राममंदिराला विरोध हा आसुरी शक्तींचे प्रतीक ! – भय्याजी जोशी

समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील ‘वाल्मिकी रामायण – सुंदरकांड’ या ग्रंथाचे प्रकाशन

ग्रंथ प्रकाशन करतांना डावीकडून सर्वश्री प्रकाश पाठक, शरद कुबेर,  स्वामी स्वरूपानंद सरस्वती, भय्याजी जोशी, प्रा. देवेंद्र डोंगरे

पुणे, ८ एप्रिल (वार्ता.) – अयोध्येत राममंदिर होण्यासाठी राम परीक्षा पहात आहे; मात्र अयोध्येत १०० टक्के राममंदिर होणार. आसुरी संस्कारांत वाढलेले लोकच ‘राम हा अग्रक्रमाचा विषय नाही’, असे सांगतात. राममंदिराला विरोध करणारी सारी आसुरी शक्तींची प्रतीके आहेत. राममंदिरासह देशात सुरक्षा, न्याय, वैभव, शांती असलेले रामराज्यही आले पाहिजे. ते दायित्व सर्वांचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. भय्याजी जोशी यांनी केले. ‘समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे’ यांच्या वतीने ७ एप्रिल या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात ‘वाल्मिकी रामायण – सुंदरकांड’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी स्वामी स्वरूपानंद सरस्वती, संस्थेचे अध्यक्ष श्री. शरद कुबेर उपस्थित होते. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे समर्थ रामदासस्वामींच्या हस्ताक्षरातील दुर्मिळ प्रतीचे हे संकलन आहे. यामध्ये श्‍लोकांचा मराठी आणि इंग्रजी भावार्थ देण्यात आला आहे.

श्री. भय्याजी जोशी पुढे म्हणाले, ‘‘समर्थ रामदासस्वामींनी केवळ दास मारूतीची नाही, तर हातात गदा घेतलेल्या आणि द्रोणागिरी उचललेल्या मारूतीचीही स्थापना केली. त्याप्रमाणे आपल्यातील वीरत्वही प्रकट झाले पाहिजे आणि अंतरंगात दास्यभाव असला पाहिजे. आपल्याकडे पूर्वापार देवासुर संग्राम चालत आला आहे; मात्र त्यामध्ये अंतिम विजय हा नेहमी देवांचाच झाला आहे. आपण पुनर्जन्म मानतो. बहुधा आपण त्रेतायुगातील वानरसेनेपैकीच एक असू.’’

प्रभु श्रीरामाच्या जीवनाचे अनुसरण करा ! – स्वामी स्वरूपानंद सरस्वती

प्रभु श्रीरामाची मातृभक्ती, पितृभक्ती, गुरुभक्ती, राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा यांची मीमांसा करून त्याचे अनुसरण करायला हवे. ‘यात काय, त्यात काय’, असे प्रश्‍न उपस्थित करून टीका करणे, हे अडाणीपणाचे लक्षण आहे. प्रभु श्रीराम हे आपल्या जीवनाचे अधिष्ठान झाले पाहिजे.

श्री. शरद कुबेर यांनी ग्रंथनिर्मितीचा उद्देश आणि प्रक्रिया यांविषयी अवगत केले. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘महाराज, पुन्हा कधी येणार’ हे भजन सादर केले.

श्री. प्रकाश पाठक, प्रा. देवेंद्र डोंगरे यांसह अनेक समर्थभक्त या प्रसंगी उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF