५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. मंजुषा मुकुंद म्हेत्रे (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मंजुषा म्हेत्रे ही एक आहे !

कु. मंजुषा म्हेत्रे

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

१. जन्म ते १ वर्ष

१ अ. जन्मानंतर १ मास मंजुषा तर्जनी आणि अंगठा यांची टोके जुळवून हाताची मुद्रा करायची.

१ आ. सत्संग आणि बालसंस्कारवर्ग यांत न रडता शांत रहाणे : ती दीड मासाची झाल्यावर मी सेवेला प्रारंभ केला. तेव्हा ती सत्संग आणि बालसंस्कारवर्ग यांत न रडता शांत रहायची अन् आनंदाने हात-पाय हलवायची.

१ इ. ती घरी आलेल्या साधकांकडे एकटक पहायची. तिला तीन मास पूर्ण झाल्यावर ती सर्वांकडे पाहून हसायची आणि हाक मारल्यानंतर लगेच वळून बघायची.

१ ई. देवाची आवड : ती जेवतांना सर्वांच्या नावाने घास घेत जेवते, उदा. प.पू. भक्तराज बाबा, परात्पर गुरु डॉक्टरबाबा, श्रीकृष्ण आणि सर्व देवता. ती ५ – ६ मासांची असतांना आम्ही भ्रमणभाषवर भजने आणि रामाचा पाळणा लावल्यावर तिला ते ऐकायला पुष्कळ आवडत असे. सायंकाळी ‘शुभं करोति’ म्हणतांना ती मांडीवर शांत बसून नमस्कार करायची. ती नामजप ऐकत झोपायची.

१ उ. मंजुषाच्या ‘पालथे पडणे, पुढे सरकणे, रांगणे, बसणे, उभे रहाणे आणि बोलणे’, या सर्व कृती इतर मुलांपेक्षा लवकर झाल्या.

१ ऊ. मंजुषाचे खाणे-पिणे आणि झोप अल्प आहे, तरी ती आनंदी अन् उत्साही असते.

२. वय १ ते ३ वर्षे

२ अ. घरकामात साहाय्य करणे : कचरा काढण्यासाठी ती मला झाडू आणि सुपली आणून देते. ती घासून धुतलेली भांडी जागेवर नेऊन ठेवते. ती घेवडा, पावटा या शेंगा निवडते, लसूण सोलते आणि मला भाज्या आणून देते.

२ आ. सात्त्विक गोष्टींची आवड असणे

१. लहानपणापासून मंजुषाला पूर्ण अंग झाकलेले आणि सात्त्विक कपडे घालायला आवडतात, तसेच तिला पिवळा, गुलाबी अन् लाल रंगांचे कपडे आवडतात. काळ्या रंगाचे कपडे तिला आवडत नाहीत.

२. रात्री झोपतांना मला ‘रामाचा पाळणा म्हण’, असे म्हणायची आणि पाळणा ऐकत झोपायची.

३. ती संस्कारवर्गातही शांत बसून तो पूर्ण ऐकायची.

४. तिला सनातन पंचांग पहायला पुष्कळ आवडायचे. त्या पंचांगातील हनुमानाचे चित्र काढून ती बघायची. त्यातील सर्व देवतांची नावे चित्रे बघून ती त्यांना नमस्कार करायची.

५. ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ओळखून त्यांना ‘डॉक्टर बाबा’ म्हणायची.

६. तिला वास्तूछताच्या नामपट्ट्या पाहून आनंद व्हायचा आणि ती सर्व नामपट्ट्या ओळीने वाचून दाखवायची.

३. वय ३ ते ५ वर्षे

श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणे : मी तिला घेऊन अंगणवाडीत जात होते. तेव्हा तिने मला विचारले, ‘‘आपल्या मागून कोण येत आहे ?’’ तेव्हा मी मागे वळून पाहिले आणि तिला सांगितले, ‘‘कोणी येत नाही.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘अगं, आपल्या मागून श्रीकृष्ण येत आहे.’’

४. वय ५ ते ८ वर्षे

४ अ. मंजुषा शाळेतील वक्तृत्व स्पर्धा, तसेच खेळ आणि रांगोळी यांच्या स्पर्धेत भाग घेत असे.

४ आ. गायीविषयीचे प्रेम : तिला गायीविषयी पुष्कळ लळा आहे. त्यामुळे ती लहानपणापासून गायीला खायला देण्यासाठी हट्ट करते आणि गाय अन् वासरू यांना आवडीने खायला घालते.

४ इ. जिज्ञासा : प्रत्येक कृतीमागील अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याची जिज्ञासा असल्यामुळे ती ‘मनातल्या मनात नामजप करणे म्हणजे काय ? तो कसा करायचा ? माणसाचा मृत्यू होतो, म्हणजे काय ? तो कुठे जातो ?’, असे अनेक प्रश्‍न विचारत. सर्व प्रश्‍नांची उत्तरे समाधानकारक मिळत नाहीत, तोपर्यंत ती विचारत असत.

४ ई. सेवेची आवड : सेवेची आवड असल्यामुळे ती सेवेला जाण्याचा हट्ट करते. ‘साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार कोण कोण आहेत ?’, हे ती अचूकपणे सांगत. तिला ग्रंथप्रदर्शन लावणे, साप्ताहिक सनातन प्रभातचे वितरण करणे, या सेवा करायला आवडते.

४ उ. चुकांची जाणीव करून दिल्यावर त्या स्वीकारून क्षमायाचना करणे : माझी चूक झाली असेल, तर ती मला लगेच त्याविषयी केंद्रसेवकांना सांगण्यास सांगते. तिला चुकांची जाणीव करून दिल्यावर ती त्या त्वरित स्वीकारते आणि क्षमायाचना करते. आजीच्या संदर्भात तिच्याकडून काही चूक झाली असल्यास ती लगेच आजीच्या पाया पडते आणि क्षमा मागते.

४ ऊ. मंजुषाला सर्व पारंपरिक पदार्थ, तसेच शाकाहारी जेवण आवडते. ती बिस्किट, चॉकलेट आणि बेकरीचे पदार्थ खात नाही, तसेच चहाही पित नाही.

४ ए. क्षात्रभाव

१. ‘वर्गातील एका मुलाने खंडेरायाच्या वेशातील गणपतीची मूर्ती आणली आहे’, हे तिला समजल्यावर तिने त्या मुलाला ‘विडंबन कसे होते ? मूर्ती कशी असावी ? कशी नसावी ?’, या संदर्भात माहिती सांगितली.

२. एका मुलाने देवतेचे चित्र असलेले कपडे घातले होते. ते पाहून तिला राग आला. तिने मला त्याचे प्रबोधन करण्यास सांगितले.

४ ऐ. भावपूर्ण नामजप करणे : ती आमच्या समवेत नामजपाला बसते. एकदा शाळेत शिक्षिकेने सर्व मुलांना डोळे मिटून प्राणायाम करण्यास सांगितले, तेव्हा मंजुषाने प्राणायामाऐवजी ‘आपण नामजप करूया’, असा विचार केला आणि ती डोळे मिटून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करू लागली. सर्व मुले प्राणायाम झाल्यानंतर एकमेकांशी बोलत होती, तरी मंजुषा ध्यानस्थ बसली होती. सर्व मुला-मुलींचे तिच्याकडे लक्ष गेले. ती बर्‍याच वेळाने ध्यानातून बाहेर आली.

४ ओ. आश्रमात जाण्याची ओढ : ती ‘परात्पर गुरु डॉक्टर बाबा कुठे रहातात ? ते काय करतात ? आपण त्यांच्याकडे कधी जायचे ?’, असे सतत विचारत असते. ती म्हणते, ‘‘मी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना विचारीन की, मी आश्रमात कधी येऊ ? आणि ते म्हणाले की, आता इथेच रहा, तर मी रहाणार.’’

४ औ. धर्मजागृती सभेच्या वेळी आजारी असतांनाही बालकक्षात उभे राहून घोषणा देणे : गुरुपौर्णिमेच्या वेळी आणि धर्मजागृती सभेत तिला घोषणा देण्यास आवडते. त्यामुळे ती बालसंस्कार कक्षात आवडीने सेवा करते. एकदा ती आजारी होती, तरी तिने धर्मजागृती सभेतील बालसंस्कार कक्षात उभे राहून घोषणा दिल्या.

५. स्वभावदोष

स्वतःचे साहित्य जागेवरन ठेवणे, अव्यवस्थितपणा आणि मोठ्याने बोलणे.

भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने मंजुषाविषयीची जाणवलेली वैशिष्ट्ये लिहिता आली. ती श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करते.’

– सौ. छाया मुकुंद म्हेत्रे (आई), कोरेगाव, सातारा.

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now