गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या प्रासादिक पादुकांचे सनातनच्या आश्रमात आगमन

चराचरीं व्यापकता जयाची । अखंड भेटी मजला तयाची ।
परं पदीं संगम पूर्ण झाला । विसरू कसा मी गुरुपादुकांना ॥

पादुकापूजन करतांना १. श्री. प्रकाश मराठे, २. श्री. ईशान जोशी, ३. श्री. अमर जोशी

रामनाथी (गोवा) – गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ ! या मंगल पर्वावर अर्थात ६ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुरु तथा सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या पणजी (गोवा) येथील भक्त श्रीमती स्मिता राव यांच्याकडील चरणपादुकांचे आगमन झाले. वर्ष २०२३ मध्ये संतांच्या संकल्पाने स्थापन होणार्‍या हिंदु राष्ट्राला आशीर्वाद देण्यासाठीच जणू प.पू. बाबांचे तत्त्व पादुकांच्या रूपाने सनातन आश्रमात अवतरले आहे. गुढीपाडव्याच्या शुभदिनीच हा दुग्धशर्करायोग जुळून आल्यामुळे ‘आगामी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प.पू. बाबांनी साधकांना आश्‍वस्त केले आहे’, असे साधकांना जाणवले.

संत भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या प्रासादिक चरणपादुका

पणजी (गोवा) येथील भक्त श्रीमती स्मिता राव यांना प.पू. बाबांनी प्रसादस्वरूपात दिलेल्या त्यांनी स्वतः वापरलेल्या पादुकांचे (चप्पल) दुपारी ४.३० वाजता आश्रमात आगमन झाले. सनातनचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी प्रवेशद्वारावर पादुकांचे औक्षण केले. त्यानंतर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पादुकांचे षोडशोपचार पूजन करण्यात आले. सनातनचे पुरोहित श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी यांनी या पूजेचे पौरोहित्य केले. आश्रमातील ध्यानमंदिरात या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. या पादुकापूजन सोहळ्याचा लाभ सनातनचे आणि एसएसआरएफचे सद्गुरु, तसेच संत आणि आश्रमातील साधक यांनी घेतला.

संत भक्तराज महाराज यांच्या पादुका हातात घेतलेल्या श्रीमती स्मिता राव

क्षणचित्र : रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पादुकांची स्थापना करतांना प.पू. बाबांच्या प्रतिमेला घातलेला पुष्पहार ३ वेळा वाढला. दोन वेळा ‘तो पुष्पहार उजव्या बाजूने खाली आला आहे’, असे वाटून साधकांनी नीट केला, तरी तिसर्‍याही वेळी हाराची उंची उजव्या बाजूने वाढल्याचे साधकांच्या लक्षात आले.


Multi Language |Offline reading | PDF