श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री विठ्ठल बिरदेव यांचे रामनाथी आश्रमात शुभागमन झाल्यानंतर केलेले सूक्ष्म परीक्षण !

६ आणि ७ एप्रिल या दिवशी श्री क्षेत्र आप्पाची वाडी, कुर्ली (जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ यांचा यात्रोत्सव झाला. त्यानिमित्ताने…

‘श्री क्षेत्र आप्पाचीवाडी, कुर्ली (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री विठ्ठल बिरदेव यांचे २५.१.२०१९ या दिवशी सकाळी १०.३० वाजता सनातनच्या रामनाथी आश्रमात शुभागमन झाले. त्यानंतर दिवसभर झालेल्या विविध कार्यक्रमांचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत.

श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री विठ्ठल बिरदेव यांच्या मूर्तींसह १. पू. भगवान डोणे महाराज आणि भक्तगण यांचे आश्रमात आगमन होतांना

१. श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव या देवतांची मिरवणूक पहातांना मनाला उत्साह अन् आनंद जाणवणे

नागेशीपासून सनातनच्या रामनाथी येथील आश्रमापर्यंत ढोल आणि झांज वाजवणारे अन् देवतांचे मुखवटे घेतलेले भाविक मिरवणुकीत चालत होते. ही मिरवणूक पहातांना त्यामध्ये श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव या देवतांची चांगली शक्ती कार्यरत झाल्याचे जाणवले. देवतांच्या मुखवट्यांतून संपूर्ण मिरवणुकीमध्ये चैतन्याचा प्रवाह समुद्राच्या लाटांप्रमाणे प्रवाहित झाला होता. त्यामुळे मिरवणूक पहातांना मनाला उत्साह आणि आनंद जाणवत होता. मिरवणुकीच्या मार्गावर शक्ती आणि चैतन्य पसरल्यामुळे नागेशी पासून सनातन आश्रमाकडे येणार्‍या या मार्गाची शुद्धी झाली.

कु. मधुरा भोसले

२. ढोलांचा गजर (वालंग) होतांना कधी तारक, तर कधी मारक शक्ती जाणवणे

काही वेळा ढोलांचा गजर मारक स्वरूपाचा जाणवत होता, तर काही वेळा तो तारक जाणवत होता. जेव्हा तो मारक जाणवत होता, तेव्हा मारक नादलहरी वातावरणात प्रक्षेपित होऊन वातावरणातील भुते, राक्षस आणि हडळ यांसारख्या कनिष्ठ स्तरावरील वाईट शक्तींना मारक ध्वनी सहन न झाल्यामुळे त्या दूर जात होत्या. त्यामुळे भुते, राक्षस आणि हडळ यांसारख्या कनिष्ठ स्तरावरील वाईट शक्तींची बाधा झालेल्या व्यक्तींना होणारा वाईट शक्तींचा त्रास न्यून झाला. ढोलाचा नाद सलग ऐकल्यामुळे त्यातून प्रक्षेपित होणार्‍या मारक नादातील मारक शक्तीचा आघात देहातील सप्तचक्रे, नवद्वार आणि विविध इंद्रिये अन् अवयव यांमध्ये साठलेल्या काळ्या शक्तीच्या स्थानांवर झाला. त्यामुळे स्थूलदेह आणि सूक्ष्म कोश यांमध्ये साठलेल्या काळ्या शक्तीचे विघटन होऊन हलकेपणा जाणवला. वालंगच्या नादातून तारक शक्ती आणि भावाचे तरंग वातावरणात पसरून वातावरण भावमय झाले. त्यामुळे ढोलांचा गजर ऐकतांना अनेकांची भावजागृती झाली.

३. साधिकेने घोड्यावरून भात, हळद आणि लिंबू ओवाळून टाकणे

घोड्यामध्ये आकृष्ट झालेल्या श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव या देवतांच्या लहरींनी भात, हळद आणि लिंबू यांतील गंधलहरी घोड्याच्या माध्यमातून हुंगल्या अन् तो नैवेद्य सूक्ष्मातून ग्रहण केला. भाताचा सुगंध ग्रहण केल्यामुळे घोड्यामध्ये आपतत्त्वात्मक शक्ती कार्यरत झाली. हळदीच्या सुगंधामुळे त्याची सप्तचक्रे सक्रीय झाली आणि लिंबातील सुगंधामुळे त्याच्यामध्ये देवतेचे मारकतत्त्व कार्यरत झाले. घोड्यामध्ये आकृष्ट झालेल्या श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव या देवतांनी सूक्ष्मातून नैवेद्य ग्रहण केल्यामुळे ते संतुष्ट झाले. त्यानंतर घोड्यामध्ये आकृष्ट झालेल्या श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव या देवतांच्या आपतत्त्वात्मक लहरींचे रूपांतर वायूतत्त्वाच्या स्तरावरील लहरींमध्ये होऊन त्यांचे वातावरणात वेगाने प्रक्षेपण झाले आणि वातावरणातील त्रासदायक शक्तीचे उच्चाटन झाले.

४. पू. भगवान डोणे महाराज यांच्या एका भक्ताने आश्रमाच्या प्रवेशद्वारावर नारळ वाढवणे

पू. भगवान डोणे महाराज यांच्या एका भक्ताने आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नारळ वाढवला. तेव्हा आश्रमाच्या भोवती कार्यरत झालेली वायूमय काळी शक्ती नारळाकडे आकृष्ट झाली आणि नारळ वाढवल्यावर ती नष्ट झाली. नारळ वाढवतांना झालेल्या ‘फट्’ आवाजातून प्रक्षेपित झालेल्या मारक शक्तीमुळे आश्रमाभोवती वातावरणात जमलेली भुते, राक्षस आणि हडळ यांसारख्या कनिष्ठ स्तरावरील वाईट शक्ती दूर पळून गेल्या.

५. सनातनचे साधक श्री. अभिजीत विभूते यांनी आश्रमापासून दंडवत घालत घालत मिरवणुकीला सामोरे जाणे आणि देवतांना आश्रमात येण्यासाठी प्रार्थना करणे

सनातनचे साधक श्री. अभिजीत विभूते यांनी आश्रमापासून दंडवत घालत घालत ते मिरवणुकीला सामोरे गेले आणि त्यांनी श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव यांना ‘सनातनच्या आश्रमात यावे’, अशी विनवणी आणि प्रार्थना केली. त्यानंतर श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव यांसह भक्तांचे मंगलमय वातावरणात आश्रमात शुभागमन झाले. श्री. अभिजीत विभूते यांनी दंडवत घातल्यामुळे त्यांच्या सप्तचक्रांना भूमीचा स्पर्श होऊन त्यांची सप्तचक्रे आणि पंचप्राण सक्रीय झाले. त्यामुळे त्यांची सुषुम्नानाडी चालू झाली आणि त्यांच्यामध्ये भावऊर्जा प्रवाहित झाली. त्यामुळे त्यांच्याकडून देवतांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना झाली आणि देवतांनी त्यांच्या भावाचा मान राखून आश्रमात प्रवेश केला.

६. भूमीवर साष्टांग दंडवत घातलेले सनातनचे साधक श्री. अभिजीत विभूते यांंना ओलांडून श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव, पू. भगवान डोणे महाराज आणि मुरारी पुजारी यांंनी आश्रमात प्रवेश करणे

श्री. अभिजीत विभूते हे भूमीवर दंडवत घातलेल्या मुद्रेत असतांना त्यांच्या भोवती भूमीतत्त्वाच्या लहरी कार्यरत झाल्या होत्या. श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव, पू. भगवान डोणे महाराज आणि मुरारी पुजारी यांंनी साधक श्री. अभिजीत विभूते यांंना ओलांडून आश्रमात प्रवेश केल्यामुळे देवतांमध्ये कार्यरत झालेल्या शक्तीने भूमीतत्त्वाला ओलांडले आणि ती शक्ती वायूतत्त्व स्तरावर कार्यरत झाली.

७. श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव आणि पू. भगवान डोणे महाराज यांचे आश्रमात आगमन होतांना प्रवेशद्वाराशी सुवासिनींनी त्यांच्या चरणांवर जल घातल्यावर झालेली सूक्ष्म प्रक्रिया

श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव आणि पू. भगवान डोणे महाराज यांचे आश्रमात आगमन होतांना प्रवेशद्वाराशी सुवासिनींनी त्यांच्या चरणांवर जल घातले. पाण्यामध्ये कार्यरत झालेली तारक शक्ती आणि आपतत्त्वानेयुक्त असणार्‍या चैतन्यलहरी यांचा स्पर्श श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव आणि पू. भगवान डोणे महाराज यांच्या चरणांना झाला. त्यामुळे त्यांच्या चरणांतून प्रक्षेपित होणार्‍या मारक शक्तीच्या प्रवाहाचे रूपांतर तारक शक्तीच्या प्रवाहात झाले अन् साधकांना त्यांचे कृपाशीर्वाद लाभले.

८. सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव, पू. भगवान डोणे महाराज आणि मुरारी पुजारी यांची पाद्यपूजा करून त्यांना फुलांचा हार घातल्यावर झालेली सूक्ष्म प्रक्रिया

सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव, पू. भगवान डोणे महाराज आणि मुरारी पुजारी यांची पाद्यपूजा आश्रमाच्या प्रवेशद्वारावर करून त्यांना फुलांचा हार घातला. पाद्यपूजनाच्या वेळी श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव, पू. भगवान डोणे महाराज आणि मुरारी पुजारी यांच्यामध्ये देवतांच्या तत्त्वलहरी अधिक प्रमाणात कार्यरत झाल्या होत्या आणि त्यांच्या चरणांतून प्रक्षेपित होणार्‍या पृथ्वीतत्त्वाच्या लहरींमुळे भूमीची, आपतत्त्वाच्या लहरींमुळे भूमी लगतच्या पट्ट्याची, तेजोलहरींमुळे उपस्थित साधकांची आणि वायूलहरींमुळे आश्रमाच्या सभोवतालच्या वातावरणाची शुद्धी झाली.

९. देवाच्या अश्‍वाचे पूजन केल्यामुळे त्याच्यामध्ये सुप्तावस्थेत असणारी देवतेची शक्ती प्रकट होऊन कार्यरत होणे

देवाच्या अश्‍वाचेही त्याच्या कपाळावर फूल इत्यादी वाहून पूजन करण्यात आले. देवाच्या अश्‍वाचे त्याच्या कपाळावर फूल इत्यादी वाहून पूजन केल्यामुळे त्याचे आज्ञाचक्र कार्यरत होऊन त्याच्यामध्ये सुप्तावस्थेत असणारी देवतेची शक्ती प्रकट होऊन कार्यरत झाली. त्यामुळे अश्‍वातून संपूर्ण वातावरणात तेजोमय दिव्य लहरी आणि प्रगट शक्ती यांचे प्रक्षेपण झाले अन् अश्‍वामध्ये कार्यरत झालेल्या श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव या देवतांच्या तत्त्वलहरींचा लाभ साधकांना होऊन त्यांना देवतांचे कृपाशीर्वाद लाभले.

