‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात सांगली येथील ‘स्वरांजली’ भजनी मंडळाकडून भजनांचा कार्यक्रम भावपूर्णरित्या सादर !

संगीत सदर
ईश्‍वरप्राप्तीसाठी कला

१३.३.२०१९ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात सांगली येथील ‘स्वरांजली’ भजनी मंडळाचा भजनांचा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचा आरंभ ‘जय जय राम कृष्ण हरि ।’ या नामजपाने करण्यात आला. नंतर श्री गणेश, श्रीकृष्ण, श्रीविठ्ठल आदी देवतांवर आधारित विविध भजने सादर करण्यात आली. या कार्यक्रमाची सांगता भगवान दत्तात्रेयांवर आधारित भैरवीने झाली. देवीचा गोंधळ, श्रीकृष्णलीलांवर आधारित गवळण इत्यादी गायन प्रकारांनी श्रोत्यांच्या आनंदात वाढ झाली. या वेळी मुख्य गायन सौ. शैलजा परांजपे, सौ. पल्लवी जोगळेकर आणि सौ. रेखा लिमये यांनी केले. त्यांना सौ. संध्या कुलकर्णी, सौ. कल्पना सहस्रबुद्धे, श्रीमती रेखा काळे, सौ. कीर्ती आठवले, सौ. स्वाती जोशी, श्रीमती सुनिता हेर्लेकर आणि श्रीमती गीता उपरे या सर्वांनी भजने म्हणून आणि टाळ वाजवून साथ दिली. सौ. अंजली कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर, तर महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी तबल्यावर साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनिती हुन्नूर यांनी आपल्या मधुर आवाजात उत्साहाने आणि आनंदाने करून कार्यक्रमाला एका धाग्यात सुरेखरित्या गुंफून ठेवले.

भजन सादर करतांना ‘स्वरांजली’ भजनी मंडळाच्या सदस्या

१. ‘स्वरांजली भजनी मंडळा’ची वैशिष्ट्ये

अ. स्वरांजली भजनी मंडळाच्या सर्व भगिनी अनेक मंदिरांमध्ये भजने सादर करतात. ‘भजन करणे’, ही साधना आहे’, असा त्यांचा दृष्टीकोन असल्याने त्या कधीही भजन म्हटल्यावर त्याचे मूल्य (बिदागी) घेत नाहीत.

आ. ‘ही भजनसेवा देवाचरणी रुजू व्हायला हवी’, असा भाव ठेवून त्या सगळ्या जणी भजने सादर करतात, तसेच ५ मिनिटे मोठ्याने नामजप करून नंतर भजने म्हणण्यास आरंभ करतात.

२. ‘स्वरांजली भजनी मंडळा’ने भजने सादर केल्यानंतर साधकांना त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये

अ. त्या सर्व जणी तल्लीन होऊन गात होत्या. सर्वांनीच आनंदाने आणि भावपूर्णरित्या सादर केलेल्या भजनांमुळे श्रोत्यांनी त्या भजनांद्वारे भक्तीरसाचा पुरेपूर आस्वाद घेतला.

आ. भजनी मंडळातील सर्वांचे वय अधिक असूनही सर्व जणी एका सुरात भजने म्हणत होत्या आणि सहजपणे स्वरांची चढ-उतार करत होत्या. सर्वांचा भजने सादर करण्याचा उत्साह दांडगा होता.

इ. भजन सादर करतांना वयोमानानुसार होणार्‍या विविध शारीरिक त्रासांवर मात करत सर्व जणी भजनांचे गायन भगवंताला अपेक्षित असे सादर होण्यासाठी प्रयत्न करत होत्या.

ई. भजनात सादर झालेल्या ‘दिंडी चालली पंढरी…’ आणि ‘उदे गं अंबाबाई…’ या भजनांनी श्री विठ्ठल आणि देवी यांच्या दर्शनाचा आनंद दिला. ‘कांदा, मुळा, भाजी…’ या भजनातून ‘दैनंदिन जीवनातही भगवंताला कसे अनुभवायचे ?’, याचे सुंदर वर्णन करत भजनी मंडळाने श्रोत्यांना आनंद दिला.

उ. ‘आमच्या स्वरांजली भजनी मंडळास या पवित्र वास्तूत सेवा करण्याची संधी मिळाली’, हे आमचे महद्भाग्य आहे’, अशी कृतज्ञता भजनी मंडळातील प्रत्येकच सदस्याला वाटत होती.

ऊ. भजन यातील ‘भज’ म्हणजे भजणे आणि ‘न’ म्हणजे भगवंताचे नाम. भजन म्हणजे भगवंताचे नाम भावपूर्ण घेणे. या अर्थाला अनुरूप या भजनी मंडळाच्या भगिनी भजनांकडे साधना म्हणूनच बघतात. असाच भाव सर्वांनी भजन गातांना ठेवणे आवश्यक आहे.

३. रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम आणि तेथील साधक यांच्या संदर्भात भजनी मंडळातील सदस्यांनी व्यक्त केलेले मनोगत

‘रामनाथी आश्रमातील शिस्त, स्वच्छता, नियोजनबद्धता, साधकांचा मृदू आवाज आणि शांती या सर्वांनी आम्ही अक्षरशः भारावून गेलो. या वास्तूत प्रवेश केल्यावर घर, मुले-बाळे, दुखणे यांची आम्हाला जराही आठवण झाली नाही’, असे भावपूर्ण मनोगत सर्वांनी व्यक्त केले. ‘स्वतःत सुधारणा करण्यासाठी झालेल्या चुकांची स्वीकृती देणे आणि त्यावर स्वत:हून प्रायश्‍चित्त घेणे’, हे आचरणात आणून अहंभाव नष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत’, असा मानसही सर्वांनी व्यक्त केला.

अ. ‘आश्रमात फिरतांना येथील शिस्त, प्रेमभाव आणि सर्व जण एकमेकांना करत असलेले सहकार्य पाहून मला पुष्कळ आनंद झाला. साधकांनी आम्हा सर्वांची पुष्कळ काळजी घेतली.

आ. ‘मला अध्यात्माची आवड आहे. मी गोंदवल्याला जाते. प्रतिदिन ५ माळा नामजप करते’, असा माझा अहंकार होता; पण येथील सर्वांचा साधनेचा भाग पाहिल्यावर तो नष्ट झाला.

इ. सनातन संस्थेविषयी मी पुष्कळ वाईट ऐकले होते. आश्रमातील सर्व कार्य पाहून मला ती गोष्ट मुळीच पटली नाही, तसेच सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍या लोकांचाही पुष्कळ राग आला. आम्ही तर येथे खरेच स्वर्गसुख घेत आहोत. दोन दिवसांत पुष्कळ चैतन्य लुटून जात आहोत. ‘आमच्या जीवनाची बॅटरी १०० टक्के चार्ज झाली’, असे मला वाटते. ‘वय झाल्यावर प्रपंचात गुंतण्यापेक्षा साधना, राष्ट्र आणि धर्म यांसाठी असे काहीतरी कार्य करावे’, असे तीव्रतेने वाटले.’

– श्रीमती सुनिता हेर्लेकर, सांगली

ई. ‘मला आश्रमात अनुभवायला मिळालेले शांती आणि समाधान अवर्णनीय आहे.’ – श्रीमती रेखा काळे

उ. ‘आश्रमाच्या प्रवेशद्वारापासूनच इथल्या पावित्र्याची प्रचीती येते. येथील प्रत्येकच व्यवस्था, प्रसाद, आत्मीयता आदी सारे पाहून आम्ही अतिशय भारावून गेलो. ‘संगीतातून अध्यात्मबोध’, ही संकल्पना पुष्कळ छान आहे. ती आम्ही येथे चांगल्या प्रकारे अनुभवली.’ – सौ. वैशाली फडणीस

४. आलेल्या अनुभूती

४ अ. रामनाथी आश्रमात येतांना ‘भजन नीट होईल ना ?’, याचा ताण येणे; पण आश्रम पहातांना मनावरील ताण पूर्णपणे निघून जाणे : ‘मी स्वरांजली भजनी मंडळात येऊन ४ – ५ वर्षे झाली. रामनाथी आश्रमात येतांना माझ्या मनावर थोडा ताण होता. आश्रमात येईपर्यंत माझ्या मनात ‘भजनांचे गायन नीट होईल का ? गायनातील चढ-उतार मला जमतील का ?’, असे विचार अधिक होते; पण येथे आल्यावर आश्रम पहातांना माझ्या मनावरील ताण पूर्णपणे निघून गेला.

४ आ. आश्रमात काही ठिकाणी आपोआप उमटलेले ‘ॐ’कार पाहून आणि ‘भिंतीवर हात ठेवून काय जाणवते ?’, याची अनुभूती घेत असतांना हातांतून दैवी स्पंदने माझ्या शरिरात जात असल्याचे जाणवले.’

– श्रीमती सुनिता हेर्लेकर

४ इ. ‘आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना माझ्या डोक्यात चांगल्या संवेदना जाणवल्या. तशा संवेदना मी यापूर्वी नामजप करतांना अनुभवल्या नव्हत्या.’ – श्रीमती रेखा काळे

४ ई. भजनांच्या सेवेतून भावजागृती होणे : ‘आम्ही अनेक ठिकाणी भजन गाण्याची सेवा केली; पण येथे मिळाले, तसे समाधान आम्हाला कुठेच मिळाले नाही. येथे केलेल्या भजनांच्या सेवेतून माझी भावजागृती झाली.’ – सौ. रेखा लिमये (१९.३.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक   


Multi Language |Offline reading | PDF