गुरुंवरील दृढ श्रद्धेच्या बळावर चिकाटीने साधना करून ठाणे येथील श्री. प्रसन्न ढगे आणि सौ. अर्चना अर्गेकर, तसेच मुंबईतील सौ. कल्पना कार्येकर अन् सौ. नमिता दुखंडे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मुंबई आणि ठाणे येथील साधकांनी अनुभवला गुरुकृपेचा आनंदसोहळा !

डावीकडून उभे प्रसन्न ढगे, सौ. कल्पना कार्येकर, सौ. नमिता दुखंडे, सौ. अर्चना अर्गेकर डावीकडून बसलेल्या पू. (सौ.) संगीता जाधव, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

मुंबई, ११ एप्रिल (वार्ता.) – चैत्र शुक्ल षष्ठीचा दिवस (११ एप्रिल) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील साधकांसाठी अविस्मरणीय ठरला ! ठाणे येथील श्री. प्रसन्न ढगे (वय ५७ वर्षे) आणि सौ. अर्चना अर्गेकर (वय ६२ वर्षे), तसेच मुंबईमधील सौ. कल्पना कार्येकर (वय ५३ वर्षे) अन् सौ. नमिता दुखंडे (वय ६१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी दादर येथील पद्मशाली सभागृहात आयोजित केलेल्या एका सत्संगात घोषित केले. गुरुकृपेने मिळालेल्या या अनपेक्षित भेटीमुळे उपस्थित सर्व साधकांना अत्यानंद झाला. सद्गुरु (कु.) अनुराधाताईंनी आध्यात्मिक प्रगती करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेल्या साधकांचा श्रीकृष्णाची प्रतिमा आणि खाऊ देऊन सत्कार केला.

‘इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करणारे आणि परात्पर गुरुदेवांवर अपार श्रद्धा असलेले श्री. प्रसन्न ढगे, चिकाटीने आणि तळमळीने सेवा करणार्‍या सौ. कल्पना कार्येकर, परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या आणि स्वभावत: प्रेमभाव असलेल्या सौ. अर्चना अर्गेकर अन् सौ. नमिता दुखंडे’ या शब्दांत सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

६१ आध्यात्मिक पातळीच्या साधकांनी श्रीगुरुचरणी अर्पण केलेली शब्दसुमने !

माझ्यातील दुर्गुण घालवून गुरुदेवांनी मला घडवले ! – प्रसन्न ढगे

मी साधनेत नव्हतो, तेव्हा माझ्यात पुष्कळ दुर्गुण होते. मी सिगारेट ओढायचो, मद्यपान करायचो, शिव्या द्यायचो; मात्र गुरुदेवांनी माझ्यामध्ये पालट घडवला. मी साधनेत येण्यापूर्वी माझी स्थिती वाईट होती. गुरुदेवांनी रंकाला राव केले.

प्रत्येक अडचणीच्या वेळी गुरुदेव माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले !  सौ. अर्चना अर्गेकर

माझ्याकडून काही होत नाही. गुरुदेवांनी मला भरभरून दिले. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तितकी अल्पच आहे. माझ्या जीवनाचे सार्थक झाले. साधनेत आल्यावर गुरुदेवांनी जीवनात पुष्कळ अनुभूती दिल्या. माझा मुलगा रुग्णालयात उपचार घेत असतांना त्याच्या उपचारांकरिता माझ्याकडे पैसेही नव्हते; मात्र प्रत्येक वेळी गुरुदेवांनी माझी काळजी घेतली. आमच्या घरी साधक आल्यावर ‘गुरुदेवच घरी येत आहेत’, असा भाव ठेवल्यामुळे मला आनंद मिळतो.

गुरुदेवांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत माझ्याकडून साधना करवून घ्यावी ! – सौ. नमिता दुखंडे

गुरुदेवांनी इतके दिले की ते सांगायला शब्दच अपुरे पडत आहेत. रुग्णालयात नोकरी करतांना मलाही पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा व्हायची. देवाने तेथेही मला सेवा करण्याची संधी दिली. देवाने मला असे कुटुंब दिले की, त्यांच्या माध्यमातून माझी साधना करून घेतली. आता नातेवाईकही साधना करत आहेत. गुरुदेवांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत माझ्याकडून साधना करून घ्यावी, हीच प्रार्थना आहे.

गुरुदेवांनीच माझी आध्यात्मिक प्रगती करून घेतली, याविषयी कृतज्ञता ! – सौ. कल्पना कार्येकर

माझ्यामध्ये शरणागतभाव नाही, कृतज्ञता नाही. माझ्याकडून साधनेचे प्रयत्न होत नाहीत, असेच वाटत असते. तरीही देवाने माझी आध्यात्मिक प्रगती करून घेतली, याविषयी कृतज्ञता वाटते.

संत आणि सद्गुरु यांनी साधकांची वर्णिलेली गुणवैशिष्ट्ये !

गुरूंवर श्रद्धा कशी असावी, याचे उदाहरण म्हणजे श्री. ढगेकाका !  पू. (सौ.) संगीता जाधव

गुरूंवरील श्रद्धा कशी असायला हवी, याचे श्री. ढगेकाका हे आदर्श उदाहरण आहेत. मुलाला पैशांची काळजी करू नको, देव काळजी घेईल, असे केवळ ढगेकाकाच सांगू शकतात. देवाने श्री. ढगेकाका यांना इतक्या अनुभूती दिल्या आहेत की त्यांचा ग्रंथ निघेल.

भगवंताने वेळोवेळी किती काळजी घेतली, याची जाणीव सौ. अर्गेकरकाकू यांना आहे ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

प्रारब्ध भोगावेच लागते; मात्र ते भोगतांना काहीजण देवाला दोष देतात. देव साहाय्य करतो, याची अनेकांना जाणीव नसते. सौ. अर्गेकरकाकू यांना ती जाणीव आहे.

सौ. दुखंडेकाकू यांच्या साधनेमुळे कुटुंबियांमध्ये पालट झाला ! – पू. (सौ.) संगीता जाधव

सौ. दुखंडे यांनी एवढी साधना केली की, देवाला त्यांच्या कुटुंबियांमध्ये पालट करावा लागला. सौ. दुखंडे यांच्यातील भक्तीभावामुळेच कुटुंबियांमध्ये पालट झाला.

सौ. दुखंडेकाकू यांच्यामध्ये ईश्‍वरप्राप्तीची तळमळ आहे ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

सौ. दुखंडेकाकू या नेहमी इतरांचा विचार करतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कोणीही हक्काने आणि आपुलकीने सेवा सांगू शकतो. सौ. दुखंडेकाकू यांच्यामध्ये ईश्‍वरप्राप्तीची तळमळ आहे

सौ. कार्येकरकाकू तळमळीने सेवा करतात ! – पू. (सौ.) संगीता जाधव

सौ. कार्येकरकाकू ‘ऊन-पाऊस कशाचीही पर्वा न करता तळमळीने सेवा करतात. या वेळी पू. (सौ.) जाधव यांनी सौ. कार्येकरकाकू यांच्याविषयीचा एक प्रसंग सांगून त्यांच्या मनात चुकांविषयी खंत असल्याचे सांगितले.

कुटुंबीय आणि साधक यांनी कथन केलेली गुणवैशिष्ट्ये

बाबांनी साधनेला महत्त्व देण्यास सांगितले !  – अपूर्व ढगे (श्री. प्रसन्न ढगे यांचा मुलगा)

बाबा लहानपणापासून माझी काळजी घ्यायचे. नोकरीसाठी मुलाखत देत असतांना माझी निवड होत नव्हती. तेव्हा बाबांनी मला नोकरीऐवजी साधनेला प्राधान्य देण्यास सांगितले. मी पूर्णवेळ साधना करण्याविषयी बाबांना सांगितले, तेव्हा त्यांनी मला ‘तू आमची काळजी करू नको’, असे सांगितले. सनातन प्रभातमध्ये पूर्णवेळ साधना करण्याविषयी चौकट यायची, तेव्हा बाबा त्याचे छायाचित्र काढून मला पाठवायचे. बाबा दैनिक सनातन प्रभातचे वितरण करतात. वाचकांना दैनिक देण्याविषयी त्यांना पुष्कळ तळमळ आहे. मी नोकरी करावी कि साधना ?, अशी माझी द्विधा स्थिती होती. या वेळी बाबा मला दैनिक सनातन प्रभातमध्ये येणारी सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांची साधकांनी पूर्णवेळ साधना करण्याविषयीची चौकट भ्रमणभाषवर ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे पाठवून मला पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे माझा पूर्णवेळ साधना करण्याचा निश्‍चय झाला.