१०. आश्रमात देवतांची स्थापना करून त्यांचे पूजन करणे

पू. भगवान डोणे महाराज यांच्या हस्ते देवतांच्या मूर्तींची पूजा करण्यात आली. उसाच्या मखरात देवतांची स्थापना केल्यानंतर कडाकणी, कुरडया, पापड्या, बुंदीचे लाडू आणि करंजी यांच्या माळा बांधण्यात आल्या होत्या. देवतांच्या गंधलहरी कडाकणी, कुरडया, पापड्या, बुंदीचे लाडू आणि करंजी यांच्यामध्ये आकृष्ट होऊन त्या पृथ्वी आणि आप या तत्त्वांच्या स्तरांवर कार्यरत झाल्या. त्यामुळे या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये दैवी गंध आणि दैवी रस कार्यरत झाला. उसाच्या मखरामध्ये देवतांचे तेज आणि वायू या स्तरांवरील चैतन्य कार्यरत होऊन ते कारंज्याप्रमाणे वातावरणात प्रवाहित झाले. त्यानंतर पू. भगवान डोणे महाराज यांनी श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव यांची आरती केली. तेव्हा देवतांच्या मुखवट्यातून संपूर्ण वातावरणात दैवी प्रकाशकिरण प्रक्षेपित झाले आणि वातावरण भावमय अन् आनंदी झाले.

११. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव आणि पू. भगवान डोणे महाराज यांना नमस्कार केल्यावर झालेली सूक्ष्म प्रक्रिया

अत्यंत शारीरिक त्रास होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव यांचे भावपूर्ण दर्शन घेतले. श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्यातील समस्त अडथळे दूर होऊन अवतारी कार्य वेगाने संपन्न होण्याचा कृपाशीर्वाद दिला. तेव्हा श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव यांच्या मुखवट्यातून केशरी रंगाचा प्रकाशकिरणांचा झोत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनाहतचक्राकडे गेले. पू. भगवान डोणे महाराज यांच्यातील दैवी ऊर्जा आणि चैतन्य यांचा पिवळ्या रंगाचा झोत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आज्ञाचक्राकडे जातांना जाणवला. अशा प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देवतांचे आशीर्वाद लाभले.

१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अश्‍वाला स्पर्श करून त्याला केळे भरवल्यावर त्यांच्यातील शक्ती आणि चैतन्य यांचे अश्‍वामध्ये संक्रमण होऊन त्याला सूक्ष्मातून दैवी कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळ प्राप्त होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अश्‍वाला स्पर्श करून त्याला केळे भरवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील शक्ती आणि चैतन्य यांचे संक्रमण अश्‍वामध्ये झाले अन् त्याला सूक्ष्मातून दैवी कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळ प्राप्त झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अश्‍वाला केळे भरवल्यावर अश्‍वामध्ये सूक्ष्म रूपाने असणार्‍या श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव या देवतांनी संतुष्ट होऊन सनातनच्या साधकांना ‘ईश्‍वरी कार्य आणि साधकांची साधना यांच्या वृद्धीसाठी अश्‍वाप्रमाणे पुष्कळ दैवी बळ मिळेल’, असा आशीर्वाद दिला.

१३. देवाच्या चरणी सादर केलेल्या विविध कला आणि त्यांचे सूक्ष्मातील परिणाम

देवाला आळवण्यासाठी भक्तगणांनी धनगर गाणी, समई नृत्य, गजी नृत्य, गोफ नृत्य, भारूड आणि भजनसेवा सादर केली.

१३ अ. धनगर गाणी : धनगर गीतांतून भोळा भाव व्यक्त झाला आणि कनिष्ठ स्तरावरील शक्ती कार्यरत झाली.

१३ आ. समई नृत्य : नृत्य सादर करणार्‍या भक्तांच्या समर्पित भावामुळे त्यांच्या नृत्यातून तेजतत्त्वाच्या स्तरावरील देवाच्या शक्तीचे वातावरणात प्रक्षेपण होऊन वातावरण सात्त्विक आणि तेजस्वी झाले.

१३ इ. गजी नृत्य : गजी नृत्य सादर करणार्‍या भक्तांच्या मनातील विविध भाव नृत्यातील मुद्रा आणि हावभाव यांतून व्यक्त झाले अन् दैवी शक्ती अल्प प्रमाणात कार्यरत झाली.

१३ ई. गोफ नृत्य : गोफ नृत्य सादर करतांना भक्तांच्या मनातील विविध भाव नृत्यातील मुद्रा आणि हावभाव यांतून व्यक्त झाले. हे नृत्य सादर करतांना सादर करणार्‍यांच्या भोळ्या भावामुळे त्यांच्याकडून जलद गतीने होणार्‍या कृतींमुळे दैवी शक्ती वायूतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत झाली.

१३ उ. भारूड आणि भजनसेवा : भारूड आणि भजनसेवा यांतून भक्तांच्या मनातील कृतज्ञता आणि शरणागत भाव देवाच्या चरणी अर्पण झाला अन् देवाने त्यांना कृपाशीर्वाद दिला.

१४. साधकांनी आंबिल आणि जल यांचे तीर्थ प्राशन केल्यामुळे त्यांना आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ होणे

९ सुवासिनींनी डोक्यावरून आणलेल्या कलशातील आंबिल आणि जल पूजेतील देवासमोर ठेवले. त्यानंतर घागरींतील आंबिल आणि जल साधक अन् भक्तगण यांना तीर्थ म्हणून देण्यात आले. आंबिलमधील देवतांची मारक शक्ती आणि सगुण तत्त्व आकृष्ट झाले होते. घागरींतील जलामध्ये देवतांचे निर्गुणतत्त्व आणि तारक शक्ती आकृष्ट झाली होती. साधकांनी आंबिल आणि जल यांचे तीर्थ प्राशन केल्यामुळे त्यांना आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ झाला. आंबिलमधील मारक शक्तीमुळे साधकांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांतील काळ्या शक्तीचे विघटन झाले आणि जलातील तारक शक्ती अन् निर्गुण तत्त्व यांमुळे साधकांच्या देहातील नाड्यांची शुद्धी होऊन त्यांचा पिंड सात्त्विक झाला.

१५. श्री हालसिद्धनाथांच्या भक्तांनी भावपूर्णरित्या आणि उत्स्फूर्तपणे ढोल अन् झांज या वाद्यांचा गजर संपूर्ण दिवसभर केल्यामुळे झालेले लाभ

श्री हालसिद्धनाथांच्या भक्तांनी भावपूर्णरित्या आणि उत्स्फूर्तपणे ढोल अन् झांज या वाद्यांचा गजर केला. त्यामुळे संपूर्ण दिवसभर आश्रमातील सभागृहामध्ये श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव यांची शक्ती अन् चैतन्य यांच्या लहरी वातावरणात कार्यरत झाल्या अन् वातावरण, तसेच साधकांचा पिंड यांची शुद्धी झाली.

१६. पू. भगवान डोणे महाराज श्री हालसिद्धनाथांची भाकणूक सांगत असतांना जाणवलेली सूक्ष्म प्रक्रिया

त्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास पू. भगवान डोणे महाराज यांच्यामध्ये श्री हालसिद्धनाथ यांचा भार आल्यानंतर त्यांनी भाकणूक केली. तेव्हा त्यांच्या सहस्रारचक्रावर पिवळ्या रंगाचा प्रकाशझोत पडलेला दिसला. या प्रकाशझोतामुळे त्यांचे मन आणि बुद्धी यांवर ईश्‍वरी शक्तीने नियंत्रण मिळवले आणि त्यांच्या मनामध्ये विश्‍वमन आणि बुद्धीमध्ये विश्‍वबुद्धी यांतील विचार येऊ लागले. श्री हालसिद्धनाथ या सिद्धपुरुषांच्या कृपेने पू. डोणे महाराज यांना काही काळासाठी दिव्य दृष्टी प्राप्त होऊन त्यांना काळाचा पडदा ओलांडून भविष्यातील घटना सुस्पष्ट दिसत होता. त्यांना सूक्ष्मातून दिसणारे दृश्य विचारांच्या रूपाने त्यांच्या बुद्धीमध्ये कार्यरत होऊन त्याचे रूपांतर शब्दांमध्ये होऊन ते शब्द भविष्यकथनाच्या रूपाने त्यांच्या वाणीतून प्रगट होत होते. अशा प्रकारे पू. डोणे महाराजांकडून श्री हालसिद्धनाथांनी भाकणूक सांगितली.

१७. पू. भगवान डोणे महाराजांनी साधकांच्या कपाळाला भंडारा (हळद) लावल्यावर झालेली सूक्ष्म प्रक्रिया

पू. भगवान डोणे महाराज यांच्यामध्ये श्री हालसिद्धनाथांची दैवी शक्ती कार्यरत असल्यामुळे त्यांनी लावलेल्या हळदीच्या माध्यमातून साधकांच्या आज्ञाचक्राला दैवी शक्तीचा स्पर्श होऊन त्यांचे आज्ञाचक्र जागृत होते आणि त्यांनी लावलेल्या भंडार्‍यातील (हळदीतील) सात्त्विकता आणि शक्ती आज्ञाचक्रातून साधकांच्या देहामध्ये प्रविष्ट होते. त्यामुळे साधकांची सप्तचक्रे, नवद्वारे, विविध इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहं यांची शुद्धी होऊन ते सात्त्विक बनतात. जेव्हा पू. भगवान डोणे महाराज साधकांना भंडारा लावत होते, तेव्हा त्यांच्या ठिकाणी ऋषींप्रमाणे रूप असणार्‍या श्री हालसिद्धनाथ यांचे दर्शन होत होते आणि त्यांच्याभोवती प्रीतीची गुलाबी, भावाची निळी आणि चैतन्याची पिवळी आभा निर्माण झाल्याचे दिसले.

१८. पू. भगवान डोणे महाराज यांच्या भक्तांनी सभागृहात भंडारा उधळल्यामुळे वातावरणाची शुद्धी होणे

दिवसभराच्या कार्यक्रमात पू. भगवान डोणे महाराज यांच्या भक्तांनी मधेमधे सभागृहात भंडारा उधळला. भंडार्‍यातील तारक-मारक शक्ती आणि सगुण चैतन्य यांच्या लहरींची उधळण वातावरणात होऊन संपूर्ण वातावरणाची शुद्धी झाली. भंडार्‍यातील चैतन्यदायी गंधलहरी वातावरणात पसरल्यामुळे अनेक साधकांची प्राणशक्ती वाढली आणि मनाला उत्साह जाणवला.

१९. कार्यक्रमाला अनेक साधक, संत आणि सद्गुरु यांची वंदनीय उपस्थिती लाभणे

कार्यक्रमाला साधकांसमवेत सनातनचे अनेक संत आणि सद्गुरु यांची वंदनीय उपस्थिती लाभली. साधकांमधील उत्कट भाव, संतांमधील आर्तभाव, सद्गुरूंमधील समर्पित भाव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील शरणागत भाव श्री हालसिद्धनाथ आणि श्री विठ्ठल बिरदेव यांच्या चरणी पोहोचला. त्यामुळे त्यांनी सूक्ष्मातून आणि पू. भगवान डोणे महाराज यांच्यामध्ये प्रगट होऊन स्थुलातून सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांना, तसेच समस्त साधक यांना कार्यवृद्धी, साधनावृद्धी अन् सर्वंकष उत्कर्ष यांचा भरभरून आशीर्वाद दिला.

कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे देवा, तुम्हीच श्री हालसिद्धनाथ, श्री विठ्ठल बिरदेव आणि पू. भगवान डोणे महाराज यांच्या रूपाने आश्रमात आलात आणि आम्हाला दर्शन, मार्गदर्शन, सत्संग आणि प्रसाद देऊन आम्हा सर्व साधकांवर तुमच्या कृपेचा भरभरून वर्षाव केला, यासाठी आम्ही तुझ्या श्रीचरणी समर्पित भावाने कृतज्ञता व्यक्त करतो. ‘आपली कृपादृष्टी आम्हा साधकांवर अशीच अखंड राहू दे’, हीच तुझ्या पावन चरणी प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१.२०१९)

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

 


Multi Language |Offline reading | PDF