राममंदिरासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘श्रीराम नाम अभियाना’ला अभूतपूर्व प्रतिसाद !

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये याचे अनेक पुरावे आहेत. विविध पौराणिक स्थळे याचे साक्षीदार आहेत. न्यायालयात पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे हे पुन्हा सिद्ध झाले आणि वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी ‘श्रीरामजन्मभूमी ही श्रीरामाचीच आहे’, असे शिक्कामोर्तबही केले. असे असतांनाही गेली आठ वर्षे आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीने देशभरातील हिंदु भाविकांना राममंदिर उभारणीत येत असलेले विविध अडथळे दूर होण्यासाठी श्रीरामालाच साकडे घालण्याचे आवाहन केले. या आवाहनाला देशभरातील श्रीरामभक्तांनी प्रतिसाद दिला. यात प्रामुख्याने दिंड्या, सामूहिक रामनामजप, निवेदन, आंदोलन, स्वाक्षरी मोहीम यांद्वारे सहस्रावधी श्रीराम भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राममंदिरासाठी अध्यादेश काढण्याची जोरकस मागणी केली.

श्रीरामाचे चित्र घेऊन आणि श्रीरामाचे स्मरण करत दुमदुमल्या नामदिंड्या !

कोल्हापूर, पनवेल, नालासोपारा, कल्याण आणि बीड अशा पाच शहरांमध्ये श्रीरामाचे चित्र घेऊन दिंड्या काढण्यात आल्या. दिंड्यांमध्ये श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात येत होता. विविध मार्गांवरून जाऊन समारोपप्रसंगी सहभागी हिंदुत्वनिष्ठ, श्रीरामभक्त यांनी मनोगत व्यक्त केले. दिंडीद्वारे नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. अनेक ठिकाणी दिंडीमध्ये संत उपस्थित होते. नामजपामुळे लोक परत एकदा नामजप करण्यास प्रवृत्त झालेच, तसेच वातावरणही सात्त्विक झाले.

राममंदिर उभारणीचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने केलेल्या आवाहनाला देशभरातील ६ राज्यांमधील १० सहस्रांहून अधिक धर्मनिष्ठ आणि रामभक्त यांचा अभूतपूर्व प्रतिसाद !

  • उत्तरप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तमिळनाडू या ६ राज्यांमध्ये हे अभियान राबवण्यात आले.
  • १० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदू, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांनी उत्साहाने अभियानामध्ये भाग घेतला.
  • २५० ठिकाणी सामूहिक नामजपाचे कार्यक्रम घेण्यात आले.
  • १० ठिकाणी आंदोलन आदी प्रकारे अभियान राबवण्यात आले.
  • एकूण ६ राज्यांमध्ये मिळून २६५ ठिकाणी अभियान राबवले गेले.
  • ५ ठिकाणी दिंड्यांचे आयोजन करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF