धाडी घालण्यापूर्वी आम्हाला कळवा !

निवडणूक आयोगाची आयकर विभागाला तंबी

  • आयकर विभाग किंवा अंमलबजावणी संचालनालय भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांवर आणि तेही निवडणुकीच्या काळातच कशी कारवाई करते, याचे उत्तर भाजप सरकार आणि या यंत्रणा यांनी दिले पाहिजे !
  • ज्यांच्यावर कारवाई केली जात आहे, ते खरेच भ्रष्ट आहेत, तर भाजप सरकारने त्यांच्यावर यापूर्वीच कारवाई करण्याचा आदेश का दिला नाही ? कि ते निवडणुकीची वाट पहात होते ?
  • प्रशासकीय स्तरावरील महत्त्वाच्या विभागांमध्ये कशा प्रकारे समन्वय आणि सूसुत्रता नसते, हे यावरून दिसून येते ! असे प्रशासन जनहित काय साधणार ?
  • नियम बासनात बांधून कारवाई करणार्‍या सरकारी यंत्रणा मोगलाईची आठवण करून देतात ! अशांवरही कारवाई झाली पाहिजे !

 

नवी देहली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या देशभरात आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडून भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांवर आणि प्रशासकीय अधिकार्‍यांवर धाडी घातल्या जात आहेत. याविषयी तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने आयकर विभागाला धाडी टाकण्याआधी त्याला कळवण्याचा आदेश दिला आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार मध्यप्रदेशात आयकर विभागाने केलेल्या धाडीची केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.

निवडणूक आयोगाने आयकर विभागाला सांगितले की, आचारसंहिता लागू असल्याने भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही धाड घालतांना किंवा कारवाई करतांना केंद्रीय किंवा राज्य निवडणूक आयोग यांना यासंबंधी माहिती देण्यात यावी. यावर आयकर विभागाने सांगितले, ‘आम्हाला याची कल्पना आहे.’ त्यावर ‘तुम्हाला कल्पना असूनही आम्हाला माहिती का देण्यात आली नाही ?’, अशी विचारणा निवडणूक आयोगाने केली. (नियम ठाऊक असूनही त्याचे पालन न करता धाडी घालणारा आयकर विभाग ! – संपादक)

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे सिमेंटच्या गोण्यांमधून १ कोटी ९० लाख रुपये जप्त

मतांवर नाही, तर नोटांवर चालणारी लोकशाही ईश्‍वरी राज्य अपरिहार्य करते !

विजयवाडा (आंध्रप्रदेश) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथे सिमेंटच्या गोण्या भरलेल्या एका ट्रकमधून १ कोटी ९० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी ट्रकचालकाला पोलिसांनी कह्यात घेतले असून त्याची चौकशी चालू आहे.

सर्वच पक्षांवर धाड का घातली जात नाही ? – तेलगू देसम्चा प्रश्‍न

तेलगू देसम् पक्षाच्या खासदाराच्या घरावर आयकर विभागाची धाड

पूर्वी तेलगू देसम् पक्ष भाजपसमवेत होता. त्या वेळी ‘या पक्षाचे खासदार भ्रष्ट आहेत’, हे भाजप सरकारला ज्ञात नव्हते का ? आता या पक्षाने भाजपशी फारकत घेऊन काँग्रेसशी हातमिळवणी केल्यावर सूड उगवण्यासाठी या पक्षाच्या खासदाराच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली आहे का ?

गल्ला जयदेव

गुंटूर (आंध्रप्रदेश) – येथील तेलगू देसम् पक्षाचे खासदार गल्ला जयदेव यांच्या निवासस्थानी आणि कार्यालय यांवर ९ एप्रिलच्या रात्री आयकर विभागाने धाड टाकली.  या कारवाईच्या विरोधात तेलगू देसम्च्या नेत्यांनी आंदोलन केले.

(स्वतः समवेत असतांना सूट देणारे; मात्र फारकत घेतल्यावर कारवाई करणारे तत्त्वहीन शासनकर्ते भ्रष्टाचार कधीही निपटू शकत नाहीत ! प्रसंगी कुटुंबातील भ्रष्ट व्यक्तीवरही कारवाई करण्यास मागे-पुढे न पहाणारे तत्त्वनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ शासनकर्ते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच (ईश्‍वरी राज्यच) हवे ! – संपादक)

१. तेलगू देसम्चे प्रवक्ते एल्. दिनाकरन् म्हणाले की, आयकर विभागाकडून होणारी कारवाई निवडणूक आयोगाच्या अनुमतीनंतर होत आहे कि जगनमोहन रेड्डी (रेड्डी हे वायएस्आर् काँग्रेसचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत आंध्रप्रदेशमध्ये या पक्षाला भाजपची साथ आहे) यांच्या सांगण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, याविषयी आम्हाला ठाऊक नाही.

२. खासदार गल्ला जयदेव यांनी सांगितले की, माझ्या एका व्यक्तीला आयकर विभागाने कह्यात घेतले आहे. केवळ आमच्या पक्षाच्या नेत्यांना आयकर विभागाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. जर निवडणूक आयोग आणि इतर यंत्रणा निष्पक्ष काम करत आहेत, तर अशी कारवाई सर्व पक्षांवर झाली पाहिजे.


Multi Language |Offline reading | PDF