पाक सरकार तेथील ४०० मंदिरे हिंदूंच्या स्वाधीन करणार !

  • एकीकडे पाक सरकार हिंदूंची मंदिरे त्यांच्या स्वाधीन करत आहे, तर भारतात मात्र सर्वपक्षीय शासनकर्ते मंदिरे कह्यात घेत आहेत !
  • आम्ही अल्पसंख्यांक हिंदूंसाठी काही तरी करत आहोत, हे दाखवण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत आहे !
  • पाकला हिंदूंसाठी खरेच काही करायचे असेल, तर त्याने प्रथम हिंंदूंना सुरक्षा देऊन आतापर्यंत ज्या हिंदूंचे धर्मांतर झाले आहे, त्यांना त्यांच्या मूळ धर्मांत आणण्याचा प्रयत्न करावा, तसेच हिंदूंचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा करावी !

इस्लामाबाद – पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदूंच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत तेथील सुमारे ४०० हिंदु मंदिरे हिंदूंच्या स्वाधीन करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.

१. एका सर्वेक्षणानुसार भारताची फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तानमध्ये ४२८ मंदिरे अस्तित्वात होती. फाळणीनंतर मुसलमानांनी त्यातील ४०८ मंदिरांच्या जागा बळकावून तेथे दुकाने, शासकीय कार्यालये, मदरसे थाटले. परिणामी अनेक मंदिरांना टाळे लागले.

२. आता पाक सरकारने ४०० मंदिरांच्या जागा कह्यात घेऊन आणि त्या मंदिरांची डागडुजी करून ती पाकिस्तानचे नागरिक असलेल्या हिंदूंच्या टप्प्याटप्प्याने कह्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.

३. याचा प्रारंभ सियालकोट आणि पेशावर येथील ऐतिहासिक मंदिरांपासून होणार आहे. सियालकोट येथील श्री जगन्नाथ मंदिर, तसेच १ सहस्र वर्षे प्राचीन असलेले शिवालय यांचे नूतनीकरण सरकार करून देणार आहे. वर्ष १९९२ मध्ये भारतातील बाबरी मशिदीच्या पतनानंतर हे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले होते. ‘पेशावर येथील श्री गोरखनाथ मंदिर पूर्ववत् करून त्याला ‘जागतिक वारसा’, हा दर्जा देण्यात यावा’, असा निर्णय तेथील न्यायालयाने घेतला आहे.

४. अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी २ – ३ ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्याचे सरकारने ठरवले आहे. शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र कर्तारपूर येथे भक्तांना मुक्त प्रवेश मिळावा, यासाठीही पाक सरकार प्रयत्नशील आहे.


Multi Language |Offline reading | PDF