५३ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सनातन संकुल, देवद, पनवेल येथील चि. गिरिजा संतोष खटावकर (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. गिरिजा खटावकर ही एक आहे !

चि. गिरिजा खटावकर

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(वर्ष २०१७ मध्ये चि. गिरिजा संतोष खटावकर हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.)

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

१. रांगत जाऊन संत भक्तराज महाराज यांच्या गाडीखाली बसणे आणि गाडीभोवती स्वतःहून प्रदक्षिणा घालणे

‘चि. गिरिजा १० मासांची असतांना तिला देवद आश्रमात नेले असता ती रांगत जाऊन संत भक्तराज महाराज यांच्या गाडीखाली जाऊन बसायची. तिला तिथे बसायला पुष्कळ आवडायचे. अजूनही पुष्कळ वेळा ती त्यांच्या गाडीभोवती स्वतःहून प्रदक्षिणा घालते आणि प्रत्येक वेळी गाडीला डोके टेकून नमस्कार करते. काही वेळा मात्र गाडीजवळ जाण्यास ती मुळीच सिद्ध होत नाही.

२. सहजरित्या कुठेही रमणे

गिरिजा कुठेही सहजरित्या रमते. ती स्वतःच्याच जगात असते. लहान-सहान गोष्टीनेही तिला पुष्कळ आनंद होतो.

३. स्वावलंबी

दीड वर्षाची झाल्यापासून पुष्कळशा कृती स्वतःच करते. दात घासणे, अंघोळ करणे, कपडे घालणे, केस विंचरणे, कपड्यांच्या घड्या घालणे, जेवणेे इत्यादी सर्व कृती करण्याचा तिचा प्रयत्न असतो.

४. घरकामांत साहाय्य करणे

ती मला घरकामांत साहाय्य करते. मी धुतलेले कपडे वाळत घालतांना ती एक-एक कपडा माझ्या हातात आणून देते. बाजारातून आणलेल्या भाजीचे ती व्यवस्थित वर्गीकरण करते.

५. व्यवस्थितपणा

एखाद्या वेळेस दूध किंवा एखादा पदार्थ उघडा राहिल्यास ती तो झाकण्यास सांगते. सकाळी अंघोळ झाल्यावर तेथील ‘स्टूल’ त्याच्यावरील पाणी जाण्यासाठी उभे करून ठेवते आणि नमस्कार करते. घरातील केर ती नेमकेपणाने कचरापेटीत टाकते.

६. चांगली स्मरणशक्ती

‘एखादी वस्तू अथवा पदार्थ कुठे ठेवला आहे ?’, हे तिच्या चांगलेच लक्षात रहाते.

७. सहनशील

जून २०१८ मध्ये उष्णतेमुळे तिला नेमका बसण्याच्या जागेवर फोड आला होता. त्याचा तिला पुष्कळ त्रास होऊन ती खाली किंवा आसंदीवरही बसू शकत नव्हती. तिला नीट चालताही येत नव्हते, तरी ती नेहमीप्रमाणे चालत होती. फोडामुळे तिला तापही येत होता. सलग ८ – १० दिवस तिने असा त्रास सहन केला. त्या वेळी तिने चिडचिड केली नाही.

८. धर्माचरणाची आवड

तिला कपाळावर कुंकू लावायला पुष्कळ आवडते. ती स्वतःला आणि मला अनेक वेळा कुंकू लावते.

९. आध्यात्मिक उपाय करण्याची आवड

घरातून बाहेर पडतांना ती आम्हाला अत्तर, कापूर लावण्याची आठवण करून देते. ती दैनिक सनातन प्रभातचा अंक जवळ घेऊन आणि कापूर लावून मगच झोपते. ती उदबत्तीने स्वतःवरील, तसेच तिची खेळणी आणि सायकल यांच्यावरील त्रासदायक आवरणही काढते.

१०. गिरिजामुळे यजमानांच्या मित्राच्या गर्भवती पत्नीचे आध्यात्मिक त्रास न्यून होणे

ती सव्वा वर्षाची असतांना एकदा आम्ही पुण्याला यजमानांच्या एका मित्राच्या घरी गेलो होतोे. त्या मित्राची पत्नी गर्भवती होती. गिरिजाला बघून तिला पुष्कळ आनंद झाला. गिरिजा तेथे असेपर्यंत तिचेे आध्यात्मिक त्रास न्यून झाले.

११. एकदा गिरिजा जिन्यातून गडगडत खाली आली; पण तिला जराही खरचटले नाही. यावरून मला ‘देव तिचे सतत रक्षण करत आहे’, याची प्रचीती आली.

१२. सूक्ष्मातील कळणे

एकदा यजमानांचे मित्र मुंबईहून रात्री आमच्या घरी आले. बाहेरील रज-तमात्मक वातावरणातून आल्यामुळे ते पुष्कळ अस्वस्थ झाले होते आणि थकलेही होते. त्या वेळी गिरिजा त्यांच्याकडे बघून रडू लागली आणि त्यांच्याकडे जायला सिद्ध झाली नाही. त्यांनी उदबत्तीने स्वतःवरील आवरण काढले आणि नंतर आश्रमात जाऊ लागले. त्या वेळी मात्र गिरिजा ‘त्यांच्यासमवेत जायचे आहे’; म्हणून रडू लागली.

१३. नमस्कार करण्याच्या कृतीतून सतत देवाच्या अनुसंधानात रहाणारी गिरिजा !

अ. प्रसाद (अल्पाहार) आणि महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी ती न विसरता हात जोडून नमस्कार करते. ती श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जेवायला बोलावते.

आ. घरातून बाहेर जातांंना ती श्रीकृष्णाला नमस्कार करून मग बाहेर पडते. ती डोळे बंद करून परात्पर गुरु डॉक्टरांना बोलावते.

इ. बाहेर गेल्यावर कुठे तिला देऊळ दिसल्यास ती स्वतःहून पाया पडते आणि आम्हालाही पाया पडण्यास सांगते.

ई. आरतीतील शंखनाद कुठेही ऐकला की, ती हात जोडून नमस्काराच्या मुद्रेत थांबते.

उ. आश्रमात गेल्यावर ती संत भक्तराज महाराज यांच्या मोठ्या आकारातील तैलचित्रासमोर उभी राहून नमस्कार करते. परात्पर गुरु पांडे महाराज यांना पाहिल्यावर ती लगेच वाकून नमस्कार करते.

१४. आश्रमाची ओढ

तिला आश्रमात जायला पुष्कळ आवडते. आश्रमातून घरी जाण्याची मात्र तिची सिद्धता नसते. तिचेे वडील कामावर जातांना ती त्यांच्या मागे लागत नाही; परंतु ते सेवेला आश्रमात जात असतील, तर त्यांच्यासमवेत जायचा हट्ट करते.

१५. वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अ. माझ्या माहेरी मोठे कुटुंब आहे. तेथे बरीच लहान मुले आहेत. असे असूनही त्या सर्वांना गिरिजाची सारखी आठवण येते. ‘गिरिजामध्ये काहीतरी निराळेपण आहे’, असे त्यांना वाटते.

आ. गिरिजा आता दोन वर्षांची झाली आहे. अजूनही तिच्या डोळ्यांतील भाव, तसेच तोंडवळ्याचा रंग सतत पालटत असल्याचे जाणवते. तिचे डोळे कधी तेजस्वी, चमकदार, तर कधी निस्तेज दिसतात.

इ. ती झोपेत असतांना नेहमी हाताच्या मुद्रा आणि न्यास करतेे.

ई. झोपल्यावर तिच्या तोंडवळ्यावर वेगवेगळे भाव असतात, उदा. तिचा तोंडवळा कधी ध्यानमग्न, आनंदी, हसरा, समाधानी, तेजस्वी, कधी घाबरलेला, तर कधी निस्तेज दिसतो.

१६. गिरिजामधील स्वभावदोष

ऐकण्याची वृत्ती नसणे (पटकन न ऐकणे), हट्टीपणा, राग येणे आणि मनाप्रमाणे वागणे.’

– सौ. सुप्रिया संतोष खटावकर (चि. गिरिजाची आई), सनातन संकुल, देवद, पनवेल. (३१.१०.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF