धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाईल ! – भय्याजी जोशी

  • धर्मरक्षणासाठी आजपर्यंत संघाने कसून प्रयत्न केले असते, तर साधनारत धर्माचरणी पिढी निर्माण झाली असती. गेल्या ७० वर्षांत संघाने ’धर्म आपल्या घरात पुजण्याची गोष्ट आहे’ असे म्हणून धर्मशिक्षण दिले नाही. त्याचे दुष्परिणाम म्हणून आज समाजात  धर्माचरणाच्या अभावामुळेच पाश्‍चात्त्य कुप्रथांनी हिंदु समाज भरडला गेला आहे.
  • धर्माचे रक्षण करण्याची संघाची भूमिका असती, तर आतापर्यंत राममंदिर उभे राहिले असते आणि विकासाप्रमाणे राष्ट्ररक्षणाला प्रथम प्राधान्य दिले गेले असते.
  • धर्माचे रक्षण करण्याची संघाची भूमिका असती, तर आतापर्यंत लव्ह जिहाद, दंगली यांच्या माध्यमातून हिंदूंवर आक्रमण करण्याचे कोणाचे धैर्य झाले नसते.   
श्री. भय्याजी जोशी

पुणे, १० एप्रिल – देशाची हानी ही सज्जन शक्तीच्या निष्क्रीयतेनेच झाली आहे. हीच निष्क्रीयता झटकून हिंदु समाजाला सक्रिय करायचे आहे. धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाणार आहे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी काढले. स्नेहल प्रकाशनच्या वतीने रामकृष्ण पटवर्धनलिखित ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन’ पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी ते म्हणाले की, धर्माचे रक्षण करण्यासाठी संघ विचार महत्त्वाचा आहे. समाज कालप्रवाहात जागृत राहिला नाही तर काय होते, याचे उदाहरण म्हणजे भारत आहे. विचार विमानातून चालला आहे आणि आचरण बैलगाडीतून चालले आहे, असे होता कामा नये. एक निर्दोष समाज उभा करायचा आहे. समाजातील दोष दूर करण्यासाठी पुरुषार्थ निर्माण केला पाहिजे.


Multi Language |Offline reading | PDF