशीर्वाद, त्यांचे अभिप्राय इत्यादी वाचायला मिळाले. सर्वांना हिंदु राष्ट्र व्हावे, असे वाटत आहे आणि त्या दृष्टीने मी काय प्रयत्न करणार, याविषयी ते सर्व जण सांगत आहेत. समाजाला हिंदु राष्ट्राचे महत्त्व समजायला लागले आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही. भोंदू साधू-संत शासनाला कसे फसवत आहेत, पैसे गोळा करण्यासाठी दर्शन सोहळे, अन्नदान इत्यादी चालवले जात आहे, यांसारखी एक ना अनेक उदाहरणे दैनिकाच्या माध्यमातून वाचायला मिळाली. कुंभदर्शन सदर म्हणजे घरबसल्या आंखों देखा हाल पहावयास मिळाला.

६. साधक परिपूर्ण सेवा कशी करतात, ते दैनिकातील लेखांतून शिकायला मिळणे

समष्टी सेवा करतांना साधकांना सेवेचा ध्यास लागलेला असतो. त्या दृष्टीने ते परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न कसे करत असतात ?, याविषयी दैनिक सनातन प्रभातमधून शिकायला मिळते. ग्रंथप्रदर्शनावर आलेल्याला त्या ग्रंथाचे महत्त्व थोडक्यात कसे सांगावे, सात्त्विक उत्पादने आणि आध्यात्मिक उपाय करण्याचे महत्त्व इत्यादी कसे सांगावे, ते शिकायला मिळते.

७. जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो, याचा प्रत्यय देणारे दैनिक सनातन प्रभात !

दैनिक सनातन प्रभात केवळ हातात घेतला, तरी सात्त्विकता जाणवते आणि आध्यात्मिक उपाय होतात. इतक्या चैतन्याने भारित असलेल्या दैनिक सनातन प्रभातची अनुभूती ज्याने-त्याने घ्यायची आहे. अशा प्रकारचे दैनिक आपल्याला अन्यत्र कुठेही मिळणार नाही. त्याचे मूळ कारण या दैनिकाला संतांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. दैनिक सनातन प्रभात धर्मप्रसाराचे कार्य आजन्म करत आहे. धर्मो रक्षति रक्षितः । (मनुस्मृति, अध्याय ८, श्‍लोक १५) म्हणजे धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्हणजेच ईश्‍वर रक्षण करतो, याचा प्रत्यय दैनिक सनातन प्रभातद्वारे येतो.

हिंदु धर्माचे विडंबन कसे होते, ते दैनिक सनातन प्रभातमधून स्पष्ट केले जाते. यातून विडंबन म्हणजे काय, ते आपल्याला शिकायला मिळते. दैनिक सनातन प्रभात धर्मरक्षणाचे कार्य करत आहे. अन्यायाच्या विरोधात लढणे, भ्रष्टाचार शोधून काढणे आणि त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा घेणे, म्हणजे शिक्षा होईपर्यंत कसे लढावे, ते सनातन प्रभात शिकवते.

८. प्रार्थना

हे श्रीकृष्णा, सर्वांना दैनिक सनातन प्रभात वाचण्याची बुद्धी होऊ दे. सर्वांमध्ये शिकण्याची वृत्ती वाढू दे. तूच सर्व साधकांचे बोट धरून मोक्षाला नेणारच आहेस. साधकांना ध्येयाची जाणीव होऊ दे. तुला अपेक्षित अशी सेवा आणि साधना करून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

– (पू.) पद्माकर होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF