इतरांना तत्परतेने साहाय्य करणारे आणि परात्पर गुरुदेवांवर अपार श्रद्धा असलेलेे ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रसन्न ढगे (वय ५७ वर्षे) !

‘श्री. प्रसन्न ढगे मागील २० वर्षांपासून साधना करत आहेत. सध्या ते ‘दैनिक सनातन प्रभात’चे वितरक म्हणून सेवा करतात. त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, तरीही ‘दैनिक सनातन प्रभात’प्रती असलेला भाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांवरील अढळ श्रद्धा या बळावर ते ही सेवा करतात.

१. मनमोकळेपणा : श्री. प्रसन्न ढगेकाकांंचा स्वभाव पुष्कळ मोकळा आहे. ते सहजतेने समोरच्या व्यक्तीला आपलेसे करतात. त्यांचा स्वभाव पारदर्शक असून ते ‘मनात एक आणि बाहेर एक’ असे कधीही वागत नाहीत.

२. निर्भय : काका स्वभावाने अत्यंत निडर आहेत. ‘त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा ताण आला किंवा भीती वाटली’, असे झाले नाही.

३. नियमितपणा : काका प्रतिदिन पहाटे दैनिक वितरणाची सेवा करतात. या सेवेत ते कधी खंड पडू देत नाहीत. त्यांची शरीरयष्टी पहाता ‘त्यांना अधिक चालणे किंवा फिरणे जमणार नाही’, असे वाटते; परंतु केवळ परात्पर गुरुमाऊलीवर असणार्‍या श्रद्धेेमुळे ते या स्थितीतही सेवा करत आहेत.

४. प्रेमभाव : काकांमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ते घरी येणार्‍या प्रत्येकाशी प्रेमाने वागतात. काकांचे घर हे साधकांना आपल्या हक्काचे वाटते. साधकांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवून ते त्यांना खाऊ घालतात. ‘देव आपल्याला भरभरून देतो, मग आपण साधकांना देण्यात न्यून का पडायचे ?’, असा त्यांचा भाव असतो.

५. इतरांना साहाय्य करणे : कोणत्याही अडचणीच्या क्षणी काकांकडे साहाय्य मागितले, तर काका त्वरित साहाय्यासाठी धावून येतात. त्यामुळे सर्वांना काकांचा मोठा आधार वाटतो.

६. काकांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा आहे.’

– (पू.) सौ. संगीता जाधव, दादर सेवाकेंद्र, मुंबई. (१०.४.२०१९)

‘दैनिक सनातन प्रभात’चे वितरक म्हणून सेवा करणारे श्री. प्रसन्न ढगे यांचा ‘सनातन प्रभात’प्रती असलेला भाव आणि त्यांना आलेली अनुभूती

१. ‘सनातन प्रभात’प्रती भाव

अ. ‘पहाटे ‘दैनिक सनातन प्रभात’चे अंक येतात. तेव्हा ‘परात्पर गुरुदेव माझी वाट पहात आहेत’, असा भाव ठेवून मी दैनिक वितरणाचे गठ्ठे सिद्ध करतो.

आ. दैनिक सनातन प्रभात’रूपी चैतन्याचा स्रोत घरोघरी पोचवण्याची सेवा देवाने मला दिली आहे. यामुळे मला कृतज्ञता वाटते.

२. सेवेची तळमळ

‘सनातन प्रभात’च्या विरोधात पुरो(अधो)गामी प्रसिद्धीमाध्यमांकडून टीका होते. त्या वेळी ‘सनातन प्रभात’ अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोचायला हवे’, असे मला वाटते.

३. वाचक जेव्हा ‘दैनिक सनातन प्रभात’चे कौतुक करतात, तेव्हा या सेवेतून मला खरा आनंद मिळतो.

परात्पर गुरुदेवांची कृपा आणि ‘सनातन प्रभात’मधील चैतन्य, यांमुळेच माझ्याकडून ही सेवा होते.

४. अनुभूती

‘दैनिक सनातन प्रभात’चे वितरण करू लागल्यावर गुडघेदुखीचा त्रास नाहीसा होणे : मला गुडघेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे ‘दैनिक सनातन प्रभात’चे वितरण करण्याची सेवा ‘मला जमेल का ?’ असे मला वाटत होते. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी माझ्या मनात विचार दिला, ‘अंक वितरण करण्याच्या माध्यमातून तू ‘सनातन प्रभात’मधील तेज समाजापर्यंत पोचवण्याची सेवा करत आहेस, तर मी तुझे गुडघे कसे दुखू देईन ?’ ‘परात्पर गुरुदेवांचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे आता माझा गुडघेदुखीचा त्रास नाहीसा झाला आहे.’

– श्री. प्रसन्न ढगे, नौपाडा, ठाणे. (१०.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF