सनातन प्रभातच्या बोधचित्रकर्त्या साधिका सौ. गौरी वैभव आफळे यांनी ५ सहस्र बोधचित्रे पूर्ण होण्याच्या साधनाप्रवासात गुरुदेवांनी पदोपदी साहाय्य केल्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता !

परात्पर गुरुदेव,

आपल्या चरणी शि.सा. नमस्कार आणि अनंत कोटी कृतज्ञता !

‘परात्पर गुरुदेव, आपण या अज्ञानी लेकराकडून ५ सहस्र बोधचित्रांची सेवा करवून घेतली आहे. आपण माझ्यावर केलेल्या या कृपेसाठी मी कशी कृतज्ञता व्यक्त करू ? त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

आपण मला ही सेवा सौ. आरती पुराणिक यांच्या माध्यमातून शिकवली आणि ९.५.२००४ या दिवशी माझ्याकडून पहिले बोधचित्र करवून घेतले. तेव्हापासून कलेचा हा प्रवास आपल्या चरणी चालू झाला, तो आपणच आजपर्यंत अविरत करवून घेत आहात. (परात्पर गुरुदेवच सेवा करवून घेतात, असा साधिकेचा भाव आहे. – संकलक)

परात्पर गुरुदेव, शब्दातीत कृतज्ञता शब्दांतून व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न !

मम चित्तीचे तव चरणी ।

१. या पृथ्वीवर असणार्‍या अब्जावधी जिवांमधून आपण मला या सेवेसाठी पात्र ठरवले आणि ती सेवा या जिवाकडून करवून घेत आहात; म्हणून कृतज्ञता !

२. माझी फार काही साधना नसतांना तुम्ही ही सेवा करवून घेत आहात; म्हणून कृतज्ञता !

३. माझ्याकडून जी तोडकी-मोडकी सेवा होते; ती स्वीकारत आहात; म्हणून कृतज्ञता !

४. अधर्माविषयी असणारी चीड व्यक्त करण्यासाठी माध्यम उपलब्ध करून दिलेत; म्हणून कृतज्ञता !

५. मी हताश झाले, तेव्हा ‘बोधचित्र आवडले’ या पहिल्याच निरोपाने मला उत्साही केलेत; म्हणून कृतज्ञता !

६. प्रथमच नकारात्मक विचारांनी रडले, तेव्हा हातात खाऊ (तीळ-गुळाची पापडी) देऊन ‘तुमचे लक्ष माझ्याकडे आहे’, हे दाखवून दिले; म्हणून कृतज्ञता !

७. परत ‘नोकरी करावी’, असे वाटल्यावर प्रसादातील ‘तीळ जसे गुळाला चिकटून आहेत, तशी साधनेला चिकटून रहा’, असा आपणच अंतरातून संदेश दिला; म्हणून कृतज्ञता !

८. ‘मला बोधचित्र नीट जमत नाहीत’, असे मी सांगणार, तेवढ्यात माझ्या मनीचे ओळखून आधीच ‘आता पातळी वाढल्यावर छान होतात ना बोधचित्रे !’ असे म्हणून मला सकारात्मक केलेत; म्हणून कृतज्ञता !

९. मनात खंत होती, तेव्हा ‘हाच तुमचा ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग आहे’, असा आशीर्वाद देऊन कृतकृत्य केले; म्हणून कृतज्ञता !

१०. कितीतरी दिवस प्रतिदिनच खाऊ देऊन चैतन्य दिले; म्हणून कृतज्ञता !

११. एकदा तर ‘फार फार आवडले, भरपूर खाऊ देणे’, असे सांगून ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग ।’, असा आनंद अनुभवायला दिला; म्हणून कृतज्ञता !

१२. सेवेतच गुंतले, तेव्हा साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाण्याविषयी सांगितले; म्हणून कृतज्ञता !

१३. सहसाधकांचे प्रोत्साहन आणि साहाय्य मिळवून दिले; म्हणून कृतज्ञता !

१४. विषयांचा अभ्यास नसतांना तो करायला शिकवला; म्हणून कृतज्ञता !

१५. अपूर्णतेतून परिपूर्णतेकडे जाण्यासाठी अंतर्यामी प्रेरणा देत आहात; म्हणून कृतज्ञता !

१६. कितीही संकटे-अडथळे आले, तरीही सेवेत खंड पडू दिला नाही; म्हणून कृतज्ञता !

१७. रुग्णालयात भरती असतांनाही बोधचित्र करण्याची शक्ती दिली; म्हणून कृतज्ञता !

१८. प्रवासात असतांनाही विचार सुचवून निराळाच आत्मविश्‍वास दिला; म्हणून कृतज्ञता !

१९. ‘आता कुठेही बोधचित्र करता येते ना ?’, असे विचारून तशी क्षमता दिली; म्हणून कृतज्ञता !

२०. अडीच सहस्र बोधचित्रे झाल्यावर ‘खाऊ स्थुलातून हवा कि सूक्ष्मातून ?’, असे विचारून सूक्ष्मातून खाऊ घेण्याची सवय लावली; म्हणून कृतज्ञता !

२१. या सेवेच्या माध्यमातून माझी साधना करवून घेत आहात; म्हणून कृतज्ञता !

२२. भावनेतून भावाकडे आणि बहिर्मुखतेतून अंतर्मुखतेकडे नेत आहात; म्हणून कृतज्ञता !

२३. ‘साधना चांगली झाली की, सेवा चांगलीच होते’, हे शिकवले; म्हणून कृतज्ञता !

२४. सुखाकडून आनंदाकडे नेत आहात; म्हणून कृतज्ञता !

२५. आनंदातून शांततेकडेही नेत आहात; म्हणून कृतज्ञता !

परात्पर गुरुदेव, कृतज्ञता, अनंत कोटी कृतज्ञता !

परात्पर गुरुदेव, तुम्ही पदोपदी, क्षणोक्षणी आणि श्‍वासोच्छ्वासी मला तळहातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळत आहात. यासाठी मी आपली फार फार कृतज्ञ आहे.

क्षमायाचना आणि प्रार्थना

‘परात्पर गुरुदेव, आज मी आपल्या चरणी क्षमा मागत आहे. मी आपली फार अपराधी आहे; कारण आपल्याला अपेक्षित अशा वेगाने मी साधना करू शकत नाही. माझे प्रयत्न होत नाहीत. मला क्षमा करा. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी खारीचा वाटा उचलण्यासाठी तरी मला पात्र करावे’, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना करते.’

– सौ. गौरी वैभव आफळे, ढवळी, फोंडा, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF