‘मोफत नेत्र तपासणी शिबिरा’च्या नावाखाली ‘शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता भासवून कशा प्रकारे फसवणूक केली जाते ?’ याविषयी साधकाला आलेला कटू अनुभव !

श्री. कोंडिबा जाधव

१. वृत्तपत्रात ‘ठाणे येथे मोफत नेत्र तपासणी केली जाणार’, असे विज्ञापन वाचून नेत्र तपासणीसाठी जाणे आणि तेथील आधुनिक वैद्यांनी मोतीबिंदू असण्याची शक्यता वर्तवून पुन्हा बोलवणे

‘मी वर्ष २०१६ मध्ये एका वृत्तपत्रात ‘ठाणे येथे मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे’, असे विज्ञापन वाचले. मी त्या ठिकाणी नेत्र तपासणीसाठी गेलो, तर तिथे पुष्कळ गर्दी होती. बरेच वयस्कर लोक रांगेत उभे होते. रांगेत माझा क्रमांक १०० च्याही पुढे होता. आरंभी त्यांनी नाव, पत्ता, वय, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती घेऊन एक अर्ज भरून घेतला. नंतर मला एका आधुनिक वैद्यांनी परत परत तपासलेे आणि सांगितले, ‘‘तुम्हाला मोतीबिंदू असण्याची शक्यता आहे. तुम्ही दोन दिवसानंतर पुन्हा या. आपण आणखी तपासणी करू.’’

२. दोन दिवसांनंतर पुन्हा तपासणीसाठी गेल्यावर नेत्रतज्ञांनी मोतीबिंदू झाल्याचे सांगणे आणि सवलतीच्या दरातील शस्त्रकर्माचा खर्च सांगून ‘शस्त्रकर्म करून घ्या’, म्हणून मागे लागणे अन् साधकाने काहीतरी कारण सांगून तिथून सुटका करून घेणे

दोन दिवसांनंतर मी पुन्हा तपासणीसाठी गेलो. तेव्हा नेत्रतज्ञांनी माझे दोन्ही डोळे तपासून सांगितले, ‘‘तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. सध्या आमची एक योजना चालू आहे. तिच्यामध्ये वयस्कर व्यक्तींकरता १० टक्के सवलत आहे.’’ त्यांनी भारतीय ‘लेन्स’चे २ प्रकार सांगितले. एका डोळ्याचे भारतीय ‘लेन्स’ वापरून शस्त्रकर्म करण्याचा खर्च १८ किंवा २५ सहस्र रुपये अन् विदेशी ‘लेन्स’साठी ३५ सहस्र रुपये होता. ते म्हणाले, ‘‘आता ‘अपॉईंटमेंट’ घ्या आणि इथे शस्त्रकर्म करून घ्या.’’ मी त्यांना सांगितले, ‘‘मी पैशाची व्यवस्था करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो.’’ ते म्हणाले, ‘‘आता १ सहस्र रुपये भरा. शस्त्रकर्माच्या वेळी तेवढे वजा करू.’’ मी त्यांना खोटेच सांगितले, ‘‘माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ‘मोफत शिबीर’ असे वाचून तुमच्याकडून काही साहाय्य मिळेल; म्हणून मी येथे आलो होतो. तुम्ही १० टक्के सवलत देत आहात, तर मी पैशाची जमवाजमव करून इथे येऊन शस्त्रकर्म करून घेईन; परंतु आता मी पैसे भरू शकत नाही.’’ असे बोलून मी तिथून माझी सुटका करून घेतली.

३. शस्त्रकर्म झालेल्या परिचितांकडून मोतीबिंदू झाल्याची लक्षणे समजून घेणे, तसेच दुसर्‍या नेत्रतज्ञाचे मत घेण्यासाठी त्यांच्याकडून डोळे तपासून घेणे आणि त्यांनी ‘मोतीबिंदूची काहीच लक्षणे नाहीत’, असे सांगून निश्‍चिंत करणे

नंतर मी मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झालेल्या माझ्या परिचितांना भेटलो आणि ‘मोतीबिंदू झाल्यास लक्षणे काय असतात ?, तसेच डोळ्यांची स्थिती काय असते ?’, ते समजून घेतले. तशी कोणतीच लक्षणे मला जाणवत नव्हती, तरीही पूर्ण निश्‍चिती करण्यासाठी मी माझ्या मित्राच्या जावयाच्या नेत्र रुग्णालयात डोळे तपासण्यासाठी गेलो. मी त्यांना शिबिरातील काहीही सांगितले नाही. त्यांनी डोळे तपासले आणि उपनेत्राचा (चष्म्याचा) नंबर काढून दिला. मी त्यांना विचारले, ‘‘मोतीबिंदूची लक्षणे नाहीत ना ? ते म्हणाले, ‘‘आम्ही ‘वयस्कर लोकांना मोतीबिंदू आहे का ?’, याची तपासणी अगोदर करतो. तुमच्या डोळ्यांत तशी कोणतीच लक्षणे नाहीत. त्यामुळे काही चिंता करू नका.’’ त्यांनी मला ‘मोतीबिंदूची लक्षणे कोणती असतात ?’, ते सांगितले.

४. दोन नेत्रतज्ञांकडून डोळे तपासणी करून ‘मोतीबिंदूची लक्षणे आहेत का ?’, याची निश्‍चिती केल्यावर ‘मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या नावाखाली वयस्कर लोकांची कशी फसवणूक केली जाते’, हे लक्षात येणे

यानंतर मी रामनाथी आश्रमात आलो. नंतर दीड वर्षाने आश्रमात कुडाळ येथील सनातनचे साधक डॉ. सामंत यांच्याकडून डोळे तपासून घेतले. त्या वेळी त्यांनी ‘‘मोतीबिंदूची कोणतीच लक्षणे नाहीत’’, असे मला सांगितले. त्यानंतर फोंडा, गोवा येथे १ वर्षाने डोळे तपासले, तर त्यांनीही ‘मोतीबिंदूची कोणतीच लक्षणे नाहीत’, असे सांगितले. वर्ष २०१६ पासून आजअखेर तरी मोतीबिंदूची कोणतीच लक्षणे माझ्या डोळ्यांत नाहीत. यामुळे ‘मोफत नेत्र तपासणी शिबिरा’च्या नावाखाली वयस्कर लोकांची कशी फसवणूक केली जाते ?’, हे लक्षात आले.’

– श्री. कोंडिबा जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२.३.२०१९)

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !

आरोग्य साहाय्य समिती

वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच परिसरात अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.

चांगल्या डॉक्टरांना आणि परिचारिकांना नम्र विनंती

पैसे लुबाडणार्‍या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया साहाय्य करा. ही तुमची साधना असेल. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल.

आपले अनुभव कळवण्यासाठी पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]

 


Multi Language |Offline reading | PDF