रुग्णावर उपचार करतांना त्या उपचारांविषयी अर्धवट माहिती देऊन रुग्णांची आर्थिक आणि शारीरिक हानी करणारे आधुनिक वैद्य !

१. गुडघेदुखीवर उपचार घेण्यासाठी आधुनिक वैद्यांंनी तपासणी करणे, ती पूर्ववत होण्यासाठी ‘प्लेटलेट प्लाझ्मा थेरपी’ करणे आवश्यक असल्याचे सांगणे, उपचारांचा खर्चविचारल्यावर सांगण्यास टाळाटाळ करणे

श्रीमती गीता प्रभु

‘मी गुडघेदुखीवर उपचार घेण्यासाठी मुंबईला गेले होते. तेथील आधुनिक वैद्यांंनी माझ्या गुडघ्याची क्ष-किरण (एक्स-रे) तपासणी केली. तपासणीच्या अहवालानुसार माझी हाडे झिजलेली असून ती पूर्ववत होण्यासाठी ‘प्लेटलेट प्लाझ्मा थेरपी’ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी मला सांगितले.

(या उपचारांमध्ये रुग्णाचे रक्त काढून त्यातील प्लाझ्मा आणि रक्तपेशी वेगळ्या करून त्या रुग्णाच्या अवयवामध्ये इंजेक्शनद्वारे टोचल्या जातात.) त्या वेळी मी आधुनिक वैद्यांना त्या उपचारांचा खर्च विचारला, तेव्हा ‘मी तुमच्या मुलाशी बोलीन’, असे ते म्हणाले. त्याच वेळी त्यांनी माझा वैद्यकीय विमा असल्याचीही निश्‍चिती केली.

२. अन्य आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी हे उपचार सर्वांना लागू पडत नसल्याचे सांगणे आणि त्यांनी केलेल्या उपचारांमुळे २ दिवसांतच ७५ टक्के बरे वाटणे

गोवा येथे परत आल्यावर मी येथील आश्रमातील आधुनिक वैद्यांना माझे वैद्यकीय अहवाल दाखवले आणि ‘ते उपचार गोव्यात करता येतील का ?’, असे विचारले. ते उपचार गोव्यात होत नसल्यामुळे मुंबईत जाऊन उपचार घेण्याविषयी निर्णय झाला. मी मुंबईला गेल्यावर माझ्या भावाला दूरभाष करून या उपचारांविषयी सांगितले. माझा भाऊ मला दुसर्‍या अस्थिरोग तज्ञांकडे तपासण्यासाठी घेऊन गेला. माझे अहवाल पाहिल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘त्या उपचारांसाठी १ लक्ष ३० सहस्र रुपये खर्च असून सर्वांनाच हे उपचार लागू पडत नाहीत. ते लागू पडले नाहीत, तर पैसे वाया जातात, तसेच ‘या उपचारांचा परिणाम होईल’, याची निश्‍चितीही देता येत नाही.’’ त्यांनी मला तीन प्रकारच्या गोळ्या आणि व्यायामाचे काही प्रकार सांगितले. त्या औषधोपचारांनी २ दिवसांतच मला ७५ टक्के बरे वाटले.’

‘गुरुकृपेने मला योग्य उपचार मिळाले, त्यासाठी त्यांच्या कोमल आणि पवित्र चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१.२०१९)

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !

आरोग्य साहाय्य समिती

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा. चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती !

पैसे लुबाडणार्‍या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया आम्हाला साहाय्य करा. ही तुमची साधनाच असेल. तुम्हाला तुमचे नाव गोपनीय ठेवण्याची इच्छा असल्यास ते गोपनीय ठेवण्यात येईल.

आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]


Multi Language |Offline reading | PDF