राफेल प्रकरणाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालय फेरविचार करणार !

एकदा दिलेल्या निर्णयावर फेरविचार करणार्‍या न्यायालयांचा निर्णय अंतिम का नसतो ? त्यांना फेरविचार का करावा लागतो ? जर एखाद्या व्यक्तीची फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यासाठी आर्थिक क्षमताच नसेल, तर त्याने काय करायचे ?

नवी देहली – राफेल विमाने खरेदी प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेली फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्र सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. या प्रकरणात उघड झालेली कागदपत्रे वैध आहेत आणि फेरविचार याचिकेवर नव्या कागदपत्रांच्या आधारे सुनावणी घेण्याचा निर्णयही न्यायालयाने या वेळी दिला. सुनावणीसाठी नवीन दिनांकही निश्‍चित केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने १४ डिसेंबर २०१८ या दिवशी ‘राफेल करारात अनियमितता आहे’, असे सांगणार्‍या सर्व याचिका फेटाळल्या होत्या. ‘राफेल करारात कोणतीही अनियमितता नसून हा करार देशासाठी आवश्यक आहे’, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते.

या निर्णयानंतर भाजपचे माजी मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांच्यासह अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी फेरविचार याचिका प्रविष्ट केली होती. संरक्षण मंत्रालयातून राफेलशी संबंधित उघड झालेल्या कागदपत्रांच्या आधारे फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीला केंद्र सरकारने विरोध केला होता. ‘ही कागदपत्रे गोपनीय असल्याने फेरविचार याचिका फेटाळण्यात यावी’, असे सरकारचे म्हणणे होते.


Multi Language |Offline reading | PDF