श्री. ढगे यांना गुरूंवरील श्रद्धेचे फळ मिळाले !  सौ. प्राजक्ता ढगे (श्री. ढगे यांच्या पत्नी)

श्री. ढगे यांची गुरूंवर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांच्या श्रद्धेचे फळ गुरूंनी दिले आहे. गुरुदेवांनी माझ्या जीवनाचेही सार्थक केले आहे.

आईची गुरूंवर दृढ श्रद्धा आहे ! – अजिंक्य अर्गेकर (सौ. अर्गेकर यांचा मुलगा)

आई मला सतत नामजप आणि सेवा करायला सांगते. ती सतत साधकांचा विचार करत असते. साधक-वाचक यांना सनातनची सात्त्विक उत्पादने कशी मिळतील, याची तिला तळमळ असते. आईची गुरूंवर दृढ श्रद्धा आहे. अशा आईच्या पोटी माझा जन्म झाला, याविषयी मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही विरार येथे रहात असतांना तेथील वाचकांना सनातनची सात्त्विक उत्पादने मिळण्यासाठी आई प्रयत्नरत असायची. मला प्रश्‍न पडायचा की, आई इतके कशासाठी करते ? त्याचे उत्तर मला आज मिळाले.

या वेळी श्री. अजित आर्गेकर यांनी पत्नी सौ. अर्चना हिची पुढील आध्यात्मिक प्रगती व्हावी, असे मनोगत व्यक्त केले.

सौ. नमिता मन लावून साधना करते ! – सौ. रश्मी चव्हाण (सौ. नमिता दुखंडे यांची लहान बहीण)

सौ. नमिता हिला लहानपणापासूनच कोणाकडून अपेक्षा नाहीत. तिने कधीही कोणाला उलट उत्तर दिले नाही. ती सर्वांवर जीव लावते. स्वत:साठी कधी काही घेत नाही. ती मन लावून साधना करते.

देवच आईची काळजी घेतो !  – कु. प्रज्ञा दुखंडे (सौ. दुखंडे यांची मुलगी)

आई सतत सेवेसाठी प्रयत्नरत असते. त्यामुळे तिला स्वत:कडे लक्ष देता येत नाही. याची आम्हाला काळजी वाटते; मात्र एका संतांनी सांगितले की, ‘तुम्ही किती जणांची काळजी करणार ? देव सर्वांची काळजी घेईल. तेव्हा आम्ही आईची काळजी सोडली. त्यानंतर देवच आईची काळजी घेतो, हे लक्षात आले.

या वेळी सौ. नमिता दुखंडे यांची भाची कु. वृषाली चव्हाण म्हणाल्या, ‘‘मामी पुष्कळ साधी आहे. ती कोणालाही कधी दुखावत नाही.’’ या वेळी सौ. नमिता दुखंडे यांचे यजमान श्री. गणेश दुखंडे हेही उपस्थित होते.

आईने साधनेसाठी शासकीय नोकरी सोडली ! – तेजस कार्येकर (सौ. कार्येकर यांचा मुलगा)

पूर्णवेळ साधना करता यावी, यासाठी वर्ष २०१२ मध्ये आईने शिक्षिकेची शासकीय नोकरी सोडली. आईने सेवेसाठी नोकरी सोडूनही तिला ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठता आली नाही, याविषयी मी आईला म्हणालो की, लोकांना नोकरी मिळत नाही आणि तू आहे ती नोकरीही सोडून दिलीस. यातून तू काय साध्य केले ? त्या वेळी आईने ‘मला नोकरी सोडल्याची यत्किंचितही खंत वाटत नाही. आध्यात्मिक प्रगती अनेक कारणांवर अवलंबून असते. देवच माझी प्रगती करून घेईल’, असे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF