हिंदूंचा विश्‍वासघात !

संपादकीय

निवडणुकांची रणधुमाळी सध्या चालू आहे. प्रत्येकच उमेदवार मतांच्या लालसेपोटी जनताजनार्दनाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मतांच्या लालसेपोटी या काळात अनेक आश्‍वासनांची खैरात झाली, पुष्कळ आमीषेही दाखवली गेली. आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवून जनता मत देईलही; पण वर्ष २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी दिलेल्या कित्येक आश्‍वासनांपैकी ‘आम्ही सत्तेवर आल्यास राममंदिर उभारू !’ या आश्‍वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्याचे काय ? हे आश्‍वासन देऊन भाजप सरकारने थेट हिंदूंच्या श्रद्धेला हात घातला आणि भोळ्याभाबड्या हिंदूंनीही याच सूत्रावरून भाजप सरकारला सत्तेवर बसवले. ‘बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर अर्थातच तेथे राममंदिराची उभारणी व्हायला हवी’, ही सुप्त इच्छा प्रत्येक हिंदू बाळगून होता; मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता वर्ष २०१९ ची निवडणूक आली, तरीही राममंदिर उभारले न जाणे म्हणजे सरकारने हिंदूंच्या धर्मभावनांशी चालवलेला निष्ठूर खेळच आहे. सरकार हिंदूंना असे किती काळ झुलवत ठेवणार आहे ? सरकारने हिंदूंचा केलेला हा विश्‍वासघातच आहे. सरकार प्रत्येक वेळी हिंदूंना गृहित धरते. याचे दुष्परिणाम भोगावे लागतात ते मात्र हिंदूंना ! सरकारच्या तत्कालीन घोषणापत्रात राममंदिराच्या जोडीला विकासाचेही सूत्र समाविष्ट होते. मोदी सरकारच्या काळात विकास पुष्कळ प्रमाणात साधला गेला. ‘मेक इन इंडिया’, ‘स्वच्छ भारत अभियान’ असे अनेक प्रयत्न सरकारने केलेही. जनतेला अनेक सोयीसुविधांचा लाभ झाला. त्याविषयी जराही दुमत नाही; पण केवळ एकांगी विकासाचा काय उपयोग ? त्यामुळे पारडे जड झाले ते केवळ विकासाचेच ! राममंदिराच्या पारड्यात पडत होते ते केवळ न्यायालयीन सुनावणीचे दिनांक आणि दिनांकच ! येथे लक्षात घेण्याचे महत्त्वपूर्ण सूत्र म्हणजे राष्ट्रासाठी विकास आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. केवळ विकास करून राष्ट्रोद्धार होत नसतो. राष्ट्रजनांमध्ये धर्माची शिकवण जोपासून, त्यांच्या धर्मभावनांची जपणूक करून केलेला राज्यकारभारच यशस्वी होतो. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचे हेच महत्त्व आहे. सरकारने हे लक्षात घेतले असते, तर खर्‍या अर्थाने राष्ट्राचा उत्कर्ष साध्य झाला असता आणि आपल्या मताचे मूल्य लक्षात घेणार्‍या सरकारच्या पाठीशी हिंदू आणखी ठामपणे उभा राहिला असता.

धार्मिक प्रश्‍नाचा न्यायनिवाडा का ?

आतापर्यंत एखाद्या समाजाच्या धार्मिक भावनेचे सूत्र २९ वर्षे रेंगाळत ठेवले जाण्याचे उदाहरण कधीतरी ऐकले आहे का ? मग केवळ हिंदूंवरच, रामभक्तांवरच ही नामुष्की ओढवण्याची वेळ का यावी ? आणखी किती वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्ट रहाणार आहे ? खरे पहाता राममंदिर हा जर हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेचा प्रश्‍न आहे, तर त्याच्या न्यायनिवाड्याची आवश्यकताच काय ? शाहबानो प्रकरणाच्या वेळी सर्वोच्च न्यायालयात निवाडा असतांनाही तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घटनादुरुस्ती करून शरीयत कायद्याला मान्यता दिली होती. तेव्हा श्रद्धा जिंकली, मग रामभक्तांच्या श्रद्धेला मूल्य का नाही ? हिंदुबहुल देशात हिंदूंच्या मंदिरासाठी हिंदूंना वर्षानुवर्षे ताटकळत रहावे लागणे, हे संतापजनकच आहे. एकीकडे हिंदूंची मंदिरे लुटली जात आहेत. चोरट्यांची दृष्टीही मंदिरात अर्पण केले जाणारे धन, मूर्तींवरील दागिने यांवर असते. मंदिरांचे रक्षण करणे आणि मंदिरे उभारणे हे खरेतर राजकर्तव्य आहे; पण दुर्दैवाने तसे होतांना दिसत नाही. मंदिरांच्या रक्षणासाठी भक्तांनाचा पहारा द्यावा लागतो आणि मंदिरांच्या उभारणीसाठीही त्यांनाच न्यायालयात खेटे मारावे लागतात. हा कुठला न्याय ? ‘३८० खासदार आल्यावर राममंदिर उभे करू’, असे भाजपच्या अध्यक्षांनी सांगितले होते, तेव्हा संसदेत भाजपचे २ खासदार होते. सद्यस्थितीला २८० खासदार भाजपकडे आहेत. त्यांच्या जोरावर तरी आता सरकारने राममंदिरासाठी पावले उचलावीत, ही अपेक्षा आहे.

राममंदिरासाठी अयोध्येत जमलेल्या सहस्रावधी कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला आणि त्यांची प्रेते तेथील शरयू नदीत फेकून देण्यात आली. त्यांनी आपले रक्त सांडले ते केवळ श्रीरामासाठी ! त्यामुळे त्यांचे हे बलीदान विसरून चालणार नाही. राममंदिराच्या प्रश्‍नाकडे होणारे दुर्लक्ष म्हणजे बलीदान देणार्‍यांचा एकप्रकारे अपमानच आहे. तसे कदापी होता कामा नये ! सरकारने या बलीदानाचे स्मरण ठेवून राममंदिराच्या उभारणीसाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे.

अतूट भक्ती अन् व्यापक संघटन हवे !

‘तीर्थक्षेत्रांची मुक्तता’ हे स्वातंत्र्यलढ्याचे एक उद्दिष्ट आहे’, असे उद्गार होते छत्रपती शिवरायांचे ! त्यासाठी त्यांनी प्राणपणाने प्रयत्नही केले. त्यांच्याप्रमाणे अनेक साधूसंतांनीही राममंदिराच्या लढ्याचे नेतृत्व केले. अनेक पिढ्यांनी त्यासाठी लढा दिला. हिंदुबहुल देशात हिंदूंनाच त्यांच्या श्रद्धास्थानाच्या उभारणीसाठी लढा द्यावा लागणे हे अनाकलनीय आहे.  हिंदूंच्या रक्तात श्रीराम आहे आणि रामायणही आहे. आयुष्याच्या सुख-दुःखाच्या वाटचालीत अनेकदा भक्तांना मार्ग दाखवतो तो श्रीरामच ! भारतातील हिंदूंची नाळ ही श्रीरामाशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे तिच्यातून मिळणारी धर्मप्रेरणा रामभक्तांसाठी पर्यायाने हिंदूंसाठी स्फुरणदायिनी ठरेल. सध्याची स्थिती पहाता राममंदिराच्या उभारण्यासाठी कोणत्याही पक्षावर अवलबूंन रहाणे योग्य नाही. राममंदिर एक ना एक दिवस उभे रहाणारच आहे; पण आवश्यकता आहे ती हिंदूंच्या व्यापक

संघटनाची ! हे व्यापक संघटनच राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदूंना बळ देईल. रामाप्रतीच्या अतूट भक्तीच्या सामर्थ्यानेही राममंदिराचे पुनर्निर्माण साध्य होऊ शकते. त्यामुळे आता हिंदूंनीच आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कृतीशील पुढाकार घ्यावा. प्रत्येक हिंदु कुटुंबाने आपापल्या परीने या प्रभुकार्यात सहभागी व्हायला हवे !

हिंदु राष्ट्रात रामभक्तीच्या जोडीला हिंदूंच्या बलशाली संघटनातून साकार झालेले हे भव्य श्रीराममंदिर निश्‍चितच अजरामरच ठरेल !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now