शंभरी : हत्याकांडाची आणि स्वाभिमानशून्यतेची !

संपादकीय

शरिरावर झालेली जखम एकवेळ विसरता येते; पण मनावर झालेली जखम कधी विसरता येत नाही. ब्रिटिशांंच्या काळ्या राजवटीतील जनरल रेजिनाल्ड डायर नावाच्या राक्षसाने पंजाबमधील अमृतसरमध्ये १३ एप्रिल १९१९ या दिवशी शेकडो निष्पाप नागरिकांचे घडवून आणलेले ‘जालियनवाला बाग हत्याकांड’, ही अशीच भारतियांच्या मनावर झालेली कायमस्वरूपी जखम आहे. ती कधीही विसरता येणार नाही. जालियनवाला बागेत जमलेला जमाव काही खुनी कृत्य करण्यासाठी, दंगल घडवण्यासाठी एकत्र आला नव्हता, तर स्वातंत्र्याचा उद्घोष करण्यासाठी तो जमला होता. तो निःशस्त्र होता. या जमावात लहान मुले आणि महिलाही होत्या. अशांना ठार मारण्याचा आदेश जनरल डायर याने दिला. या भारतियांचा गुन्हा काय होता ? २ राष्ट्रीय नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ हा जमाव बागेत जमला होता. मुख्य म्हणजे या दिवशी बैसाखी म्हणजे शिखांचा उत्सव होता; मात्र भारतियांच्या राष्ट्रवादी भावनेला धुमारे फुटू द्यायचे नाहीत, या भावनेने पछाडलेल्या ब्रिटिशांना याचे भान नव्हते. त्यांनी राष्ट्रवादाचे दमन करण्यासाठी हत्याकांडाचा मार्ग अवलंबला. या हत्याकांडात १ सहस्र ६०० लोक ठार झाले, अशी भारताकडे नोंद आहे, तर स्वतःचे कुकृत्य लपवण्यासाठी ब्रिटिश दप्तरात केवळ ‘३७९ ठार झाले’, असे सांगण्यात आले. या हत्याकांडासाठी क्रूरकर्मा ब्रिटिशांंचा जगभरातून निषेध करण्यात आला. या नृशंस हत्याकांडाला १३ एप्रिल २०१९ या दिवशी बरोबर १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त अंगाचा थरकाप उडवणार्‍या या घटनेतील क्षण प्रत्येक भारतियाच्या दृष्टीसमोरून गेले नसतील, तरच नवल. हे हत्याकांड ब्रिटिशांंच्या जुलमी राजवटीचे कायमस्वरूपी स्मारक बनले आहे. ब्रिटीश राजकारणी प्रत्येक वर्षाच्या १३ एप्रिलला या घटनेविषयी तोंडदेखला खेद व्यक्त करतात. होय, केवळ खेदच व्यक्त करतात, चुकूनही क्षमा मागत नाहीत. खरे तर जगाला सहिष्णुतेचे डोस पाजणार्‍या ब्रिटीश संसदेने स्वतःच्या या हिंसाचारी कृत्याविषयी क्षमा मागायला हवी; पण आज १०० वर्षांनंतरही त्यांचा ‘साहेबी अहंकार’ त्याआड येत आहे. ‘ब्रिटीश संसदेने या हत्याकांडाविषयी क्षमा मागावी’, असा अधिकृत ठराव पंजाब विधानसभेत नुकताच एकमताने संमत करण्यात आला. स्वतःच्या चुकीचा जर खरोखरच पश्‍चात्ताप झाला असेल, तर क्षमा मागण्यात कमीपणा नसतो, उलट तो व्यक्तीचा मोठेपणा ठरतो; पण ब्रिटीश सरकाराचा असा मोठेपणा त्यांच्या अहंकाराच्या उंचीसमोर थिटा पडला आहे. ७१ वर्षांपूर्वी भारत स्वतंत्र झाला; मात्र जालियनवाला बाग हत्याकांडाच्या रूपाने भारतियांच्या मनातील ही जखम कायमच भळभळत राहील. ही जखम भरून येण्यासाठी ब्रिटिशांचा हा ‘साहेबी अहंकार’ उतरवणे आवश्यक आहे.

भारतीय सरकारांची स्वाभिमानशून्यता !

ब्रिटीश सरकारच्या क्षमा न मागण्याच्या या उन्मत्तपणाचा आतापर्यंतच्या एकाही भारतीय सरकारने साधा निषेधही केला नाही अथवा त्यांना क्षमा मागण्यास भागही पाडले नाही, हे विशेष. खरे तर आपल्या सर्वपक्षीय सरकारांमध्ये थोडी जरी स्वाभिमान नावाची गोष्ट शिल्लक असली असती, तर त्यांनी ब्रिटिशांंशी सर्व व्यवहार तोडले असते; पण या हत्याकांडाविषयी जेथे आपल्याच सरकारांना काही वाटत नाही, तेथे ब्रिटिशांंना ते वाटावे आणि त्यांनी क्षमा मागावी, असे कधी तरी घडू शकेल का ? ब्रिटिशांंकडे माफीची मागणी करणे सोडूनच द्या; पण ब्रिटिशांंची संतापजनक वकिली तत्कालीन काँग्रेसी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी केली होती. १४ ऑक्टोबर १९९७ या दिवशी ब्रिटीश साम्राज्याच्या सर्वेसर्वा राणी एलिझाबेथ दुसरी यांनी जालियनवाला बागेला भेट देऊन मृतांना केवळ शाब्दिक श्रद्धांजली वाहिली. यावर समस्त भारतियांनी टीकेची झोड उठवत त्यांना क्षमा मागण्यास सांगितले. तेव्हा स्वाभिमानशून्य गुजराल महाशय राणीसाहेबांच्या साहाय्याला धावून गेले आणि त्यांनी ‘जालियनवाला बाग हत्याकांड घडले, तेव्हा राणी एलिझाबेथ यांचा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी क्षमा मागण्याचा प्रश्‍नच येत नाही’, अशा शब्दांत राणीची वकिली केली. म्हणजे जी भूमिका राणी एलिझाबेथ यांच्या चमच्यांनी पार पाडायला हवी होती, ती भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनी पार पाडली ! यातील दुर्दैवी योगायोग असा की, हे गुजराल महाशय पंजाबचेच रहिवासी होते ! ब्रिटिश गेले; मात्र त्यांची हुजरेगिरी करणारे भारतीय पंतप्रधानपदी आरूढ व्हावेत, यासारखी दुर्दैवाची गोष्ट ती कोणती ? एलिझाबेथ यांच्याप्रमाणे ब्रिटीश पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि डेव्हिड कॅमरन यांनीही जालियनवाला बागेला भेट देऊन दुःख व्यक्त केले अन् हत्येचा निषेध केला; पण क्षमा मात्र मागितली नाही ! विशेष म्हणजे त्या त्या वेळच्या एकाही भारतीय पंतप्रधानाने त्यांना क्षमा मागण्यास भाग पाडले नाही. स्वाभिमानशून्यतेची परंपरा तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी कायम राखली. विदेश दौर्‍यावर असतांना त्यांनी एकदा ‘ब्रिटिशांंमुळेच भारतात रस्ते बनले. त्यांच्यामुळेच देशाचा विकास झाला’, अशा आशयाची मुक्ताफळे उधळली होती. ब्रिटिशांंच्या विरोधातील लढ्यात देशाचा स्वाभिमान अबाधित राखण्यासाठी ज्या क्रांतीकारकांनी स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्नीकुंडात स्वतःच्या आहुत्या दिल्या, त्याच क्रांतीकारकांच्या देशातील राज्यकर्ते ब्रिटिशांंपुढे स्वाभिमान गहाण टाकत आहेत. काय वाटले असेल त्या क्रांतीकारकांच्या आत्म्यांना ? म्हणूनच जालियनवाला बागेच्या हत्याकांडाचीच जशी ही शंभरी आहे, तशीच ती ब्रिटिशांंच्या उन्मत्तपणाची आणि भारतीय राज्यकर्त्यांच्या स्वाभिमानशून्यतेचीही शंभरी आहे. हे चित्र देशाला निश्‍चितच भूषणावह नाही. ही परिस्थिती पालटण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वाभिमान असलेल्या राज्यकर्त्यांच्या हाती देश सोपवणे, हाच एकमेव उपाय आहे. असे राज्यकर्ते लोकशाही नव्हे, तर केवळ ईश्‍वरी राज्यातच मिळू शकतात, हेच सत्य आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now