आचारसंहितेच्या नावाखाली…!

नोंद

सर्वसामान्य नागरिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, निवडणूक काळात एखाद्या व्यक्तीवर कोणी दबाव आणू नये, निर्भय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, हा आचारसंहितेचा मुख्य उद्देश आहे. असे असतांना सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशा घटना प्रतिदिन घडत आहेत. आचारसंहिता आणि निवडणुकीच्या कामाच्या नावाखाली कर्मचारी कामच करत नाहीत. अनेकजण कार्यालयात अनुपस्थित असतात. यामुळे संभाजीनगर जिल्हा परिषदेचे काम ठप्प झाले असल्याचे स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे सदस्य मधुकर वालतुरे यांनी निदर्शनास आणून दिले. आचारसंहितेच्या नावाखाली गेल्याच आठवड्यात उद्गीर(लातूर) येथील एका सराफ व्यापार्‍याकडून पोलिसांनीच दीड लाख रुपये लुबाडल्याची घटना घडली.

भूगर्भातील घटलेल्या पाणीपातळीने मराठवाड्याच्या घशाला कोरड पडली आहे. बीडमध्ये जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही. रोजगार हमी योजनेचे कोणतेच काम नाही. ग्रामीण भागातील शेतकरी जेव्हा तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयांत चारा छावणी, टँकरद्वारे पाणीपुरवठा यांविषयी विचारणा करायला जातो, तेव्हा त्याला ‘साहेब निवडणुकीच्या कामात आहेत’ हेच उत्तर मिळते. गंगापूर येथील तहसीलदार म्हणतात, ‘अजून थोडे थांबा, निवडणुकीची सिद्धता चालू आहे.’ अनेक ठिकाणचे कर्मचारी, अधिकारी निवडणुकीचे निमित्त करून कार्यालयात अनुपस्थित असल्याच्या बातम्या नियमित वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत आहेत. दुष्काळाची वस्तुस्थिती जाणून घ्यायला प्रशासनाकडे वेळ नाही. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते महेश गुजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यात चारा छावण्या उभारणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा, तात्काळ रोजगार उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्या आहेत. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना जनावरे मेल्यावर आणि शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यावर वेळ मिळणार का ?, असा संतप्त प्रश्‍न राष्ट्रीय किसान परिषदेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी विचारला आहे.

मुंबई महानगरपालिकेने १ एप्रिलपासून भटक्या मांजरांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र आचारसंहितेमुळे हा उपक्रम १ जूनपासून चालू करणार असल्याचे प्राणी कल्याण विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. प्राध्यापकांना निवडणुकीची कामे दिली गेल्याने या विद्यापिठांच्या परीक्षांसाठी पर्यवेक्षक मिळेनासे झाले आहेत. तासिका तत्त्वावरील प्राध्यापक हे दायित्व सांभाळत आहेत.

आचारसंहितेचा एवढा उदोउदो चालू असतांना राज्यभरात आचारसंहिता उल्लंघनाच्या २ सहस्रांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींवर निवडणूक आयोगाने काय कारवाई केली ?, हा संशोधनाचाच एक भाग आहे. या सर्व घटनांवरून आचारसंहितेची योग्य मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करून जनतेच्या कामांसाठी ती आड येणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव


Multi Language |Offline reading | PDF