संस्कारवर्गांचा दुष्काळ !

नोंद

शालेय परीक्षा संपून आता विद्यार्थ्यांचे सुट्ट्यांचे दिवस चालू झाले आहेत. पूर्वी म्हणजे अगदी १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत ‘उन्हाळी सुट्ट्या आणि संस्कारवर्ग’ हे समीकरणच असायचे. उन्हाळ्याची सुट्टी लागली की, संस्कारवर्ग चालू व्हायचे, ज्यामध्ये स्तोत्र, पाढे यांचे पाठांतर करवून घेण्यासह कविता शिकवणे, छोट्या छोट्या स्पर्धा घेणे, सहल काढणे असे प्रकार चालायचे. मुलेही आवर्जून या वर्गांना जात. कोणी उडाणटप्पूने हे वर्ग बुडवल्यास पालकही रागवत. विशेष म्हणजे गावातील वडीलधारी मंडळी संस्कारवर्गांचा हा भाग विनामूल्य करत. सध्या मात्र असे संस्कारवर्ग सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत. शहरी भागांमध्ये तर ते शोधूनही सापडतील कि नाही, याची शाश्‍वती देता येत नाही.

काळाच्या ओघात या संस्कारवर्गांची जागा आता ‘समर कॅम्प’ने घेतली आहे आणि स्तोत्र, पाढे आदींची जागा ‘ऍक्टिव्हिटीज’नी ! या ‘समर कॅम्प’साठी प्रतिदिन १०० ते १५० रुपये या दराने प्रवेशशुल्कही आकारले जाते. चित्रकला, स्वयंपाकातील एखादी कृती, पोहणे आदी कृती यांमध्ये करवून घेतल्या जातात. त्याही काही वाईट नाहीत; पण पूर्वीच्या काळातील जिव्हाळा या वातावरणात अल्प आहे, एवढे निश्‍चित ! अर्थात् काळ पालटतो, त्याप्रमाणे संकल्पनांमध्येही परिवर्तन होत असते. अजून ५० वर्षे आधी गेल्यास संस्कारवर्गही नव्हते. सख्खे, चुलत मिळून घरातच इतकी भावंडे असायची की, त्या वातावरणात नकळतच संस्कार रुजले जात असावेत. आज लहान मुलांना ‘शेअरिंग’ (आपल्याकडील वस्तू इतरांनाही देणे) ही संकल्पना निराळी ‘ऍक्टिव्हिटी’ घेऊन शिकवावी लागते; पण पूर्वीच्या काळी तसा प्रश्‍नच उद्भवत नव्हता; कारण घरातच इतके जण असायचे की, त्यांना सोडून एकट्याने खाणे, हेच दूषण वाटायचे आणि तरीही तसा प्रयत्न झालाच, तर घरातील वडीलधारी मंडळी या वाईट सवयी तिथल्या तिथेच मोडून काढण्यासाठी दक्ष असायची. काळानुसार परिवर्तन हे अपरिहार्य आहे. ते थांबवणे कोणाच्याही हातात नाही. त्यामुळे संस्कारवर्गांची जागा आता ‘समर कॅम्प’ने घेतली म्हणून विशेष हरकत नाही. या ‘कॅम्प’मध्ये चांगले संस्कार होण्यासाठी काही ऊहापोह होणार का ? चांगल्या सवयी लावण्यासाठी, स्वत:मध्ये गुण आणण्यासाठी या कॅम्पची रचना केली जाणार का ? तसे असेल, तर या ‘समर कॅम्प’ला काही अर्थ आहे, असे म्हणावेसे वाटते. केवळ परिवर्तन होतांना मूळ गाभा आणि आशय शक्य तितका चांगला अन् संस्कारितच रहावा, ही अपेक्षा !

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे


Multi Language |Offline reading | PDF