‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या मार्च २०१९ मधील संशोधन कार्याचा आढावा !

पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून निघणार्‍या द्रवाचे (चरण तीर्थाचे) केले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘आजकाल अनेक लोकांचा संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्‍वास असतो. त्यामुळे वर्ष २०१४ पासून ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातूनही संशोधन करण्यात येत आहे. ‘हिंदु धर्मातील आचार, धार्मिक कृती, सामाजिक कृती (उदा. दीप प्रज्वलन, उद्घाटन इत्यादी), यज्ञ, अनुष्ठान, मंत्रपठण इत्यादी विषयांचे आध्यात्मिक महत्त्व आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत समाजाला समजावून सांगणे’, हा या संशोधनाचा उद्देश आहे. यासाठी ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग’, ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.टी.एस्.)’, ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पिप)’, ‘थर्मल इमेजिंग’, ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’ इत्यादी आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि प्रणाली यांचे साहाय्य घेण्यात येत आहे. या संशोधन कार्याला पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्ञानाची, म्हणजे सूक्ष्म परीक्षणाची जोड देऊन विश्‍लेषण करण्यात येत आहे. या संशोधन कार्याचा मार्च २०१९ या मासातील आढावा येथे देत आहोत.

(भाग १)

श्री. शॉन क्लार्क

१. मार्च २०१९ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.टी.एस्.)’ या यंत्राच्या साहाय्याने एकूण १४५ प्रयोगांतर्गत केलेल्या ३०७ चाचण्यांमध्ये ४५६ घटक/सहभागी व्यक्ती यांच्या एकूण ६३३ मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

१ अ. ‘प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजण्यांच्या नोंदी’ या संज्ञांचे अर्थ : या संज्ञांचे अर्थ ‘सात्त्विक आणि असात्त्विक नक्षी असलेल्या सोन्याच्या अलंकारांचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम’ अभ्यासण्यासाठी केलेल्या एका प्रयोगाचे उदाहरण घेऊन त्यातून आपण समजून घेऊया. या प्रयोगात वाईट शक्तींचा त्रास असलेल्या ५ साधिका आणि वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या ५ साधिका सहभागी झाल्या होत्या. या प्रयोगाच्या संदर्भात ‘प्रयोग, चाचण्या, घटक आणि मोजण्यांच्या नोंदी’ या संज्ञांचे अर्थ पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ १. प्रयोग : प्रयोगातील प्रत्येक साधिकेने सात्त्विक नक्षी असलेला हार आणि असात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी अन् घातल्यानंतर वरील सारणीमध्ये दिलेल्या यंत्रांपैकी एका यंत्राद्वारे (उदा. ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे) केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. हा एक प्रयोग झाला.

१ अ २. चाचण्या : या एका प्रयोगात ‘सात्त्विक नक्षी असलेल्या हाराचा परिणाम अभ्यासणे’ आणि ‘असात्त्विक नक्षी असलेल्या हाराचा परिणाम अभ्यासणे’, अशा २ चाचण्या आहेत.

१ अ ३. घटक : या प्रयोगामध्ये वाईट शक्तींचा त्रास असलेल्या ५ साधिका आणि वाईट शक्तींचा त्रास नसलेल्या ५ साधिका अशा एकूण १० साधिका, म्हणजे १० घटक आहेत.

१ अ ४. मोजण्यांच्या नोंदी : या प्रयोगामध्ये प्रत्येक साधिकेच्या संदर्भात तिने सात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी आणि घातल्यानंतर, तसेच असात्त्विक नक्षी असलेला हार घालण्यापूर्वी अन् घातल्यानंतर, अशा प्रकारे यंत्राद्वारे केलेल्या मोजण्यांच्या एकूण ४ नोंदी करण्यात आल्या. याचा अर्थ १० साधिकांच्या यंत्राद्वारे केलेल्या एकूण ४० मोजण्यांच्या नोंदी झाल्या.

कु. प्रियांका लोटलीकर

२. मार्च २०१९ मध्ये ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने केलेल्या प्रयोगांमध्ये केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे आध्यात्मिक विश्‍लेषण करून ७ संशोधन अहवाल बनवण्यात आले.

यू.टी.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

३. मार्च २०१९ मधील काही वैशिष्ट्यपूर्ण संशोधन प्रयोगांतील ठळक निरीक्षणे आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र

‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांच्यातील नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि एकूण प्रभावळ (ऑरा) मोजता येते. सामान्य व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु सकारात्मक ऊर्जा असेलच, असे नाही. ‘सामान्य व्यक्ती किंवा वस्तू यांची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते’, हे लक्षात घेऊन पुढील सारणी वाचावी.

नैसर्गिक रंग : नैसर्गिक रंग हे विविध नैसर्गिक घटकांपासून बनवले जातात, उदा. पिवळा रंग हळदीपासून बनतो. हिरवा रंग मेंदीच्या पानांपासून बनतो इत्यादी. हे रंग टिकण्यासाठीही नैसर्गिक वस्तू वापरतात.

रासायनिक रंग : आजकाल सणांना लागणारे, चित्रकलेत वापरत असलेले, घरांना लागणारे सर्वच रंग रसायनांपासून बनवले जातात. यासाठी ‘कॉपर सल्फेट, अ‍ॅल्युमिनियम ब्रोमाईड, मरक्युरी सल्फेट इत्यादी रसायनांचा वापर केला जातो.’

हळद, कुंकू आणि बुक्का हे नैसर्गिक निसर्गदत्त घटक (रंग) आहेत. रंगपंचमीला वापरले जाणारे पेठेत (बाजारात) मिळणारे पिवळा, लाल आणि काळा हे रंग रासायनिक प्रक्रिया करून बनवलेले मानवनिर्मित कृत्रिम घटक (रंग) आहेत.

टीप १ – स्तोत्र आणि नामजप : स्तोत्र हे ऋषींनी रचलेले असून त्यापाठी त्यांचा संकल्प असतो. स्तोत्राच्या फलश्रुतीत दिल्याप्रमाणे ते म्हणणार्‍याला लाभ होतो. त्यामुळे ‘स्तोत्र म्हटल्याने संरक्षक कवच निर्माण होते’, असे दिले आहे. स्तोत्र दिवसातून एकदाच म्हणतात, सतत म्हणत नाहीत. देवतातत्त्वाचा लाभ अपेक्षित असेल, तर नामजप करणे श्रेयस्कर आहे.

टीप २ – ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार जिथे ‘नाम/नाव’ आहे, तिथे त्याच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात. या अध्यात्मशास्त्रीय सिद्धांतानुसार देवतेचा नामजप केल्यावर संबंधित देवतातत्त्वाचा लाभ होतो. नामजप सतत करू शकतो. त्याने साधनाही होते.

४. पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून निघणार्‍या द्रवाचे (चरणतीर्थाचे) केलेले संशोधन

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २५ मार्च आणि ३१ मार्च २०१९ या दिवशी पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ करण्यात आले. यज्ञांत पूर्णाहुतीच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या चरणांतून निघणार्‍या द्रवाचे (चरणतीर्थाचे) ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले. तेव्हा त्यांच्या डाव्या चरणतीर्थाच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ११३.२२ मीटर, तर त्यांच्या उजव्या चरणतीर्थाच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १५३.२२ मीटर होती.

या वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक संशोधनातून यज्ञयाग अन् उच्च कोटीचे संत यांचे महत्त्व लक्षात येते.

५. पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाच्या वेळी यज्ञकुंडातून निघालेल्या धुराच्या संदर्भात केलेले संशोधन

यज्ञांत कपिमुख, नारसिंहमुख, गरुडमुख, वराहमुख अन् हयग्रीवमुख या पाच मुखांसाठी हवन करण्यात आले. दोन्ही यज्ञांच्या वेळी पाचही मुखांसाठी आहुती देतांना यज्ञकुंडातून निघालेल्या धुराचे ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले. तेव्हा प्रत्येक मुखाच्या वेळी काचेच्या बाटलीत गोळा केलेल्या धुराच्या सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर वाढ होत गेल्याचे चाचणीतून दिसून आले. पूर्णाहुतीच्या वेळीच्या धुराचेही परीक्षण करण्यात आले, त्याच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सर्वाधिक म्हणजे १८१.२० मीटर होती. (क्रमशः)

– कु. प्रियांका लोटलीकर आणि श्री. शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (५.४.२०१९)

ई-मेल : [email protected]

(महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने समाजात जाऊन केलेले संशोधन पुढील रविवारी प्रसिद्ध करत आहोत.)

‘गाढवाला गुळाची चव काय ?’, ही म्हण सार्थ करणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने जुलै २०१६ पासून ३१.३.२०१९ पर्यंत ४५ राष्ट्रीय (११) आणि आंतरराष्ट्रीय (३४) परिषदांत शोधनिबंध सादर करण्यात आले. नुकतेच अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’, तसेच पुरी, ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘खरे नेतृत्व उच्च आध्यात्मिक स्तर असलेली व्यक्तीच करू  शकते !’ या शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’, म्हणून घोषित करण्यात आले. सर्व शोधनिबंधांचे संशोधनकर्ते आणि लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. त्यांचा हिंदु धर्म, संस्कृती इत्यादी विषयांवरील संशोधनकार्याच्या एक लक्षांश तरी कार्य तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केले आहे का ? ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, अशा वृत्तीच्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये काय कळणार !’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF