मतदानावरील बहिष्कार !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नाने सर्वत्रची राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही अस्तित्वात आली. सर्वसामान्य जनता ‘मतदार राजा’ म्हणून वावरू लागली. जनतेने निवडून दिलेले सरकार देशावर राज्य करू लागले; मात्र भारतियांनी विश्‍ववंदनीय धर्मग्रंथ लाथाडून परकीय धोरणांवर आधारित राज्यघटना स्वीकारली. यामुळे देशात विविध भागात नवनवीन संस्थानिक जन्माला आले. हे संस्थानिक म्हणजे आजचे शासनकर्ते खरेच निरपेक्ष, निस्पृह आणि निष्ठांवत आहेत का ? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या देशात वहात आहे. तिकीट मिळवण्यासाठी नेतेमंडळी डबक्यातील बेडकांप्रमाणे या पक्षातून त्या पक्षात उड्या घेत आहेत. सामान्य जनता संभ्रमित होऊन हे सर्व पहात आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या जनतेच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू न शकणारे शासनकर्ते भारताला ‘सुपरपॉवर’ बनवण्याचे दिवास्वप्न देशवासियांना दाखवत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे उलटली; मात्र सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या रेवलकरवाडी येथील ग्रामस्थ अजूनही गावात एस्.टी. येण्याची वाट पहात आहेत.

६ वर्षांपूर्वी गावात एस्.टी. येत होती; मात्र काही कारणाने ती बंद झाली. पुन्हा अनेक वेळा पाठपुरावा करूनही ती चालू करण्यात आली नाही. नेमके काय कारण आहे, तेही कळू शकलेले नाही. पुसेगावपासून १० कि.मी. अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी १ सहस्र ५०० लोकसंख्या असलेले रेवलकरवाडी हे गाव ! गावातील ५० हून अधिक विद्यार्थी शाळेसाठी पुसेगाव ते विसापूर ये-जा करतात. गावामध्ये जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे; मात्र तेथून पुढे शिक्षणासाठी पुसेगाव गाठावे लागते; मात्र एस्.टी.ची सुविधा नसल्यानेे विद्यार्थी सायकल, मोटरसायकल आणि खासगी वाहनांवर अवलंबून आहेत. अशातच विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून शाळा शिकावी लागत आहे. काही पालकांना प्रतिदिन पुसेगावला ये-जा करणार्‍या ग्रामस्थांच्या हाता-पाया पडावे लागते. काही पालकांनी तर विद्यार्थ्यांना शाळेतून काढून शेतामध्ये जुंपले आहे. याविषयी वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडे तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या आहेत; मात्र त्यांच्याकडूनही आजपर्यंत या समस्येकडे दुर्लक्षच केले गेले. निवडणुका जवळ आल्या की, मतदारांचे उंबरे झिजवणारे शासनकर्ते आता मते मागायला गावात येतील, तेव्हा त्यांना याचा जाब विचारण्याची पूर्ण सिद्धता रेवलकरवाडी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामदैवत श्रीकाळेश्‍वरी देवीच्या मंदिरात नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सर्वच राजकारण्यांविरुद्ध लढा पुकारला आहे. जोपर्यंत गावात विद्यार्थी, महिला, आबालवृद्ध यांच्यासाठी एस्.टी. चालू होत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. आतातरी शासनकर्ते या समस्येकडे गांभीर्याने बघतील, अशी भाबडी आशा रेवलकरवाडी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा


Multi Language |Offline reading | PDF