‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या मार्च २०१९ मधील ज्योतिष कार्याचा आढावा !

‘भविष्यात डोकावून पहाण्याची क्षमता असेलेले, तसेच एखाद्या अनाकलनीय घटनेमागील कारणमीमांसा उलगडून दाखवणारे ‘ज्योतिषशास्त्र’ हे एकमेव शास्त्र आज मानवाकडे उपलब्ध आहे. ‘ज्योतिषशास्त्र’ ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. ज्योतिषशास्त्र हे १४ विद्यांपैकी एक आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’द्वारे १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण आध्यात्मिक परिभाषेतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे या शाखांचे आपोआप जतन होईल. ज्योतिषशास्त्राच्या संवर्धनासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ज्योतिषशास्त्रात संशोधन कार्य चालू आहे. या संशोधन कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे संशोधन आध्यात्मिक विषयांवर होत आहे. या संशोधन कार्याला सर्वत्रच्या ज्योतिषांचे साहाय्य लाभावे, तसेच त्यांनी साधनेस प्रवृत्त व्हावे, यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’द्वारे विविध राज्यांतील ज्योतिषांच्या भेटी घेतल्या जात आहेत. मार्च २०१९ या मासातील ज्योतिष कार्याचा आढावा पुढे दिला आहे.

सौ. प्राजक्ता जोशी

१. मार्च २०१९ मध्ये चंडीगड येथील ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष महासंमेलना’मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘अचूक भविष्य वर्तवण्यासाठी ज्योतिषांनी नित्य साधना करणे आवश्यक !’ हा विषय प्रस्तुत

चंडीगड येथे २२, २३ आणि २४ मार्च २०१९ या कालावधीत श्रीमुख ज्योतिष संस्थानकडून ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष महासंमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. त्यात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने सहभाग घेतला. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी २३.३.२०१९ या दिवशी संमेलनात ‘अचूक भविष्य वर्तवण्यासाठी ज्योतिषांनी नित्य साधना करणे आवश्यक !’ हा विषय प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी उपस्थित ज्योतिषी आणि ज्योतिषप्रेमी यांना साधनेचे महत्त्व विशद केले. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ज्योतिष फलित विशारदसौ. प्राजक्ता जोशी यांनी या विषयाचे लेखन केले आहे.

१ अ. चंडीगड येथील आंतरराष्ट्रीय ज्योतिष महासंमेलनात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने प्रस्तुत केलेल्या विषयाचे वृत्त ‘दैनिक अटल सवेरा’ या गुजराती नियतकालिकात, ‘दैनिक महाराष्ट्र सम्राट’ या मराठी नियतकालिकात, ‘दैनिक सामना टाईम्स’ या हिंदी नियतकालिकात आणि ‘मिस्टिक पावर’ या हिंदी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले.

श्री. राज कर्वे

२. मार्च २०१९ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण घटनांच्या संदर्भात केलेले ज्योतिषशास्त्रीय संशोधन

अ. ‘श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिकाधिक आकृष्ट व्हावे’, यासाठी १८.२.२०१९ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षि भृगु यांच्या आज्ञेने कमलपिठाची स्थापना करण्यात आली. या दैवी घटनेसंबंधी ज्योतिषशास्त्रीय संशोधन करण्यात आले. हे संशोधन ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये २.३.२०१९ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले.

आ. देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करणारे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ३.३.२०१९ या दिवशी देहत्याग केला. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आलेले मोठे मृत्यूसंकटरूपी गंडांतर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी स्वतःवर घेतले’, असे मयन महर्षि यांनी ३.३.२०१९ या दिवशी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन्जी यांच्या माध्यमातून सांगितले. या घटनेसंबंधी ज्योतिषशास्त्रीय संशोधन करण्यात आले. हे संशोधन ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये १३.३.२०१९ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले.

३. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिर्विद डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्याकडून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विविध कार्यक्रम सादर !

ब्रह्मध्यान कार्यक्रमात ध्यानासंबंधी तात्विक माहिती सांगताना डॉ. मधुसूदन घाणेकर

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिर्विद डॉ. मधुसूदन घाणेकर (वय ६३ वर्षे) आणि त्यांची पत्नी सौ. मेघना घाणेकर यांनी २७.३.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमास सदिच्छा भेट दिली. डॉ. घाणेकर यांनी आश्रमात ‘ब्रह्मध्यान’, ‘स्वाक्षरीवरून स्वभाव-वैशिष्ट्ये’ आणि ‘सबकुछ मधुसूदन’ हे कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमांचे स्वरूप थोडक्यात पुढे दिले आहे.

३ अ. ब्रह्मध्यान : या कार्यक्रमात डॉ. घाणेकर यांनी आरंभी ध्यानासंबंधी तात्त्विक माहिती दिली. ‘मनुष्याने नेहमी सकारात्मक आणि आनंदी असायला हवे, त्यामुळे तो कठीण प्रसंगांना सहजतेने सामोरा जाऊ शकतो’, असा संदेश त्यांनी या वेळी दिला. तसेच ‘ब्रह्मध्यानाद्वारे मनात येणारे नकारात्मक विचार थांबवता येतात’, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी ‘ध्यान कसे लावावे’, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्या वेळी काही साधकांनी ‘मन निर्विचार होणे, शरीर हवेत तरंगल्यासारखे वाटणे, सूक्ष्मातून श्‍वेत प्रकाश दिसणे’, अशा वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्याचे सांगितले.

३ आ. स्वाक्षरीवरून स्वभाव-वैशिष्ट्ये सांगणे : स्वाक्षरीवरून स्वभाव-वैशिष्ट्ये सांगण्यात डॉ. घाणेकर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. ‘मनुष्याची प्रकृती त्याच्या स्वाक्षरी करण्याच्या पद्धतीवरून लक्षात येते. त्याच्या मनातील भावना त्याच्या हस्ताक्षरात उमटतात’, असे डॉ. घाणेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात डॉ. घाणेकर यांनी साधकांच्या स्वाक्षरीवरून त्यांची स्वभाव-वैशिष्ट्ये सांगितली. त्यांनी सांगितलेली बहुतांश वैशिष्ट्ये संबंधित साधकांमध्ये आढळून आली.

३ इ. ‘सबकुछ मधुसूदन’ : डॉ. घाणेकर हे ‘सबकुछ मधुसूदन’ हा एकपात्री कार्यक्रम सादर करतात. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘सबकुछ मधुसूदन’ हा कार्यक्रम सादर करतांना डॉ. घाणेकर यांनी आरंभी १ ते ९ भाग्यांक असणार्‍या व्यक्तींची स्वभाव-वैशिष्ट्ये सांगितली. अमुक भाग्यांक असणार्‍या व्यक्तीला कोणता वार आणि कोणता रंग अनुकूल असतो, हेही त्यांनी सांगितले. डॉ. घाणेकर हे शीळ (शिट्टी) वाजवून गाणी म्हणण्यात प्रसिद्ध आहेत. कार्यक्रमात त्यांनी काही गाणी शीळ वाजवून म्हटली. कार्यक्रमाच्या शेवटी निखळपणे हसणार्‍या साधकांना त्यांनी ‘लाफ इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड्स’ प्रदान केले.

४. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या ज्योतिष कार्याला मिळालेला प्रतिसाद

४ अ. सोलापूर येथील श्री. लक्ष्मीकांत कोल्हापुरे यांनी ‘कालनियोजन’ हे त्यांचे ज्योतिष विषयक मासिक ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला विनामूल्य पाठवण्यास चालू केले.

४ आ. सातारा येथील श्री. विनोद भंडारे यांनी कुंडल्यांचा संग्रह ठेवण्यासाठी मोठ्या आकाराच्या आखीव वह्या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला अर्पण केल्या.’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद) आणि श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF