उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची सिंहगड रस्ता, पुणे येथील चि. सिंहयानी अमोल मुस्तारे (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. सिंहयानी अमोल मुस्तारे ही एक आहे !

चि. सिंहयानी मुस्तारे

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’   – (परात्पर गुरु) डॉ. आठवले     

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.    

(चि. सिंहयानी अमोल मुस्तारे हिची तिच्या आजीला आणि एका साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.)

१. गर्भारपण

१ अ. गर्भारपणात सिंहयानीच्या आईने केलेली साधना : ‘सिंहयानीच्या आईला गरोदरपणी काहीही त्रास झाला नाही. तिने गरोदरपणी नामजप करणे, श्रीसूक्त, हनुमानकवच इत्यादी स्तोत्रे म्हणणे, गुरुचरित्राचा १४ वा अध्याय वाचणे, असे प्रयत्न केले. ती संपूर्ण ९ मास प्रवास करत होती, तरीही बाळाला काही त्रास झाला नाही.

२. जन्म ते १ वर्ष

२ अ. नवचंडी यागाच्या दिवशी जन्म झाल्याने बाळाचे नाव ‘सिंहयानी’ असे ठेवणे : आमच्या घरी नवचंडीचा यज्ञ चालू होता. तीन दिवस पठण झाल्यानंतर चौथ्या दिवशी नवचंडी याग होणार होता. यागाच्या दिवशीच सिंहयानीचा जन्म झाल्यामुळे ‘श्री दुर्गादेवीच्या कृपेमुळेच तिचा जन्म झाला’, असे आम्हाला वाटले. सप्तशतीमध्ये देवीचे ‘सिंहयानी’ असेही एक नाव आहे. त्यामुळे बाळाचे नाव ‘सिंहयानी’ असे ठेवले.

२ आ. चि. सिंहयानीने स्तोत्रपठण, दुर्गासप्तशती पाठ इत्यादी शांतपणे ऐकणे : सिंहयानीचा जन्म झाल्यानंतर तिला रुग्णालयातून घरी आणल्यापासून घरामध्ये सातत्याने शिवतांडव, कालभैरव स्तोत्र, दुर्गासप्तशती पाठ प्रतिदिन लावले जाते. ती हे सर्व शांतपणे ऐकते.

२ इ. सिंहयानीच्या कानात ‘ॐ’चा उच्चार केल्यावर रडणे थांबणे : तिचा जन्म झाल्यानंतर तिच्या कानात ‘ॐ’चा उच्चार केला होता. त्यामुळे ती रडत असतांना तिच्या बाबांनी तिच्या कानात ‘ॐ’चा उच्चार केल्यावर ती लगेच शांत व्हायची.

२ ई. अंघोळ करतांना प्रार्थना करणे : सिंहयानीला अंघोळ घालतांना ती कधीही रडत नाही. ती आनंदाने अंघोळ करते. तेव्हा सप्त नद्या आणि पंच पतिव्रता (अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी) यांना प्रार्थना केल्यावर तीसुद्धा हात जोडून हसत प्रार्थना करते.

२ उ. हसतमुख आणि आनंदी

१. सिंहयानी नेहमी हसतमुख आणि आनंदी वाटते. तिला पाहिल्यावर पुष्कळ समाधान आणि उत्साह वाटतो.’ – श्रीमती मंगला अरुण मुस्तारे (सिंहयानीची आजी), सिंहगड रस्ता, पुणे.

२. ‘सिंहयानीकडे पाहून पुष्कळ आनंद होतो. ती सतत हसत असते. मुस्तारेकाकू तिला सत्संगाला किंवा इतर वेळी घेऊन येतात. तेव्हा ती सर्वांकडे रहाते. तिचे हात नेहमी नमस्काराच्या मुद्रेत असतात.’

– सौ. संगीता जागडे, साधिका, सिंहगड रस्ता, पुणे.

२ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव

१. ‘परात्पर गुरुमाऊलींच्या अमृत महोत्सवाच्या वेळी सिंहयानी ५ मासांची होती. मी तिला घेऊन कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा तिने प्रथमच परात्पर गुरुमाऊलींना पाहिले. त्या वेळी ती गुरुमाऊलींकडे भावपूर्ण आणि आनंदाने एकटक पहात होती. ती कार्यक्रम संपेपर्यंत शांत राहिली आणि मुळीच रडली नाही.

२. परात्पर गुरुदेवांच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित केलेल्या विशेषांकामधील प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वेशातील गुरुदेवांची छायाचित्रे पाहून तिला पुष्कळ आनंद झाला. ती हसत हसत त्या दैनिकाकडे झेप घेत होती. एरव्हीसुद्धा मी प्रतिदिन दैनिक वाचत असतांना ती त्याला हात लावते. तेव्हा तिला आनंद होतो.

३. ती प्रतिदिन परात्पर गुरुमाऊलींशी बोलते. ती गुरुदेवांना ‘आजोबा’ म्हणते. ‘परम पूज्य आजोबा कुठे आहेत ?’, असे म्हटल्यावर ती त्यांच्या छायाचित्राकडे पहाते आणि नमस्कार करते. ती प्रत्येक कृती करतांना परात्पर गुरुमाऊलींशी तिच्या भाषेत बोलते, उदा. ‘तुम्ही काय करता ? मी दूध पिते’, असे त्यांना सांगते.

४. सिंहयानी रडत असतांना तिला परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र दाखवल्यावर ती रडणे थांबवूून हसू लागते.

२ ए. मुद्रा करणे : ती ७ मासांची असतांना आम्ही तिला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमास नेले होते. त्या वेळी ती शांतपणे सभागृहात बसली होती. पूर्ण दिवसभर ती बोटांच्या मुद्रा करत होती. आता ती प्रतिदिन मुद्रा करते.

२ ऐ. समंजसपणा

१. ती कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नाही. तिला खेळायला खेळणीच हवीत, असे नाही. ती कोणत्याही वस्तूशी खेळते.

२. सिंहयानी कोणतीही गोष्ट लगेच स्वीकारते. मर्दन करणे, अंघोळ घालणे, काजळ घालणे, कपडे घालणे, दूध पिणे किंवा जेवण करणे, या कृती करतांना ती कधीच रडत नाही.

३. ती १ मासाची असल्यापासून कोणाजवळही रहाते. मी तिला सत्संगाला घेऊन गेल्यावर ती शांतपणे सत्संग ऐकते. ती सर्वांना हात जोडून नमस्कार करते.

४. ती तिच्या हातात असलेली कोणतीही वस्तू अथवा खेळणे मागितल्यावर लगेच देते. तिला कोणतीही कृती करण्यास सांगितल्यानंतर ती लगेच करते.

२ ओ. सात्त्विकतेची आवड : सिंहयानी प्रतिदिन माझ्या समवेत अत्तर, कापूर, उदबत्ती आणि दैनिक यांचे उपाय करते. ती प्रतिदिन संध्याकाळी देवापुढे हात जोडून ‘शुभं करोति’ म्हणते आणि तुळशीला नमस्कार करते. ती सनातनच्या आकाश कंदिलाकडे पाहून हसते. ’

– श्रीमती मंगला अरुण मुस्तारे

३. अनुभूती

‘मी जपाला बसल्यावर मला ‘माझा ५ मिनिटेच जप झाला’, असे वाटते; परंतु डोळे उघडल्यानंतर प्रत्यक्षात मी ३५ ते ४० मिनिटे जप केला असल्याचे माझ्या लक्षात येतेे. ही अनुभूती मला सिंहयानीच्या जन्मापासून अनेकदा येत आहेे.’ – श्रीमती मंगला अरुण मुस्तारे

४. दोष

‘हट्टीपणा.’ – सौ. सोनाली अमोल मुस्तारे (चि. सिंहयानीची आई), पुणे


Multi Language |Offline reading | PDF